पणजी: प्रियोळमधील जनतेने साथ सोडल्यामुळे मंत्री गोविंद गावडे निराश आणि वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच ते बेताल वक्तव्ये करत आहेत, असा टोला मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी गावडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना लगावला.
प्रियोळच्या जनतेची कामे करण्यासाठी आपल्याला आणि सभापती रमेश तवडकर यांना तेथे जावे लागते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
गोविंद गावडे यांनी केलेले वक्तव्य युती धर्माला धरून नाही. याबाबत भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाला कल्पना दिली जाईल. गावडे यांनी अशा गोष्टींवर शक्ती खर्च करण्यापेक्षा प्रियोळातील जनतेची कामे करण्यावर लक्ष द्यावे, असा सल्ला ढवळीकर यांनी दिला. गेली दहा वर्षे आमच्यावर टीका करूनच त्यांनी राजकारण केले. ते जे आज आम्ही ताईंवर अंडी फेकल्याचे सांगत आहेत, ती आमची संस्कृती नव्हे. हे कोणालाच पटणारे नाही. पूर्ण राज्य आम्हाला ओळखते.
सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते सत्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले.
गोविंद गावडे यांनी आपल्याला दहा हत्तींचे बळ प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना ढवळीकर यांनी एका कवितेचा आधार घेतला, ते म्हणाले,
हत्ती हत्ती मोठा किती
हत्तीला पाहून वाटे भीती,
मुंगी मुंगी किती लहान
मुंगीने पाहिला हत्तीचा कान,
हत्तीच्या कानात शिरली बया
हत्ती नाचे थयाथया.
जीतकडे नेतृत्व सोपवता येते, पण…!
जीत आरोलकर यांच्याकडे धडाडीचे नेतृत्व आहे. ते पक्षाचे आमदार आहेत. पक्षाच्या घटनेत केंद्रीय समितीचा सदस्य होण्यासाठी पक्षाचा किमान पाच वर्षे सदस्य असण्याची अट आहे. त्यामुळे आताच कोणी म्हटले म्हणून जीत यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवता येत नाही. त्यांनी पाच वर्षे संयम ठेवला तर आपसूक त्यांच्याकडे मगोचे नेतृत्व येऊ शकते. पक्षाची धुरा युवा नेत्यांच्या हाती सोपवण्याचा धोरणात्मक निर्णय पक्षाने याआधीच घेतलाही आहे. मात्र ‘जीत यांना अध्यक्ष करा’ असे सांगण्याचा गावडे यांना कोणाताही नैतिक अधिकार नाही. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा यावर आम्ही बोलू शकतो का? असा सवाल ढवळीकर यांनी केला.
कमिशन कोण खातो, कोणी माया जमा केली, नोकऱ्या कोणी विकल्या हे सगळे प्रियोळच्या जनतेला ठाऊक आहे. हे आम्ही आणखी विस्ताराने सांगण्याची गरज नाही. जी स्वतःला ‘बैल’ समजतो, तोच इतरांना बैल व म्हशी म्हणतो.दीपक ढवळीकर, मगोचे अध्यक्ष
मगो हा बहुजन समाजाचा पक्ष आहे. या पक्षाने राज्याचा चौफेर विकास केला. ढवळीकर बंधूंनी हा पक्ष सावरला हे कुणीही नाकारणार नाही. जर पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी आणि ढवळीकर बंधूंनी माझ्याकडे मगोच्या अध्यक्षपदाची धुरा दिली तर ती स्वीकारण्यास तयार आहे.जीत आरोलकर, मगोचे आमदार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.