पणजी: दैनिक ‘गोमन्तक’ ला 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘गोमन्तक’ने साखळी येथे आयोजित केलेल्या ‘अमर लता’ या लतादीदींना आदरांजली वाहणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमाला सत्तरीतील प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम रवींद्र भवन येथे पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी ‘गोमन्तक’च्या कार्याचे काैतुक केले. गोव्याच्या परिवर्तन चळवळीत ’गोमन्तक’चाही मोठा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात या भागातील ‘गोमन्तक’च्या वितरकांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘काैन बनेगा आमदार’ या स्पर्धेतील चार विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात ‘गोमन्तक’ने गेल्या 60 वर्षांतील योगदानाचे काैतुक केले. ‘गोमन्तक’चे माजी संपादक माधव गडकरी, नारायण आठवले, विद्यमान संपादक संचालक राजू नायक यांच्या लेखनाचा उल्लेख केला.
मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले, ‘की गोव्यातील लोक विविध वृत्तपत्रे वाचतात. वृत्तपत्रांतील बातम्यांचा अभ्यास करतात. वर्तमानपत्रातील अग्रलेखांचीही ते चर्चा करतात. गोव्यातील वाचक हा निराळा असून ते अभ्यासू वृत्तीचे आहेत. वृत्तपत्रे ही समाजपरिवर्तन घडविण्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. गोव्यात ‘गोमन्तक’नेही गेल्या 60 वर्षांत ही जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली आहे. लोक केवळ वृत्तपत्रांचे वाचनच करीत नाहीत तर वृत्तपत्रांचे संपादक त्यांच्या लेखनाचीही चर्चा करीत असतात.’
बहारदार गीतांचे सादरीकरण
‘अमर लता’ या लतादीदींना आदरांजली वाहणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमात शरयू दाते, रसिका गानू, प्रीती वॉरियर आणि मंदार आपटे या चाैघांनी एकापेक्षा एक अशी सरस गाणी सादर केली. त्यांच्या बहारदार गीतांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. समीरा गुजर जोशी यांनी केलेले सूत्रसंचालनही दर्जेदार ठरले. दरम्यान, शनिवारी रवींद्र भवन कुडचडे येथे हाच कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.