पणजी: पर्वरी येथील २० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे नागरी बांधकाम ९३ टक्के पूर्ण झाले असून, सांडपाणी वाहिन्यांचे जाळे उभारण्याचे कामही ९३ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
सरकारने तयार केलेल्या मासिक प्रगती अहवालानुसार, गेल्या महिन्याच्या तुलनेत प्रकल्पाच्या प्रगतीत कोणताही बदल झालेला नाही. प्रकल्पाच्या नागरी कामासह सांडपाणी वाहिन्यांचे जाळे उभारण्याचे काम ९३ टक्क्यांवर कायम आहे. दरम्यान, कुडचडे येथील ७.५ एमएलडी क्षमतेच्या ‘एसटीपी’चे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सांडपाणी वाहिन्यांचे सुमारे ९६ टक्के जाळे पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२६ ही पूर्णत्वाची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
दुसरीकडे, बांदिवडे येथील उंडीर येथे प्रस्तावित १५ ‘एमएलडी’ आणि कुर्टी येथील प्रस्तावित आठ ‘एमएलडी’ क्षमतेच्या ‘एसटीपी’चे काम अद्याप सुरू झालेले नाही. स्थानिक प्रश्नांमुळे या दोन्ही प्रकल्पांचे काम रखडले असून, त्यांची सांडपाणी वाहिनी अनुक्रमे ६५ आणि ९२ टक्के पूर्ण झाल्याचे अहवालात नमूद आहे.
२०२५मध्ये १६,७०५ टन घातक कचरा
गोव्यात २०२५ मध्ये एकूण १६,७०४.८७ टन घातक कचरा निर्माण झाल्याची नोंद राज्याच्या मासिक प्रगती अहवालात करण्यात आली आहे. यामध्ये १,६१३.४९ टन जाळण्यायोग्य, ११,७३६.४० टन लँडफिलमध्ये टाकण्यायोग्य आणि ३,३५४.९८ टन पुनर्वापरयोग्य कचऱ्याचा समावेश आहे.
राज्यात घातक कचरा निर्माण करणारे १,६२८ उद्योग असल्याचे अहवालात नमूद आहे. घातक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत सामायिक घातक कचरा प्रक्रिया सुविधा उभारण्यात आली आहे. पुनर्वापरयोग्य कचरा पुनर्वापर उद्योगांकडे पाठविला जातो. जाळण्यायोग्य आणि लँडफिलमध्ये टाकण्यायोग्य कचऱ्यापैकी सुमारे २५० मेट्रिक टन कचऱ्यावर पिसुर्ले येथील सामायिक सुविधेत प्रक्रिया केली जाते. या सुविधेची एकूण उपचार क्षमता १६,८४६ मेट्रिक टन प्रतिवर्ष असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.