पणजी
या अंमलीपदार्थाची किंमत ८.४६ लाख रुपये असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली.
या छाप्यावेळी पार्टीच्या ठिकाणाहून तीन विदेशी महिला व एका तरुणाकडून अंमलीपदार्थ जप्त करून त्यांना अटक केली, तर इतर १९ जणांना टाळेबंदीच्या काळात पार्ट्यांना बंदी असताना त्यामध्ये सहभागी होऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंसंच्या कलम १८८ खाली अटक केली. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांमध्ये ४७.२ ग्रॅम चरस, ७६.२ ग्रॅम कोकेन, ९.९ ग्रॅम एक्स्टसी गोळ्या, तर ३.२ ग्रॅम एमडीएमएचा समावेश आहे. अंमलीपदार्थप्रकरणी अटक केलेल्या कपिल झवेरी (४०, कांदिवली - मुंबई), इलेना इमेलियानोव्हा (२६, रशियन), ॲना लिलिया नुकामेंदी (२८, मेक्सिसन), इव्हा इब्राहिम ओवा (२९, झेक रिपब्लिक) या चौघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. इतर १९ संशयितांविरुद्धचा गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांना सशर्त जामीन देऊन सुटका झाली आहे. हणजूण पोलिसांनी या १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिरंगीपानी येथील एका बंगल्यात पार्टी सुरू असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या पोलिस अधीक्षकांना मिळताच त्यांनी तीन वेगवेगळी पथके पोलिस निरीक्षक राहुल परब, निरीक्षक नारायण चिमुलकर व महिला उपनिरीक्षक रिमा नाईक व उपनिरीक्षक संध्या गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथके तयार करून घटनास्थळी छापा टाकला. या बंगल्याच्या सर्व बाजूने पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे पार्टीतून पलायन करण्यास कोणतीच मोकळीक नव्हती. पोलिस पथकाच्या प्रमुखांनी पार्टीच्या ठिकाणी प्रवेश करून ही पार्टी बंद पाडली. त्यानंतर या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांची झडती घेणे व चौकशी घेणे सुरू केले. या पार्टीमध्ये सहभागी झालेले बहुतेकजण मद्याच्या व अंमलीदार्थाच्या नशेत असल्याचे आढळून आले.
रेव्ह पार्टीमध्ये सहभागी होऊन नियमांचे उल्लंघन (कलम १८८) केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये सोनिया टोपले (२७, करंझाळे), तातिया लेबेडिरेक्टस (३६, रशियन), ॲना इव्हानोल (३२, रशियन), जेन कोरोफिवा (२२, रशियन), क्रिस्टिरा मतिसियेच (३०, युक्रेन), नमिता जैन (२९, हणजूण), नास्तिया कोमोनोटोकाया (२७, ब्रिटेन), यूलिली गालकिव्हा (३३, रशियन), राहुल कायत (३२, राजस्थान), डिमिटिंग मित्रायाका (३९, रशियन), सुरेश जाशी (२९, हणजूण), हुसैन बाबय (५२, शिवोली), बिरार दिलीपभाय लात्री (३२, अंधेरी), रॉकी सिंग (३३, दिल्ली), मदिन गायल (३३, मुंबई), जरक यादव (५०, मध्यप्रदेश), सलिम खान (२१, दिल्ली), अनुज यादव (२१, दिल्ली) व गावस्कर प्रसाद साल्न (२४, छत्तीसगढ) याचा समावेश आहे.
कपिल झवेरीचे ‘बॉलिवूड’शी संबंध
अंमलीपदार्थप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित कपिल झवेरी याचा बॉलिवूड क्षेत्राशी संबंध आहे. त्याने ‘दिल परदेशी हो गया’ व ‘ईश्क विश्क’ या हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे व सध्या तो गोव्यात राहत आहे. त्याच्याविरुद्ध अंमलीपदार्थाचा गुन्हा दाखल झाल्याने तो चांगलाच अडचणीत आला आहे. त्याचा गोव्यात काय व्यवसाय आहे तसेच हा अंमलीपदार्थ त्याने कोठून खरेदी केला होता याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
संपादन - यशवंत पाटील
|