पणजी: बीना नाईक यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चार महिने हे पद रिक्त होते. अखेर आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने गोव्यासह इतर तीन राज्ये केंद्रशासीत प्रदेशांच्या प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड जाहीर केली.
'गोमन्तक'ने मागील आठवड्यात ‘महिला काँग्रेससाठी अध्यक्ष मिळेना’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने गोव्यासह इतर तीन राज्ये केंद्रशासीत प्रदेशांच्या प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड जाहीर केली आहे.
गोव्याचे महिला काँग्रेसचे अध्यक्षपद डॉ. प्रतीक्षा खलप यांच्याकडे पक्षानं सोपविलं आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या निवडीच्या नावे प्रदेश काँग्रेस समितीकडे पाठवून दिली आहेत.
गोव्यासह राजस्थान, गुजरात, मिझोराम, पड्डुचेरी आणि अंदमान व निकोबार येथील प्रदेश महिला काँग्रेसच्या नावांचा यादीत समावेश आहे. डॉ. प्रतीक्षा खलप या माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या सून आहेत.
या निवडीनंतर डॉ. प्रतीक्षा खलप यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले की, आपल्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी सिद्ध करण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे. आपला राजकीय प्रवास सुरू झाला तो २०१९-२० पासून. म्हापसा महिला काँग्रेसचे कार्य करीत असताना २०२२ मध्ये आपणावर उत्तर गोवा महिला काँग्रेसचे अध्यक्षपद पक्षाच्या नेत्यांनी सुपूर्द केले.
२०२२ च्या निवडणुकीत आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोवा महिला काँग्रेसने भरपूर कष्ट घेतले. राज्यातील सर्व महिलांना जोडून घेण्यावर आता लक्ष राहिल, त्यासाठी लवकरच राज्यभर दौरे सुरू होतील,असे डॉ. खलप यांनी नमूद केले.
डॉ. प्रतीक्षा यांनी निवडीबद्दल राहुल गांधी, प्रियांका गांधी, अलका लांबा, गिरीश चोडणकर, अमित पाटकर, बीना नाईक, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.