Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; प्रियोळात बंडाची तयारी जोरात...

Khari Kujbuj Political Satire: प्रदेश भाजपचे पदाधिकारी शनिवारी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना शासकीय निवासस्थानी भेटले.

Sameer Panditrao

प्रियोळात बंडाची तयारी जोरात...

वेलिंग-म्हार्दोळ पंचायतीतून गोविंद गावडे पॅनलला पराभूत करण्यात आले. त्याकामी भाजपाच्याच दिलीप नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे दिलीप नाईक कोण आहेत? असा प्रश्‍न कोणालाही पडू शकतो. ते काही भाजपाचे दुश्मन नव्हेत. मुळात ते पूर्वीपासूनचे भाजपाचे निष्ठावान मानले जातात, परंतु गावडे यांना पक्षात घेताच दिलीप नाईक यांनी मागचे सारे विसरून पक्षाची सूचना प्रमाण मानली, परंतु गावडे यांनी मात्र त्यांना आपले मानले नाही. दीड वर्षांपूर्वी याच निष्ठावानांविरोधात अविश्‍वास आणून त्यांना काढण्यात आले. आता गावडेंचे मंत्रिपद जाताच त्यांच्या विरोधकांचे भय गेले. त्यांनी अविश्‍वास आणावा यासाठी भाजपा निष्ठावानांनीच त्यात पुढाकार घेतला. दिलीप नाईक यांच्या मते आता अविश्‍वासाचे हे लोण इतर पंचायतींमध्येही पोचणार आहे... ∙∙∙

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी

प्रदेश भाजपचे पदाधिकारी शनिवारी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना शासकीय निवासस्थानी भेटले. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे हेही उपस्थित होते. २०२७ मधील राजकीय समीकरणे लक्षात घेत सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची कसरत पार पाडल्यानंतरची ही भेट होती. पक्ष संघटना बळकट करण्यावर या भेटीदरम्यान चर्चा झाली असे सांगण्यात आले असले, तरी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वास्तवाचा आरसा दाखवल्याची चर्चा आहे. आता होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुका, त्यानंतरच्या पालिका निवडणुका, त्या दरम्यान येऊ शकणारे आदिवासी आरक्षण, विधानसभा निवडणूक हे टप्पे दिसतात तितके सोपे नाहीत. लोकांच्या उंचावलेल्या अपेक्षा आणि पूर्ती याबाबतची चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी मनोबल वाढवण्याचे काम केल्याचे दिसते. बैठकीनंतर हिरवळीवर एकत्र बसून टिपलेले छायाचित्र चर्चेचे ठरले. ∙∙∙

मुहूर्त अजून का सापडत नाही?

गेल्या आठवड्यात आम्हीच वृत्तकथा दिली होती की, दिगंबर कामत यांचा मंत्रिमंडळ प्रवेश करण्याचा मार्ग सुकर झाला आहे, परंतु राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीच्या धामधुमीमुळे या शक्यतेला गचांडी दिली आहे. आता माहिती मिळते त्यानुसार पक्षाच्या घटनेप्रमाणे जायचे पक्षसंघटनेने ठरविले आहे. त्यानुसार पाच राज्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढच्या तीन दिवसांत आटोपणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची नेमणूक केली जाईल. तोपर्यंत गोव्यातील विधानसभा अधिवेशनही होऊन जाईल. पक्षाची घटना म्हणजे ती राज्य संघटनेच्या ५० टक्के निवडणुका झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो. त्यानुसार गोवा मंत्रिमंडळ बदलाला आता ऑगस्टमध्येच मुहूर्त लाभू शकतो. ∙∙∙

नारळानंतर सुपारीलाही ‘डिमांड’

नारळ व सुपारी हे गोव्यातील प्रमुख कृषी उत्पन्न आहे. ही पिके किती प्रमाणात घेतली जातात याची निश्चित आकडेवारी कृषी खात्याकडे असणार नाही. कारण त्या वाटेला ते खाते कधी गेलेच नाही. पण एक गोष्ट खरी की विशेष करून नारळ गोवेकरांना हल्लीच्या काळात स्वस्तात वा माफक दरात मिळणे कठीण झालेले आहे. त्यामागील कारण कोणतेही असो, पण मडगावात मात्र उपहासाने विविध कामांच्या शुभारंभप्रसंगी वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते जे मोठ्या संख्येने नारळ वाढविले जातात, त्यामुळे त्यांचे दर वाढल्याचे म्हटले जाते. आता तीच गोष्ट सुपारीचीही झालेली आहे. ही दरवाढ होते तीही उत्पादकांनी जवळची सुपारी विकून टाकल्यावर असे ते म्हणतात. सध्या ती किलोमागे ३९० वर गेली आहे. नारळाप्रमाणेच सुपारीच्या दरवाढीची सांगड सध्या जे कला अकादमीप्रश्नी सुपारी आंदोलन चालू आहे त्याच्याशी घातली जाते. यातील विनोदाचा भाग वगळला, तर नारळाप्रमाणेच सुपारीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत हे मात्र खरे. ∙∙∙

‘बॅकलॉग’चे भिजत घोंगडे

कोरोना काळात जर आपले बॅकलॉग राहिल्यास पदवीच्या तृतीय वर्षात प्रवेश दिला जायचा, परंतु आता तो निर्णय अचानक बदलण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे बॅकलॉग सोडविल्याशिवाय तृतीय वर्षात बसता येणार नाही याची कल्पनाच देण्यात आली नाही आणि याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला. याविषयी अभाविप आणि राज्यातील महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी गोवा विद्यापीठाच्या प्रमुखांना

भेटले, त्यांना योग्यतो तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले, परंतु या प्रश्‍नाचे घोंगडे विद्यापीठाने अजून भिजतच ठेवले आहे. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था विद्यार्थ्यांची झाली

असून हा प्रश्‍न येत्या काळात मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार आहे. असे साधे विषय सोडविण्यात देखील विद्यापीठ अकार्यक्षम ठरत असल्याची चर्चा मात्र या अनुषंगाने सुरू झाली आहे. ∙∙∙

मराठी राजभाषा निर्धार समितीचे कौतुक

मराठीला राजभाषेचा योग्य मान मिळवून देण्यासाठी मराठी राजभाषा निर्धार समिती सध्या जोरदार प्रयत्न करत आहे. या समितीच्या सातत्यपूर्ण आणि अथक प्रयत्नांना सध्या राज्यभरातून प्रचंड दाद मिळत आहे. अनेक साहित्यिकांनी, विचारवंतांनी आणि सामान्य नागरिकांनीही या समितीच्या कार्याचे कौतुक केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेच्या सद्यःस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. अशातच समितीने हाती घेतलेले हे कार्य निश्चितच स्तुत्य आहे, असे मत अनेक भाषाप्रेमी व्यक्त करत आहेत. विविध शहरांमध्ये घेण्यात येणाऱ्या बैठका, चर्चासत्रे आणि जनजागृती मोहिमांमुळे मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. मात्र, या कौतुकासोबतच, ‘या प्रयत्नांना खरंच यश मिळेल का?’ अशी चर्चाही सध्या सुरू आहे. शासनाच्या पातळीवर याची किती गंभीर दखल घेतली जाते आणि समितीच्या मागण्या प्रत्यक्षात किती अमलात आणल्या जातात, यावरच समितीच्या यशापयशाची गणिते अवलंबून असतील, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. ∙∙∙

अमलीपदार्थ तस्करी

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात गोळाफेक करून, अमलीपदार्थ (गांजाची) तस्करी करण्याचा प्रयत्न झाला. ज्या संशयितांनी हा गांजा फेकण्याचा प्रयत्न केला, त्यांचा नेम चुकला व प्रकरणाचा भांडाफोड झाला. या गांजाचा पुरवठा कारागृहातीलच एका अंडर ट्रायल कैद्यासाठी करण्यात आला होता, हे पोलिस तपासातून समोर आले. कोलवाळ पोलिसांनी त्या कैद्याला आपल्या ताब्यात घेत अटक केली. मागील वर्षभरापासून हा कैदी कारागृहात आहे. याचाच अर्थ, यापूर्वी तस्करी झाली असावी, याची शक्यता नाकारता येत नाही. आता तस्करी झाली म्हणजे गांजा फेकण्यासाठी मोबाईलवरून संपर्क झाला आहे. यातून कारागृहातील सुरक्षितता ही केवळ रामभरोसे चालली आहे, हेच अधोरेखित होते... ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT