पणजी
मांडवी नदीवरील तिसरा केबल स्टेड ‘अटल सेतू’ पुलाच्या रस्त्यावर दीड वर्षातच खड्डे पडल्याने या पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हा पूल नामांकित कंपनीने बांधला आहे व कोट्यवधी रुपये त्यावर खर्च केले आहेत. या पुलाचा रस्त्यावरील भागाला उंच - सखलपणा आल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी बंद केला होता. या खड्ड्यांमुळे पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
म्हापसाहून मडगाव तसेच फोंड्याकडे व फोंडा व मडगावहून म्हापसा येथे जाणारी वाहने या अटल सेतूचा वापर करत आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे मोठे असल्याने ते वाहनांसाठी धोकादायक बनले आहेत. या पुलाच्या अनेक ठिकाणी रस्त्याचा भाग उंच - सखलपणा झाल्याने पाणी साचून राहत आहे. नामांकित कंपनीने हा पुलाचे काम केले तरी खड्डे पडल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
अटल सेतू पुलाला जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या संरक्षक भिंतीही कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सुमारे ५.१ किलोमीटर लांबीच्या चारपदरी या पुलावर सुमारे ९०० कोटी रुपये खर्च केले आहेत. रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे ‘अटल सेतू’ पूल बांधणी दुय्यम दर्जाची तसेच यावरून वाहतूक करणे कितपत सुरक्षित आहे, असा असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. सरकारची अर्थव्यवस्थाच कोलमडली असल्याने या पुलाच्या डागडुजीकडेही सरकार दुर्लक्ष करत आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडवी नदीवर दोन पूल असताना भविष्याच्या दृष्टीने तिसऱ्या पुलाच्या बांधकामासाठी पुढाकार घेतला होता. अत्याधुनिक बांधकाम यंत्रणा वापरून तो कमी वेळेत पूर्ण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. २०१७ साली ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी या पुलाच्या कामाला प्राधान्य दिले होते. त्यानंतर त्यांच्या आजारपणात या पुलाचे काम प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यात आले होते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे २७ जानेवारी २०१९ रोजी मोठ्या दिमाखाने केले होते. मात्र, पुलाचे काम अर्धवट राहिल्याने वाहतुकीसाठी तो ५ फेब्रुवारी २०१९ खुला केला होता. या पुलामुळे पणजीत होणारी वाहतूक कोंडी कमी झाली होती.
goa goa goa
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.