Goa Cabinet Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मंत्रिमंडळ फेरबदलासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव; दिग्गज मंत्र्यांवर टांगती तलवार

गोमन्तक डिजिटल टीम

मंत्रिमंडळ फेरबदल विधानसभा अधिवेशनानंतर करावा, अशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची इच्छा असली तरी त्यांच्यावर या बदलासाठी दबाव वाढू लागला आहे.

काही आमदारांनी थेट दिल्लीत मंत्रिपदासाठी प्रयत्न केल्याने पक्षश्रेष्ठींकडून शक्य झाल्यास विधानसभा अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल करा, असा संदेश देण्यात आला आहे.

या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी येत्या शुक्रवारी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक ताळगाव येथील समाज सभागृहात बोलावली आहे.

कला अकादमीचा विषय तापल्यानंतर कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात अपेक्षित मते न मिळाल्याने कार्यकर्त्यांकडून पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांना वगळावे अशी वाढती मागणी झाली होती.

यावरही या बैठकीत चर्चा झाली होती. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करतेवेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना मंत्रिपदाचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले होते. आता त्याला दोन वर्षे होत आल्याने आमोणकर यांना मंत्रिमंडळात सामावून घ्या, अशी पक्षश्रेष्ठींची सूचना आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा जिंकण्यात अपयश आल्यानंतर आता आम्ही सांगतो तसे वागा, असा स्पष्ट संदेश प्रदेश पातळीवरील नेत्यांना देण्यात आला आहे.

कॉंग्रेसने आदिवासी समाजाला त्यांच्या समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची दखल भाजपच्या गोटात घेण्यात आली आहे. कॉंग्रेसने सर्व विरोधी पक्षांना विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवले तर विधानसभा निवडणुकीवेळी आदिवासी मुख्यमंत्रिपदी ही घोषणा चालू शकते, असे भाजपमधील बुद्धिजीवी नेत्यांना वाटते.

त्यामुळेच सध्या विधानसभा सभापती रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात केवळ सामावून घेणेच नव्हे, तर त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपविण्याचा विचार दिल्लीतील नेत्यांनी चालविला आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याची कमान त्यांच्या हाती सोपविता येईल का, याची चाचपणी भाजपने याआधीच केली आहे.

लोबोंऐवजी दिलायलांना ‘लॉटरी’

भाजप प्रवेशावेळी सिक्वेरा, मायकल लोबो आणि संकल्प आमोणकर यांना मंत्रिपदे देण्याची चर्चा झाली होती. कळंगुटमध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत आघाडी देऊ न शकल्यामुळे मायकल लोबो यांचे नाव मागे पडले असून त्यांच्याऐवजी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

उत्पल यांच्याशीही चर्चा

भाजपमध्ये फेरप्रवेश करण्यासंदर्भात दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार प्रदेश पातळीवरील एका नेत्याने उत्पल पर्रीकर यांच्याशी चर्चा केली आहे. पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशीही संपर्क झाला आहे. पक्ष संघटनेची फेरबांधणी करतानाच पक्षापासून दुरावलेले परत पक्षात येतील, असे पाहिले जात आहे. माजी मंत्री महादेव नाईक यांना शिरोडा मतदारसंघात तयारीला लागा, असा संदेशही देण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांची मंत्रिमंडळात बाबूश यांच्याऐवजी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मंत्र्याच्या फोनमुळे कारस्थान उघड

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ताबदल झाला तर राज्यात सत्तांतर करून कॉंग्रेसचे सरकार आणण्यासाठी एका ज्येष्ठ मंत्र्याने एका आमदाराला दूरध्वनी केला होता. त्यावेळी भाजपमधून फुटलो तर कोण कोण सोबत असू शकतील, त्यांच्या नावांवरही चर्चा झाली होती. दूरध्वनीवरील संभाषणाची ही माहिती भाजप पक्षश्रेष्ठींच्या हाती लागली आणि राजकीय कटाचा बेत उघड झाला.

कामतांनी मंत्रिपद नाकारले

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी भाजप इच्छूक आहे. त्यांच्याकडे साबांखा व नगरनियोजन ही वजनदार खाती सोपवण्याचा विचारही सुरू होता. मात्र, कामत यांनी दिल्लीतील नेत्यांना आपण मंत्रिपदासाठी इच्छूक नाही, असे कळविल्याची माहिती मिळाली आहे.

‘त्या’ मंत्र्याची गच्छंती अटळ

भाजपशी कोण एकनिष्ठ आहे आणि कोण नाही, याचा अंदाज आल्यानेच भाजप ‘त्या’ मंत्र्याकडील वजनदार खाते या मंत्रिमंडळ फेरबदलात काढून त्याला आम्ही पुरते ओळखले आहे, असा संदेश देणार आहे.

नीलेश काब्राल सभापतिपदी

आमदार नीलेश काब्राल यांच्याकडे सभापतिपद सोपविले जाऊ शकते. विधिमंडळ कामकाजमंत्री म्‍हणून त्यांचा अभ्यास आहे. याशिवाय ते मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील मानले जातात. त्यामुळे विधानसभेचे व्यवस्थापन करताना त्यांचा उपयोग होणार अाहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT