पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणात पणजी पोलिसांनी अट्टल गुन्हेगार जेनिटो कार्दोज (३६, सांताक्रूज) याला रविवारी रात्री पणजीतील एका हॉटेलमधून अटक केली.
जेनिटोच्या सांगण्यावरूनच रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला झाल्याचे आत्तापर्यंतच्या चौकशीतून समोर आले आहे; परंतु या प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ जेनिटोच आहे, हे तूर्त सांगता येणार नाही. त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतरच पूर्ण सत्य समोर येईल, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी रविवारी रात्री पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जेनिटोच्या अटकेमुळे संपूर्ण कट आणि हल्ल्याचे नेमके कारण समजण्यास मदत होईल, अशी पोलिसांना आशा आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाड्यांचीही ओळख पटली आहे. या गाड्या उद्या जप्त करण्यात येतील. यामुळे पोलिसांना आणखी पुरावे गोळा करण्यास मदत होईल.
विविध आंदोलनांमध्ये सक्रिय होणाऱ्या रामा काणकोणकर यांच्यावर गेल्या गुरुवारी करंझाळे येथील एका हॉटेलबाहेर सातजणांच्या टोळक्याने हल्ला चढवला आणि त्यांना केबल, पट्ट्याने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या काणकोणकर यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू आहेत.
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गोवा हादरला. या प्रकरणाचा आधार घेत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळे सरकारने आरोपींना अटक करून सोमवारपर्यंत मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, अन्यथा सोमवारी ‘गोवा बंद’ करण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणातील आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी रात्री पाचजणांना आणि शुक्रवारी दोघांना असे मिळून सातजणांना अटक केली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची चौकशी, हाती आलेले पुरावे आणि विविध अंगांनी चौकशी करून जेनिटोला अटक केल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
कोण आहे जेनिटो कार्दोज?
२००८ : सामाजिक कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांच्यावरील हल्ल्यानंतर प्रकाशझोतात.
२००९ : मेरशीतील मिरांडा टोळीशी चकमक. यात दोघांचा मृत्यू झाला होता, तर तिघे जखमी झाले होते.
२०१३ : राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार झाली होती अटक.
२०२० : सांताक्रूजमध्ये दोन गटांत झालेल्या गोळीबारात सहभागी. पोलिसांनी तडीपार करण्यासाठी केला होता अर्ज. तत्कालीन जिल्हाधिकारी मामू हागेंकडून अटींवर ‘क्लिन चिट’
हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, हल्ले, ड्रग्स प्रकरणात नाव.
अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचाही आरोप.
दोन दिवसांत २३ जणांना प्रतिबंधात्मक अटक
रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात सातजणांसह गेल्या दोन दिवसांत आणखी २३ जणांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आल्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले. या प्रकरणी शनिवारी ११ जणांना अटक केली होती. त्यानंतर रविवारी जुने गोवे पोलिसांनी आणखी १४ जणांची तपासणी सुरू केली होती. त्यातील ९ जण अट्टल गुन्हेगार आहेत. या १४ पैकी १२ जणांना रविवारी अटक करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काणकोणकर यांच्या प्रकृतीत सुधारणा
रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर सध्या ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून अपेक्षित सुधारणा दिसून येत आहे. दरम्यान, अनेक सामाजिक कार्यकर्ते, सहकारी तसेच स्थानिक नागरिक रुग्णालयात भेट देऊन काणकोणकर यांची विचारपूस करत आहेत.
रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी जेनिटो कार्दोज याला अटक केल्यानंतर ‘गोमन्तक’ने आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणणे गरजेचे आहे. पुढील ४८ तास त्याची वाट बघूनच पुढील निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांची रविवारी बैठक झाली. आम्ही सोमवारीही यासंदर्भात पुन्हा भेटणार आहोत. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून ४८ तासांनंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले. तर आपचे राज्य निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांनी जेनिटोच्या अटकेबाबत समाधान व्यक्त करीत पुढील चौकशीसाठी पोलिसांना वेळ दिला पाहिजे, असे स्पष्ट केले.
पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता म्हणाले...
रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात ज्या सातजणांना अटक करण्यात आली, त्यातील चौघांनी जेनिटो कार्दोज याचे नाव घेतले. सातही जणांच्या चौकशीतून जेनिटोच्या सांगण्यावरूनच रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ जेनिटोच असल्याचे तूर्त सांगता येणार नाही. त्याच्या संपूर्ण चौकशीनंतर सत्य समोर येईल. जेनिटो कार्दोज हा सऱ्हाईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर यापूर्वीही अनेक गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.