मिलिंद म्हाडगुत
फोंडा: पावसाळा तोंडावर येऊन ठेपला तरीही फोंड्यात अजून मान्सूनपूर्व कामांना सुरवात झालेली नाही. अवकाळी पाऊसही अधून-मधून आपले दर्शन देत असतानाही मान्सूनपूर्व कामांना जोर आलेला दिसत नाही.
फोंड्यातील मुख्य रस्त्यांवर अजूनही ‘डांबर’ चढवलेले नाही. खेड्यापाड्यात तसेच शहराच्या अंतर्गत भागात रस्ते चकाचक झाले असले तरी विठोबा मंदिर ते दादा वैद्य चौक पर्यंतचा तसेच हनुमान देऊळ ते आल्मेदा हायस्कूलचा रस्ता अजूनही हॉटमिक्सपासून दूर आहे. त्यामुळे वाहनचालकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.
पावसाळा जवळ आल्यामुळे आता जर हॉटमिक्सिंग केले नाही तर पावसात या रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट होऊ शकते. त्याचप्रमाणे मलनिस्सारण प्रकल्पाचे कामही पूर्णत्वास गेलेले नाही. अजूनही तिस्क फोंडा येथे प्रकल्पामुळे निर्माण झालेले ‘खड्डेमय बेट’ दिसते आहे. त्यामुळे वाहतुकीत व्यत्यय येऊन छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यंदा पावसाळा लवकर येणार असे अनुमान हवामान खात्याने जाहीर केले असल्यामुळे हे काम जर युध्दजन्य पातळीवर केले नाही तर फोंडावासीयांच्या दृष्टीने बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. पालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी गटार उपसण्याचे जे काम हाती घेण्यात येत असे, ते अजूनही सुरू झालेले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मॉन्सूनपूर्व कामे न झाल्याने पावसाळ्यात गटर्स तुंबण्याचा धोका आहे. वीजखात्यानेही धोकादायक झाडांची कापणी व वीज खांबाची दुरुस्ती न केल्याने लोकांत नाराजी पसरली आहे. तसे पाहायला गेल्यास वीजखात्याचे काम म्हणजे नागरिकांच्या दृष्टीने एक डोकेदुखीच बनली आहे. कितीही काम केले तरी पावसाळ्यात वीज खंडित होण्याचे प्रकार काही थांबताना दिसत नाही. आता यावेळी सुदिन ढवळीकर हे वीजमंत्री असल्यामुळे यंदाचा पावसाळा तरी चांगला जाईल अशी अपेक्षा फोंड्यातील नागरिकांना आहे.
फोंडा शहर हे महत्त्वाचे शहर. तरीही या ठिकाणी अनेक समस्या आहेत. हे शहर फक्त फोंडावासीयांपुरतेच मर्यादित नसून त्याचा आवाका इतर भागापर्यंत पोहचला आहे. यामुळे फोंड्यात ज्या काही समस्या आहेत त्या पावसाळ्या आधी मुक्त करणे जरूरीचे आहे. फोंडा नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच वीजखाते यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. दर पापसाळ्यात शहरात मान्सूनपूर्व नियोजन नसल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
- महादेव उर्फ आपा खानोलकर, माजी उपनगराध्यक्ष फोंडा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.