पणजी : सत्तरी तालुक्यातील 12 पंचायतींपैकी 8 पंचायतींचा पर्ये मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्या तो अधिक चर्चेत आहे त्याचे कारण राणे कुटुंबातील सत्तासंघर्ष. काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ सध्या विचित्र सत्ताकारणाने प्रसिद्धी झोतात आला आहे. इथल्या पंचायतींवर केवळ तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसची सत्ता आहे; मात्र या पंचायती विश्वजfत राणे यांच्या बाजूने उभा आहेत. परंतु प्रत्यक्षात केरी, पर्ये, मोर्ले, पिसुर्ले, होंडा या ठिकाणचा आढावा घेतल्यानंतर सीनियर खाशे म्हणजे प्रतापसिंह राणे यांचा प्रभाव आणि लोकप्रियता कायम असल्याचे दिसते आहे. (Pratap Singh Rane News Updates)
येथील जुनी जाणती मंडळी, छोटे व्यवसायिक हे खाशे यांचा शब्द अंतिम असल्याचे सांगतात. मात्र, प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांनी कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर करूनही सत्तेच्या सारीपाटासाठी गृहकलह वाढवायचा नाही, अशी सौम्य भूमिका घेतल्याचे दै. ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले. त्यामुळे सुनबाई डॉ. दिव्या राणे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
82 वर्षीय प्रतापसिंह राणे यांनी आमदारकीची 50 पूर्ण केली आहेत. त्यांनी कधीही पराभव पत्करला नाही. सहा वेळेला मुख्यमंत्री झालेल्या राणे यांचा भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर आधुनिक गोव्याची पायाभरणी आणि जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. 1980 नंतर राणे यांची कारकीर्द सुरू झाली आणि ती आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे.
राणे भाऊसाहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये 4 पैकी एक मंत्री होते. अत्यंत कमी बोलणारे, प्रसिद्धी झोतापासून दूर आणि कोणत्याही संकटांना न डगमगता ते ठामपणे स्वतःची आणि काँग्रेसची (Congress) बाजू मांडत आले आहेत. सध्या त्यांना पक्षाचे प्रभारी पी. चिदंबरम आणि दिनेश गुंडू राव यांनी त्यांना निवडणूक लढवण्याचे आवाहन करत उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, अत्यंत नम्रपणे उमेदवारी नाकारत पक्षाने अन्य उमेदवार शोधावा, असे सांगितले आहे.
गोव्याच्या राजकारणात सलग पन्नास वर्ष आमदार असण्याचा विक्रम असणाऱ्या 82 वर्षीय खासे म्हणजे प्रतापसिंह राणे आजही शिस्तीचे मुख्याध्यापक म्हणून सर्वश्रुत आहेत. शालिन राजकारणाचे कदाचित ते शेवटचे ‘रॉयल लिजेंड’ असावेत. त्यांना शह काटशहाच्या बरोबर नव्याने बदललेल्या कुप्रसिद्ध राजकारणाचे अनुभव नाही. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पर्येची जागा कोणत्याही परिस्थितीत आपण जिंकणारच असा इरादा जाहीर केल्याने सीनियर राणे यांनी आपले मौन सोडत ‘मला आता बास’ अशी भूमिका जाहीर केली आहे.
दुसरीकडे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी आपल्या पत्नीच्या मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला असून, बूथनिहाय कार्यकर्ते, पंचायतीचे पंच यांच्या बैठकीत प्रचाराचा जोर लावला आहे. त्यामुळे सासरे-सून किंवा सासू-सून हा संघर्ष अटळ झाला असल्याने या थंडीच्या दिवसात सत्तरीतील वारे गरम झाले आहेत. राणे विरुद्ध राणे हा संघर्ष टिपेला पोहचला आहे.
दरम्यान मला सत्तेचा मोह कधीच नव्हता किंवा नाही. सध्या कोविडसारख्या महामारीचा प्रतिकूल कालखंड आहे. त्यामुळे आई-बाबांचे आरोग्य माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सत्तासंघर्ष कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही यापासून दूर राहणे पसंत करतो, अशी प्रतिक्रिया प्रतापसिंह राणे यांची मुलगी विश्वधारा राणे यांनी दिली. तर ऐतिहासिक परंपरा असलेल्या राणे घराण्याने वैभवशाली दिवस अनुभवले आहेत. मी त्याची साक्षीदार आहे. प्रतापसिंह राणे तर सर्वाधिक काळ आमदार आणि मुख्यमंत्री राहिले आहेत. लोकांच्या सेवेसाठी राजकारण हा त्यांचा ध्यास आहे. पण, समाजकारणासाठी राजकारणाची गरज असतेच असे नाही. सत्तरीचे लोक आमचे आहेत. त्यांच्यासाठी आमची दारे सताड उघडी आहेत. मात्र, जर राजकारणात कौटुंबिक कलह येत असेल तर आम्ही तो शांतपणे नाकारतो. खाशे यांनी त्यांची भूमिका इतरांकडे सोपवावी, असं प्रतापसिंग राणेंच्या पत्नी विजयादेवी यांनी म्हटलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.