सनबर्नविरोधात भूमिका घेऊन दिल्लीश्वरांकडून कानउघाडणी झाल्यानंतर ‘मनीम्याव’ झालेल्या आमदार प्रवीण आर्लेकरांचा आता नवा प्रताप पुढे आला आहे. कदाचित ते स्वतःच स्वतःसाठी अडचणी तयार करीत असावेत असे दिसते. धारगळमध्ये ‘सनबर्न’ करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला तरी त्याला विरोध केला आणि सरकारला घरचा अहेर दिला, पण काही दिवसांनी ते गप्प झाले खरे. आता कळंगुटमध्ये पंचायतीच्यावतीने बेकायदेशीर दुकानांवर कारवाया सुरू असताना त्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून काय सांगायचे ते सांगितले. विशेष बाब म्हणजे अधिकाऱ्यांना फोन केला तो प्रसंग यूट्यूब वृत्तवाहिनीवाल्याकडून रेकॉर्ड झाला. आमदारांचा फोन आल्याचे त्या कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या बोलण्यावरून स्पष्ट होते. त्यामुळे कदाचित आर्लेकर कारवाई न करण्यासाठी दबाव आणत असावेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर अशाप्रकारे आमदारांचे कारवाईच्यावेळी अधिकाऱ्यांना फोन आल्यावर जे काय समजायचे ते लोकांनीच समजावे नाही का? ∙∙∙
खाणविरोधी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सदैव आघाडीवर असलेल्या मोहिनी जल्मी यांना अखेर सरपंचपदाची खुर्ची सोडावी लागली आहे. पिळगाव पंचायतीत नाट्यमय घडामोडी घडताना मोहिनी जल्मी यांची सरपंचपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. पिळगावच्या शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात मोहिनी जल्मी नेहमीच पुढे असायच्या. मी लोकांच्या बाजूने आहे. असे त्यांनी जाहीरही केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची बाजू काहीशी भक्कमही झाली होती. अलीकडच्या काळात पंचायतींमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. कदाचित मोहिनी जल्मी यांना सरपंचपदावरून खाली खेचण्यासाठी राजकीय शक्ती नसावी. मात्र, गुप्त शक्ती नक्कीच आहे असा समज शेतकऱ्यांमध्ये पसरला आहे. पिळगाव सरपंचांची उचलबांगडी हा विषय मात्र सध्या एक चर्चेचा विषय बनला आहे. हे तेवढेच खरे..! ∙∙∙
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (सर) यांनी नुकतीच सहकुटुंब अयोध्यानगरीला भेट दिली. या भेटीतील काही छायाचित्रे त्यांनी आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवली आहेत. त्यामुळे त्यांनी आयोध्या दौरा केल्याचे दिसून आले आहे. या दौऱ्यातून कदाचित वर्षाच्या शेवटी जाऊन रामाच्या चरणी मस्तक टेकवावे, असे त्यांनी निश्चित केले असावे असे वाटते. पत्नी, मुलगा, सून यांच्यासोबतची काही मोजकीच छायाचित्रे त्यांनी स्टेटसवर ठेवली आहेत. त्यात नदी किनारी केलेल्या आरतीचा, हनुमानगढी येथील खांबाचा आणि आयोध्या परिसरातील सामूहिक छायाचित्राचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे श्रीरामाच्या दर्शनाला जाऊन त्यांनी आता तेथे काही मनोकामना व्यक्त केली असली, तर त्यांनाच माहीत. नाहीतर राज्यातील काही नेते वारंवार देवदर्शनाला जातात आणि तेथे जाऊन अभिषेक घालण्याचा किंवा गाऱ्हाणे गाण्याची छायाचित्रे समाज माध्यमांत व्हायरल होतातच. ∙∙∙
येणाऱ्या २०२५ साली गोव्याच्या राजकीय क्षेत्रात काय बदल होऊ शकतील याचे अंदाज सध्या बांधण्यात येत असून गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई येत्या वर्षी कदाचित काँग्रेसमध्ये दाखल होऊ शकतात अशा आशयाची सध्या चर्चा चालू असून एका फेसबुक वाहिनीने ‘इअर एंड’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या चर्चेत ही शक्यता ठामपणे व्यक्त करण्यात आली. ही चर्चा फेसबुक व यु-ट्यूबवर प्रक्षेपित झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच गोव्यातील लोकांमध्ये चर्चा सुरू झाली ती म्हणजे, खरेच विजय काँग्रेसमध्ये सामील होतील का? काहीजणांची प्रतिक्रिया तर अशी होती की, गोव्यातील मृत काँग्रेसला जिवंत करायचे असेल, तर विजय काँग्रेसमध्ये येण्याशिवाय पर्याय नाही. काहींनी विजयच पुढचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेही जाहीर करून टाकले. याचा परिणाम काँग्रेसमध्ये काय झाला ते कळू शकले नाही. काँग्रेस विजयला आपली दारे उघडणार का? हीच चर्चा शनिवारी सगळीकडे चालू होती. ∙∙∙
राज्यात देश - विदेशातून अनेक पर्यटक हे नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. राज्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत. जे कोणी या काळात गोव्यात दाखल झाले आहेत, ते समुद्र, गोव्याचा निसर्ग अनुभवण्यासाठी आलेले नाहीत ते गोव्यात मोठ-मोठ्या आयोजित केलेल्या पार्ट्यांसाठी, मजेसाठी हजारो - लोखो खर्चून आलेले आहेत. तर राज्यातील काहीजण या पार्ट्यांचे पास दुसऱ्या मार्गाने कशा पद्धतीने मिळविता येतील याच्या प्रयत्नात असून अनेकांनी गंगेत म्हणे घोडे न्हाऊन पण घेतले आहे... सुज्ञास अधिक सांगणे न लगे...
सध्या माजी मुख्यमंत्री व माजी खासदार अशी बिरुदावली लावणारे चर्चिल आलेमाव यांनी पुस्तक लिहिण्याचा संकल्प सोडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी गोव्यात सध्या असलेल्या लेखकांच्या मांदियाळीत त्यामुळे भविष्यात राजकारण्यांची भर तर पडणार नाही ना अशी शंकाही अनेकांना येऊ लागली आहे. आता चर्चिल इरमांवचे पुस्तक राजकीय की क्रीडाविषयक अनुभवावर आधारित असेल तसेच ते स्वत: लिहितील की दुसऱ्याकडून लिहून घेतील ते उघड झालेले नाही. यापूर्वी चर्चिल यांचे राजकीय शत्रू असलेल्या लुईझिन फालेरो यांनी एक पुस्तक लिहिलेले असून सध्या ते दुसरे पुस्तक लिहीत आहेत. अशाप्रकारे राजकारणी जर पुस्तके लिहिण्यात व्यस्त राहू लागले, तर राजकारणातील वितंडवाद कमी होण्याची शक्यताही अनेकांना वाटू लागली आहे. ∙∙∙
मोरजी येथील किनारी भागात असलेल्या एका क्लबच्या मालकाबद्दल शुक्रवारपासून मांद्रे मतदारसंघात चर्चा रंगत आहे. सकाळी मांद्रे येथील एका खासगी बॅंकेत खाते उघडण्यासाठी एक व्यक्ती पोहोचली. बँक कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितले की, मोरजी किनाऱ्यावर आपला क्लब आहे, त्यासाठी बँक खाते उघडायचे आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी सुरू असताना संबंधित व्यक्तीकडे पंचायत परवानगी नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्याच्याकडे फक्त एक स्लिप होती, परंतु ती कायदेशीर स्वरूपाची नव्हती. त्यामुळे बँकेने खाते उघडण्यास नकार दिला. हा प्रकार स्थानिक व्यक्तीच्या निदर्शनास आल्यावर हा विषय दुपारीच परिसरात गाजायला सुरवात झाली. मोरजीतील या क्लबच्या चर्चेला उधाण आले आहे. स्थानिकांमध्ये याची गंभीर चर्चा सुरू असून हा क्लब नेमका कुणाचा आहे आणि तो कोणाच्या आशीर्वादाने चालतो? या प्रश्नांनी चर्चेचा केंद्रबिंदू पकडला आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.