Goa Politics: खरी कुजबुज, संचालकांचा मुख्यमंत्र्यांना आदेश?

Khari Kujbuj Political Satire: मंत्रिपद गमावलेले आमदार गोविंद गावडे यांनी शिस्तप्रिय भाजपच्या नेत्यांना शिस्तीचे डोस देणे सुरू केले आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

संचालकांचा मुख्यमंत्र्यांना आदेश?

एक सरकारी अधिकारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आदेश (ऑर्डर) काढू शकतो का? या प्रश्नावरून आता समाज माध्यमावर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री गोविंद गावडे यांच्या मंत्रिपदाबरोबरच कला अकादमीचे अध्यक्षपदही गेले. कला अकादमीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची नेमणूक करीत असल्याचा आदेश गोवा कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांनी काढला आहे. मुख्यमंत्र्यांकडे तशी अनेक खात्यांची जबाबदारी आहे. ‘साबांखा’, वित्त खाते, पर्यावरण, शिक्षण, गृह अशी महत्वाची खाती असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना एका संचालकाने आता कला अकादमीची नवी जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले आहे. या आदेश पत्रावरून ‘नेटिझन’मध्ये नवी ‘डिबेट’ सुरू झाली आहे.

शिस्त कोणासाठी?

मंत्रिपद गमावलेले आमदार गोविंद गावडे यांनी शिस्तप्रिय भाजपच्या नेत्यांना शिस्तीचे डोस देणे सुरू केले आहे. शुक्रवारी त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्वयंशिस्तीची गरज असल्याचे जाहीरपणे सांगितले. गावडे म्हणतात, ‘कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो’, पण इथे तर ‘शिस्त ही फक्त दुसऱ्यांना दाखवायची गोष्ट’ अशी परिस्थिती झालीय. दामू नाईक यांनी ‘चौकशीच्या आधीच कारवाई व्हावी’ अशी जी ‘पुढे बघा’ भूमिका घेतली, त्यावर गावडे म्हणतात, ‘स्वतःच्या अंगणात पहिल्यांदा झाडू मारायला हवा!’ एकंदर चित्र पाहता, भाजपमधल्या काही मंडळींसाठी ‘शिस्त’ म्हणजे फक्त इतरांवर लावायचा शिरस्ताच झाला आहे असे ते सुचवत आहेत. घरात दिवा नसेल, तर बाहेर उजेड देण्याचं ढोंग तरी किती दिवस टिकणार? असा मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; तुरुंगात गांजा प्रीमियर लीग

दादाही विजयच्‍या जवळ?

काही दिवसांपूर्वी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांचा वाढदिवस झाला. आणि याच वाढदिनी विजय यांनी आपण येणाऱ्या पालिका निवडणुकीत मडगावातही आपले उमेदवार उभे करणार असे सांगून आपली पुढील राजकीय खेळी कशी असेल याचे सुतोवाच केले. असे म्‍हणतात, विजय सरदेसाई यांना त्‍यांच्‍या वाढदिनी शुभेच्‍छा देण्‍यासाठी भाजपच्‍या कुठल्‍याही नगरसेवकाने जाऊ नये, अशा सूचना दिल्‍या होत्‍या. पण तरीही सत्ताधारी भाजप नगर मंडळातील काहीजण सरदेसाई यांच्‍या वाढदिवसाला आवर्जून उपस्‍थित राहिले होते. त्‍यात कोंब प्रभागातून निवडून आलेले दादा नाईक यांचाही समावेश होता. दादा फक्‍त स्‍वत:च या वाढदिवसाला आले असे नव्‍हे तर दादांचे कित्‍येक समर्थकही विजयला शुभेच्‍छा देण्‍यासाठी आवर्जून उपस्‍थित होते. मडगावातील राजकीय वारे बदलू लागले आहे याचेच हे संकेत म्‍हणायचे का?

फोंड्यात जॉन परेरा सक्रिय?

जॉन परेरा म्हणजे फोंड्यातील कुर्टी- खांडेपार पंचायतीचे माजी सरपंच तसेच ‘निज काँग्रेस मॅन’. अगदी सुरुवातीपासून ते काँग्रेसमध्ये आहेत. आता त्यांच्या सौभाग्यवती या पंचायतीच्या पंच सदस्य आहेत. रवी नाईक काँग्रेसमध्ये असताना ते रवींचे निकटवर्तीय म्हणून गणले जात असे. आता रस्ते वेगळे झाले असले तरी ते ‘बाळकडू’ अजूनही त्यांच्या मदतीला येताना दिसत आहे. तेच बाळकडू घेऊन ते आता डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या ‘झेडपी’ निवडणुकीच्या तयारीला लागलेले दिसताहेत. सध्या या पंचायतीत जॉन यांच्या पत्नी या काँग्रेसच्या एकमेव पंचसदस्य असल्यामुळे जॉन यांचा भाव भलताच वधारला आहे. त्यांना म्हणे पंचायतीतल्या लोकांचा पाठिंबा मिळत असून तशी चर्चाही सुरू झाली आहे. आता ते बाजी मारतात का, हे सांगणे सध्या कठीण असले तरी ‘प्रयत्नांती परमेश्वर’ हेच खरे नाही का?

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; आमच्या सोबत रहाल तर पेन्शन वाढवू!

प्रसिद्धीलोलूप नवा सिंघम...

पोलिस खात्यात असे काही अधिकारी असतात, ज्यांना मीडिया ट्रायल व मीडियाची लाईमलाईट हवी. ज्यांनी कधीही कुठले पेपर वर्क न करता, केवळ प्रसिद्धी मिळवली. तसेच, एखादे प्रकरण अंगाशी आल्यास, त्याचे खापर कनिष्ठावर फोडून मोकळे झालेत. अशातच, आता नवा प्रसिद्धी सिंघम पोलिस खात्यात आलाय. हा अधिकारी तसा सिनिअर, परंतु अलीकडेच त्यांना मोठे पोस्टिंग मिळाले. यापूर्वी, मीडियाची लाईमलाईट फारशी मिळत नव्हती. परंतु आता बारीक-सारीक गोष्टीचे ‘क्रेडिट’ स्वतः घेण्यात हे महाशय अग्रेसर. सध्या या अधिकाऱ्यांनी सर्व पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे की, आपल्याशिवाय तुम्ही मीडियाजवळ काहीच बोलायचे नाही. तसेच हा अधिकारी संबंधित उपअधीक्षक, पीआयकडून रात्रीबेरात्री त्यांचे लाईव्ह लोकेशन मागवतो! सध्या इतर पोलीस अधिकारी व कॉन्स्टेबल गुन्हेगारी प्रकरणामागे घाम गाळतात. मात्र, हा अधिकारी सर्व श्रेय स्वतःच लाटण्यात धन्यता मानतो. त्यामुळे इतर पोलिस या अधिकाऱ्याच्या मानसिक छळ अन् वागणुकीमुळे त्रस्त झालेत. ∙∙∙

सुपारी स्वीकारली!

कला राखण मांड या कला अकादमी वाचविण्यासाठी निर्माण झालेल्या मंचातर्फे सध्या आंदोलने छेडली जात आहेत. कला अकादमीची जी वाताहात झाली आहे, त्याविरोधात कलाकारांचा हा मंच आवाज उठवित आहे. नाट्य कलाकार शरद पोंक्षे यांनी कला अकादमीतील दूरवस्थेवर बोट ठेवल्याने अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले. तत्पूर्वी स्थानिक कलाकारांनी अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामांतील उणिवा जनतेसमोर आणल्या होत्या. पोंक्षे यांनी केलेली टीका तत्कालीन कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांना रुचली नाही, त्यांनी पोंक्षे यांनी अकादमीची बदनामी करण्यासाठी सुपारी घेतल्याची टीका केली, त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या या मंचातर्फे ‘सुपारी’ आंदोलन छेडले. गावडे यांना कलाकारांनी सुपारी देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी घेतली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्यातील शुक्रवारच्या आंदोलनात तेथील प्रधान कार्यकारी अभियंत्यांनी ती सुपारी घेतली नाही, पण ‘टास्क फोर्स’च्या समितीतील अभियंत्यांनी ती स्वीकारली, त्यामुळे सुपारी स्वीकारणारा कोणी तरी मिळाला, असे नक्कीच कलाकारांना वाटले असणार.

गांज्याच्या गोळ्या आणि जेलची कसरत!

कोलवाळ कारागृह म्हणजे एकदम ‘हायप्रोफाइल’ ठिकाण झाले आहे! आतल्यांनी बाहेर जाण्याची स्वप्ने पाहावीत, पण इकडं तर बाहेरचे आत पाठवायचा ‘माल’ घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत! मंथन च्यारी नावाचा कैदी – जो कारागृहात आहे त्याने बहुतेक ‘मंथन’ खूप केले असावे. विचार केलाच असेल, ‘बाहेर नाही तर आत का नाही?’ थेट गांज्याच्या गोळ्या जेलमध्ये आणण्याचा प्लान! या आधी चारजणांना पकडले, त्यात एक अल्पवयीनही होता. एवढे ‘टीमवर्क’ शेवटी आयपीएल जिंकणाऱ्या संघातही दिसत नाही! वाटले होते की जेलमध्ये ‘सुधारण्याची संधी’ मिळते, पण इकडे तर सुधारण्याऐवजी ‘सुधारणारे डीलर्स’ तयार होतायत! कोलवाळ पोलिसांनी यावर पडदा टाकत मंथनला अटक केली. आता त्याचं मंथन थोडे ‘पोलीस कोठडीत’ होणार! म्हणजे एकूणात, जेलमध्ये जेलातून जेलमध्ये गेल्यासारखे झाले आहे!

राजदीपचा अभिनय!

कला चेतना वळवई या नाट्य संस्थेचे राजदीप नाईक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांनी एका नाटकाविषयी नाट्यप्रेमींना आवाहन केले. हे आवाहन करताना त्यांनी अंगातील लकब आणि संवाद फेकीतील चढ-उतार पाहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी नाट्य कलाकाराचा राज्याने पाहिलेल्या अभिनयाची आठवण झाली. या कलाकारानेही राज्यातील सर्वात मोठ्या हॉलमध्ये एकपात्री प्रयोग केल्याची टीकाही झाली. हाडाचा कलाकार, पण राजकारणात आल्यानंतर अंगातील अभिनय बाजूला ठेवणे काहींना जमत नाही, ते म्हणतात ते उगाच नाही. राजदीप यांनी केलेले आवाहन पाहता त्या कलाकाराशी मिळतेजुळते राहिले. हात वर करून नाट्य रसिकांना नमन करण्याची कला आणि संवादफेक जणू त्या एकपात्री कार्यक्रमाचे (सभेची) अनेकांना स्मरण करून देत असतील, हे नक्की.

मांद्रेचा नवा ‘पार्किंग प्रोटोकॉल’

मांद्रेत सध्या एक नवीन ‘पार्किंग प्रोटोकॉल’ चर्चेत आहे, जो स्थानिक रहिवाशांना चांगलाच चक्रावून टाकत आहे. झालं असं की, मांद्रेतील एका रस्त्यावर एक लाल रंगाची गाडी अक्षरशः ‘मांद्रेच्या राजा’सारखी उभी होती. ही गाडी एका हॉटेलसमोर होती, ज्याला स्वतःची पार्किंग नाही. जेव्हा इथं पार्टी असते, तेव्हा रात्रीच्या वेळी तर रस्ता गाड्यांनी इतका भरून जातो की, ‘हा रस्ता आहे की कार शोरूम?’ असा प्रश्न पडतो. एवढं सगळं असूनही कोणीच विचारत नाही! ना पोलिस, ना वाहतूक पोलिस, ना पंचायत सदस्य. सगळे ‘मांद्रेचा पाहुणचार’ मोठ्या मनाने स्वीकारत असल्याचं दिसतं. त्यामुळे ‘दाल में कुछ काला है’ असे टोमणे लोक परिसरात मारत आहेत. बहुतेक आता मांद्रेतल्या रस्त्यांना ‘पार्किंग लॉट’ म्हणून अधिकृत मान्यता मिळणार असे दिसते!.

अमलीपदार्थाचा विळखा

गुरुवारी देशभर अमलीपदार्थ विरोधी दिवस पाळला गेला. केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर सामाजिक संस्था व संघटनांनीही त्या निमित्त विविध जागृतीचे उपक्रम राबविले. मुख्यमंत्री डॅा.प्रमोद सावंत यांनी तर साखळीत तेथील पोलिसांनी काढलेल्या रॅलीला बावटा दाखवताना पालकांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. पण लोकांमध्ये वेगळीच चर्चा सुरू होती. गोव्याच्या विविध भागांत रोज अमली पदार्थ पकडल्याची वृत्ते येतात, हे पदार्थ नेमके येतात कुठून व ते येताच पकडण्यास सरकारी यंत्रणा कमी कशी पडते, असे प्रश्न केले जाऊ लागलेत. शिक्षण संस्थांच्या परिसरांत अशा द्रव्यांचा सर्रास व्यवहार होतो व ते सर्वांना माहीत असते मग यंत्रणा त्यावर कारवाई का करत नाही, स्मार्ट बनलेल्या पणजीत उगवत असलेल्या गांजांच्या रोपट्यांचे गौडबंगाल काय, असेही प्रश्‍न लोक आता करत आहेत. गोव्यात स्वतंत्र अंमली पदार्थविरोधी पोलिस विभाग असतानाही गोवा ही ड्रग्सची भूमी बनत आहे, ही चिंतेची बाब आहे खरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com