Rain in most parts including Panaji; Cold due to untimely rain Dainik Gomantak
गोवा

पणजीसह बहुतांश भागात पाऊस; अवकाळी सरींमुळे गोव्यात गारवा

पणजी शहर आणि परिसरासह राज्याच्या काही भागात साधारण तासभर पाऊस पडला.

दैनिक गोमन्तक

पणजी: कडक उन्हामुळे हैराण असलेल्या गोवेकरांना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अवकाळी पावसाने काहीसा गारवा दिला. पणजी शहर व परिसरासह राज्याच्या काही भागात साधारण तासभर पाऊस पडला. भारतीय हवामान खात्याने मंगळवार आणि गुरुवार असा पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आणि रात्री नऊच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे रस्त्यावरील लोकांची तारांबळ उडाली.

ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्यांचे नुकसान होणार आहे. शेतकरी राजा आता आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. पावसामुळे काजू आणि आंबा बागायतदार धास्तावले आहेत. पावसाचा अनेक पिकांवर परिणाम होणार आहे. दुचाकी वाहनचालकांची पावसाने तारांबळ उडविली. पाऊस सुरू होण्याआधीच गायब झालेली वीज सांगेच्या अनेक भागांत उशिरापर्यंत आली नव्हती. वारंवार वीज जाण्याचे प्रकार रात्रभर चालू असल्याने लोक हैराण झाले होते. केपे, काणकोण या भागांनाही वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने झोडपून काढले. दरम्यान, आज मंगळवारी राज्यात कमाल 34.2 अंश सेल्सिअस तर किमान 26 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली.

विविध ठिकाणी कोसळधारा

संध्याकाळी 6.30 च्या सुमारास सत्तरी, सांगे व धारबांदोडा तालुक्याच्या दिशेने ढग होते. जुने गोवे, साखळी, केरी सत्तरी, पणजी, मार्शेल, बाणास्तारी येथेही पावसाने हजेरी लावली. साकोर्डा, बांबोळी, दाबोळी, ताळगाव इतर ठिकाणी 8 च्या सुमारास सरी बरसल्या. शिवाय अन्य भागांतही पाऊस कोसळला.

सांगेत वादळी पाऊस

सांगे भागात संध्याकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासून प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. वेधशाळेचा पावसाचा अंदाज खरा ठरत सांगेच्या सर्वच भागात अर्धा तास जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

हवामान खात्याचा अंदाज खरा: राज्यात 5 व 6 एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने व्यक्त केली होती. ती खरी ठरली. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहत होते. विजेच्या कडकडाटासह राजधानी आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

मडगाव: मडगावसह दक्षिण गोव्यातील बहुतेक भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. मडगावात पावसामुळे कित्येक ठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. तर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

डिचोली: दहा दिवसानंतर अवकाळी पावसाने पुन्हा एकदा दणका दिला. पावसामुळे रस्त्यावर पाणी झाले. बहुतेक भागात वीज पुरवठाही खंडित झाला. जोरदार पावसामुळे कोणतीही विपरीत घटना घडली नाही. रात्री पावणे दहापर्यंत तरी एकही कॉल आला नव्हता अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

पर्वरी: चैत्र महिन्यात आग ओकणाऱ्या उन्हामुळे बेजार झालेल्या पर्वरीतील बहुसंख्य आबाल वृद्ध, लहान मुले यांनी आजच्या पावसात भिजून मनसोक्त आनंद लुटला. पर्वरी परिसर बाकीच्या शहरातील भागापेक्षा खडकाळ असल्याने येथे उकाड्याचा त्रास जास्त जाणवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT