
मिलिंद म्हाडगुत
कै. मनोहर पर्रीकर व नुकतेच दिवंगत झालेले रवि नाईक हे गोव्याच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते. गोव्याच्या राजकारणावरची या दोघांची छाप अमिटच. या दोघांशिवाय गोव्याचा राजकीय इतिहास पूर्ण होणे केवळ अशक्य.
तसे पाहायला गेल्यास या दोघांचे राजकारण बराच काळ समांतर गेले. रवि हे त्यावेळचे कॉंग्रेसचे बडे नेते तर पर्रीकर हे गोवा भाजपचे सर्वेसर्वा. पण पर्रीकरांना मुख्यमंत्री करण्यात रविंचा सिंहाचा वाटा होता हे कोणीही नाकारू शकणार नाही.
२४ ऑक्टोबर २००० रोजी रविंनी जेव्हा ११ आमदारांना घेऊन भाजप प्रवेश केला तेव्हा सर्वांना रवि मुख्यमंत्री होणार असेच वाटत होते. रविंची ज्येष्ठता, अनुभव पाहिल्यास हे वाटणे साहजिक होते. लक्षात घ्या त्यावेळी भाजपकडे फक्त दहाच आमदार होते.
त्यामुळे ११ आमदार घेऊन आलेल्या रविंचा वरचष्मा असायला हवा होता. पण सर्व बाबी रविंच्या बाजूने असूनसुद्धा मुख्यमंत्री झाले ते त्यावेळी फक्त आमदार असलेले मनोहर पर्रीकर आणि रविंना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले.
आता असे का झाले, सर्व बाजू अनुकूल असूनसुद्धा रविंनी पर्रीकरांना मुख्यमंत्री का होऊ दिले, यावर नंतर बरीच वर्षे चर्चा सुरू होती. पण यामुळे गोव्याचे राजकारण बदलले गेले हे मात्र नक्की. त्या दीड वर्षात एक उत्तम प्रशासक म्हणून पर्रीकर उदयाला आले यात शंकाच नाही.
पण त्यांना मुख्यमंत्री होण्याची पहिली संधी रविंनी दिली हेही तेवढेच खरे. केवळ गुणवत्ता असली म्हणून चालत नसते, ती दाखवायला योग्य संधी मिळायला हवी; आणि रविंमुळे पर्रीकरांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. अर्थात, त्या संधीचे सोने करीत पर्रीकरांनी त्यावेळी आणि भविष्यातही गोव्याच्या राजकारणावर आपला ठसा उमटविला!
याची बरोबर उलट बाजूही आहे. २००२साली झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये जाऊन रविंनी पर्रीकरांना गोत्यात आणले होते हेही सर्व ज्ञात आहे.
त्यावेळी मुख्यमंत्री पर्रीकर व उपमुख्यमंत्री रवि यांच्या छबी असलेले भाजपचे पोस्टर्स राज्यभर झळकताना दिसत होते. पण रवि कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे भाजपला हे पोस्टर्स हटविणे भाग पडले. एवढेच कशाला रविंच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण, हाही प्रश्न निर्माण झाला.
मला आठवते उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी अडीचपर्यंत फोंड्याच्या मामलेदार कार्यालयात भाजपचा उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे रवि बिनविरोध येतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी अडीचच्या सुमारास केंद्रीय मंत्री असलेले भाजपचे श्रीपादभाऊ अर्ज दाखल करण्याकरता आल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना हायसे वाटले.
ही निवडणूक म्हणजे एक युद्धच ठरली होती. रविंना धोबीपछाड देण्याकरता भाजपने जंग जंग पछाडले होते. फोंडा बस स्टॅन्डवरची लोकांच्या भावनांना हात घालणारी भाजपचे राष्ट्रीय नेते प्रमोद महाजन यांची सभा हे याचे ज्वलंत उदाहरण.
‘मला फक्त माझा श्रीपाद द्या’, अशी महाजनांनी फोंड्याच्या जनतेला घातलेली आर्त साद नंतर बरेच दिवस चर्चेचा विषय ठरली होती. पण असे असूनसुद्धा फोंडा मतदारसंघाची प्रत्येक नस ओळखणारे रविच त्यावेळी सिकंदर ठरले होते. पर्रीकरांना त्यावेळी मुख्यमंत्री होऊ देण्यात आपली चूक होती, असे रवि खाजगीत बोलताना सांगायचे.
पण पर्रीकर मात्र यामुळे रविंशी नेहमीच कृतज्ञ राहिले. त्यांची ही भावना शेवटपर्यंत कायम राहिली असे अनेक उदाहरणावरून दिसून आले आहे. मुख्य म्हणजे हातात सत्ता असूनसुद्धा रविंशी त्यांनी कधीच पंगा घेतलेला बघायला मिळाला नाही.
२०१२ ते २०१७पर्यंत फोंड्याचे आमदार असलेले लवू मामलेदार त्यावेळी विधानसभेत रविंवर अनेक आरोप करत असत. या आरोपांची चौकशी करण्याची मागणीही ते करत असत. रविंच्या फर्मागुडी-फोंडा इथल्या कॉलेजांबाबतही त्यांनी अनेक गंभीर आरोप केले होते.
पण आपल्याकडे ‘या बाबतीत एकही तक्रार आलेली नाही. आमदार या नात्याने तुम्ही तक्रार करत असल्यास मी चौकशी करू शकतो’ असे उत्तर देऊन मुख्यमंत्री पर्रीकर लवूची वाचाच बंद करत असत.
२००७साली कॉंग्रेसचे सरकार येऊन दिगंबर कामत मुख्यमंत्री झाले तेव्हा विरोधक असूनसुद्धा पर्रीकरांनी ‘रवि मुख्यमंत्री झाले असते तर त्याचा अधिक फायदा कॉंग्रेसला झाला असता, रविंकडे जी आक्रमकता आहे ती दिगंबरांकडे नाही.’ असे जाहीर वक्तव्य केले होते.
अर्थात २००५साली भाजपशी दगाबाजी करून कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे दिगंबरावर राग असल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले असावे, असे त्यावेळी बोलले जात होते. पण यातून रविंच्या कार्यप्रणालीवर असलेला त्यांचा विश्वास अधोरेखित होत होता यात शंकाच नाही.
रविंनीही पर्रीकरांविरुद्ध कधीच जाहीर शेरेबाजी केली नाही. विरोधी पक्षात असूनसुद्धा याबाबतीत त्यांनी नेहमीच मर्यादा पाळली. आणि म्हणूनच त्यांचे संबंध शेवटपर्यंत चांगले राहू शकले. याचे प्रात्यक्षिक माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या अंत्यविधीप्रसंगी बघायला मिळाले.
स्मशानात अनेक मंत्री, आमदारांसह त्यावेळी देशाचे संरक्षण मंत्री असलेले पर्रीकरही उपस्थित होते. पण जास्त गर्दी होती ती त्यावेळी कोणच नसलेल्या रविंभोवती. अंत्यविधी पार पडल्यानंतर पर्रीकर तिथल्या एका खांबाला टेकून रविंकडे बघत होते.
पण रविंची पाठ असल्यामुळे त्यांचे लक्ष नव्हते. शेवटी पर्रीकरांनी तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराला पाठवून रविंना बोलवून घेतले. ‘रवि, तू दिसान्दिस भुरगो जावपाक लागला मरे’, असे पर्रीकरांचे रविंना प्रशस्तिपत्रक. त्यावर, ’तू जाणटो जावपाक लागल्याकारणान तुका हांव भुरगो दिसपाक लागला’ रविंचे त्यांना प्रत्युत्तर.
या दोन नेत्यांच्या ’जुगलबंदीमुळे’ स्मशानातले गंभीर वातावरण प्रसन्न झाले हे आणखी वेगळे सांगायला नकोच. आज हे दोन्हीही महान नेते आपल्यात नाहीत. दोघांनीही उच्च प्रतीचे राजकारण केले. विरोधाला आपल्या व्यक्तिगत संबंधाआड कधीच येऊ दिले नाही.
म्हणूनच २०१९साली कालवश झालेले पर्रीकर अजूनही अनेकांचे ’रोल मॉडेल’ आहेत. अजूनही गोव्याच्या राजकारणावरची त्यांची छाप तशीच आहे. अजूनही अनेकांना पर्रीकर असायला हवे होते असे वाटत आहे. रविंबाबतही असेच म्हणावे लागेल. ’असा रवि होणे नाही’, असे लोक गेले तीन दिवस म्हणत आहेत ते याचकरता.
या दोन महान नेत्यांना पर्याय सापडणे जवळ जवळ अशक्यच. राजकीयदृष्ट्या दूर जाऊनही हे दोन्ही नेते जवळ असल्यासारखे वाटत होते ते त्यांच्या पॉझिटिव्ह स्पिरिट व एकमेकांप्रति असलेल्या सुप्त आदरामुळे!
त्यांचा आदर्श आजच्या होतकरू राजकारण्यांनी बाणवायला हवा. निदान त्यामुळे तरी आजच्या दर्जाहीन राजकारणाला खीळ बसू शकेल. अन्यथा ’जब तक चांद सूरज रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा’ असे म्हणण्यापलीकडे आमच्या हाती दुसरे काही राहणार नाही, हेच खरे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.