कळंगुट: स्व. मनोहर पर्रीकर यांची विचारसरणी आणि ध्येय धोरणांना मुठमाती देणाऱ्या डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना मुख्यमंत्री पदावर राहाण्याचा नैतिक अधिकार नाही. येत्या मार्चनंतर त्यांची खुर्ची निश्चितच जाणार असल्याचे कळंगुटचे माजी आमदार तथा कॉंग्रेसचे उमेदवार मायकल लोबो (Michael Lobo) यांनी सांगितले.
कळंगुट प्रचारावेळी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लोबो बोलत होते. गेली दहा वर्षे आणि विधानसभेचे दोन टर्म कळंगुटातून भापजच्या (BJP) तिकीटावर निवडून येत उपसभापती पदापासून ते मंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या लोबो यांनी भाजपचा आकस्मिक त्याग करून यंदाच्या निवडणुकीत ते कॉंग्रेस पक्षासाठी मते मागत आहेत. या बदलावरून त्यांना छेडले असता हा निर्णय आपल्या मतदारांना विश्वासात घेऊनच घेतल्याचे माजी मंत्री लोबो यांनी सांगितले.
भाजप हा सर्वसामान्यांच्या नजरेतून उतरलेला स्वार्थी पक्ष बनला होता. सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला तसेच समस्यांचे निवारण करायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. आतापर्यंत करण्यात आलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आली होती. त्यामुळेच पक्षत्याग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे लोबो यांनी यावेळी सांगितले.
आपण कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळी केवळ दिगंबर कामत वगळता पक्षात अन्य कुणीच नव्हते. मात्र, यापुढे 2022 साली राज्यात कॉंग्रेसचेच (Congress) सरकार स्थानापन्न होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. गोमंतकीय जनता मला दिलेल्या शब्दाला जागणारा म्हणून ओळखतात. त्यामुळे संपूर्ण गोव्यात कॉंग्रेसचा प्रचार करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. उत्तर गोव्यानंतर दक्षिण गोव्याचा आपण दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील भाजपवाले गळ्यात पर्रीकरांचा फोटो असलेला दुपट्टा घालून पर्रीकरांची तत्वे आणि त्यांच्या विचारसरणीला मुठमाती देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पर्रीकरानंतर खरी भाजपा संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे गोमंतकीय जनतेने अशा स्वार्थी लोकांना वेळीच जाणून घेत त्यांना घरचा रस्ता दाखविण्याची जोरदार मागणी मायकल लोबो यांनी केली.
औद्योगिक जाळे विस्तारण्याची गरज...
राज्यातील बेरोजगारी दूर करणारे औद्योगिक जाळे गोव्यात विस्तारणे गरजेचे आहे. परंतु हरित उद्योग आणि फार्मा इंडस्ट्रीला स्थानिक राजकारणी विनाकारण विरोध करीत आहेत. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढत असल्याचे लोबो यांनी सांगितले. स्थानिक तरुणांना स्वतंत्र व्यवसाय स्थापन करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे जे आतापर्यंत झालेले नाही त्यामुळेच स्थानिक तरुण व्यवसायात पुढे येत नसल्याचे लोबो यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.