Raj Thackeray on Reels: महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय वातावरण तापले असून राज्यातील प्रमुख नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपापल्या पक्षांचे 'व्हिजन' मांडण्यासाठी सभा आणि मुलाखतींचा धडाका लावत आहेत. याचदरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया आणि 'रील्स' संस्कृतीवर केलेले एक खळबळजनक विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रिल स्टार्समुळे महाराष्ट्रातील जमिनी कशा पद्धतीने विकल्या जात असल्याचे सांगताना गोव्याचे उदाहारण दिले. ते म्हणाले, "सध्या रील्स पाहायच्या आणि त्या जागेवर माणसं पाठवायची, असा नवा प्रकार सुरु झाला आहे. रील्स स्टार्स दाखवतात की आमच्याकडे बघा काय काय आहे, आमचे डोंगर आणि किल्ले किती सुंदर आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि ठाण्यातील मुलं उत्साहाने असे रील्स बनवतात. पण या रील्समुळे बाहेरच्या लोकांना त्या जागा शोधणं सोपं झालं."
राज ठाकरेंनी पुढे थेट गोव्याचे उदाहरण देत म्हटले की, "अशा रील्समुळे आणि तिथल्या प्रसिद्धीमुळे आज गोवा बर्बाद झाला आहे. रील्स पाहून लोक तिथे पोहोचतात, गर्दी करतात आणि मग तिथल्या जमिनी विकत घेण्याचे सत्र सुरु होते. यामुळे स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाला मोठा फटका बसत आहे."
एकीकडे राज ठाकरे यांनी पर्यावरणाचे आणि भूमीपुत्रांच्या जमिनींचे रक्षण करण्याच्या मुद्द्याला हात घातला असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांच्या मुद्द्यावरुन शाब्दिक युद्ध सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे 'विकास मॉडेल' मांडताना विरोधकांवर टीका केली आहे, तर उद्धव ठाकरे यांनी राज्याची अस्मिता आणि मुंबईच्या (Mumbai) अधिकारांवरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये यंदा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्ष 'डिजिटल वॉर' लढत आहे. मात्र, राज ठाकरेंनी याच डिजिटल क्रांतीच्या दुसऱ्या बाजूकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, रील्समुळे केवळ पर्यटनच वाढत नाही, तर त्या भागातील जमिनींच्या किमती आणि बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेपही वाढत आहे, जो भविष्यात राज्यासाठी घातक ठरु शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.