Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; पोर्तुगीज पासपोर्टचे गूढ

Khari Kujbuj Political Satire: राज्यात अपघातांची संख्या काही घटण्याचे चिन्ह दिसत नाही, त्यात रेंट- ए- कार वाहनांमुळे होणारे अपघात ही दुसरी समस्या ठरलीय.

Sameer Panditrao

पोर्तुगीज पासपोर्टचे गूढ

गोव्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन त्या देशाकडे जात असतात, हे आता सत्य ठरले आहे. पूर्वी पोर्तुगीज पासपोर्ट मिळाला की युरोपीय देशांत म्हणे सहजपणे जायला मिळत होते व लंडनकडे जाऊन स्थायिक होण्याचे साधन म्हणून हे पासपोर्ट घेतले जात होते. पण अनेक वर्षे उलटली तरी हे सत्र सुरूच आहे. पासपोर्ट कार्यालयातूनही त्याला दुजोरा मिळत आहे. पण मुद्दा तोही नाही एरवी गोव्याचे , मातृभूमीचे गोडवे गायचे , येथील परप्रांतीयांबाबत, ते करत असलेल्या कामधंद्यांबाबत आग ओकायची व इतरांना त्यात सहभागी करून घ्यावयाचे व आपण उठून पोर्तुगाल वा लंडनमध्ये जाऊन तेथून गोवेकरांना तत्वज्ञानाचे डोस पाजायाचे हे कसले गोंयकारपण, असा सवाल आता केला जाऊ लागला आहे. आता जी माहिती उघड होत आहे, ती पाहिली तर दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागातून असे पासपोर्ट मिळविणाऱ्यांची संख्या अधिक आहे, हीच मंडळी स्वतःला अधिक जागरुक म्हणवतात, आहे की नाही गंमत. ∙∙∙

खासगी वाहनांची भाडेपट्टी

राज्यात अपघातांची संख्या काही घटण्याचे चिन्ह दिसत नाही, त्यात रेंट- ए- कार वाहनांमुळे होणारे अपघात ही दुसरी समस्या ठरलीय. ही सोडवण्याच्या दिशेने सरकारकडून पाऊल उचलले गेलेले नाही. खासगी वाहन भाडेपट्टीवर देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सूर मुख्यमंत्र्यांनी काढला होता2, परंतु त्यावर काहीही प्रगती झाली नसल्याचे स्पष्ट झालेय. सरकारने कायद्यात तरतूद केल्याशिवाय हा प्रकार काही थांबणार. या सगळ्यामुळे लोकांना मात्र आपले प्राण गमवावे लागत आहेत. परवाना नसताना खासगी वाहन पर्यटकांना भाडेपट्टीवर देण्याचा प्रकार छाती ठोकून केला जात असल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी असून ती सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते. पण मुख्यमंत्री आणि वाहतूक मंत्री खरोखरच हा प्रकार थांबण्यात यशस्वी होणार की नाही, हा चर्चा विषय झालाय. ∙∙∙

कुंभमेळ्‍यात भाटीकरांची फिजिओथेरपी

सध्‍या प्रयागराज येथे जो कुंभमेळा चालू आहे, तेथे ‘मगो’ पक्षाचे युवा नेते डॉ. केतन भाटीकर यांनी निःशुल्‍क फिजिओ थेरपी शिबिर चालू केले असून अन्‍य डॉक्‍टरही या मेळ्यात सामील होणाऱ्या भक्‍तांची सेवा करत आहेत. मगोप फोंडा आणि रायझिंग फोंडा या दोन संस्‍थांच्‍यावतीने हा कॅम्‍प लावला गेला आहे. पण कुंभमेळ्‍यातील या शिबिराची सर्वांत जास्‍त चर्चा जर कुठे चालू असेल, तर ती फाेंड्यात. त्‍यामागचे कारणही तसेच आहे, असे म्‍हणतात फोंड्यातून आपल्‍याला भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्‍न करणारे माजी नगराध्‍यक्ष अपूर्व दळवी हे म्‍हणे, फोंड्यात जो कार्यक्रम भाटीकर हे हातात घेतात, तसाच कार्यक्रम तेही घडवून आणतात. त्‍यामुळे त्‍यांना भाटीकरांची कॉपी पेस्‍ट, असेही काहीजण म्‍हणू लागले आहेत. आता भाटीकरांनी उत्तरप्रदेशात हे शिबिर लावले आहे. दळवीही आता तिथे जाऊन असेच शिबिर सुरू करतील का? ∙∙∙

अनुवाद की अनुताप?

कोकणीच्या क्षेत्रात अनुवाद कार्यशाळांचे पेव फुटले आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. त्यातील मार्गदर्शकांना अनुवादाचा किती अभ्यास आहे, ही शंका असते. प्रशिक्षकांनाच योग्य सखोल प्रशिक्षणाची गरज आहे, असे ज्येष्ठांनी सांगितले. जो-तो आपल्याला अनुवादक व कालांतराने तज्‍ज्ञ ही उपाधी लावून घेतो. झाकून झाकून गावकार स्वरूपाचे अनुवादक सुद्धा किंचित सरस असतात. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त वा राज्य पुरस्कारप्राप्त अनुवादक या भूमीत असताना त्यांना समाविष्ट का करत नाहीत, हा प्रश्न कोकणी अकादमीने निधी स्वीकृत करताना विचारायला हवा की नको? कोकणीत अनुवाद सोडून नवीन ‘अनुताप’ तयार होत आहेत, या चर्चेला उधाण आहे. ∙∙∙

रस्ते रुंद करून भागणार नाही!

हल्लीच गोवा भेटीवर आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातून जाणाऱ्या अनेक राष्ट्रीय महामार्गांच्या पुढील टप्प्यांच्या चौपदरीकरणाची पायाभरणी केली त्यांत जुवारी पूल ते मडगाव बायपासपर्यंतच्या टप्प्याचाही समावेश आहे. हा टप्पा वेर्णा पठार ते मडगाव बायपास असा आहे. पण आजची स्थिती पाहिली तर केवळ रुंदीकरण करून भागणार नाही, तर या रस्त्यावर जागोजागी जे स्थानिक फळ व भाजी विक्रेते बसतात त्यांच्या साठी ठराविक अंतरावर विक्रीयोग्य जागांची व्यवस्थाही करावी लागेल. अन्यथा अपघातांची शक्यता वाढेल. कुडका ते बांबोळी दरम्यानच्या रुंदीकरण झालेल्या रस्त्यावर तर जागोजागी अशा महिला विक्रेत्या दिसतात व त्यांच्यापुढे येऊन वाहने थांबतात. त्यामुळे भरधाव वाहनांची कोंडी होते. ‘साबांखा’ने अशा प्रकारांची दखल घेऊन कारवाई करावी. तसेच अशा विक्रेत्यांसाठी ठराविक अंतरावर वेगळे विक्री विभाग तयार करावेत. इच्छुकाला पाहिजे तो माल खरेदी करता येईल. सरकारने मागे महामार्गावर असे सॅटलाईट मार्केट स्थापन करण्याचे संकेत दिले होते, पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. ∙∙∙

मुरगावात अच्छे दिन

मुरगावात आजी-माजी आमदारांनी जमवलेली गर्दी ही आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचे दिसू लागले आहेत. वैयक्तिक चरित्र हननाचे आरोप झाल्यानंतर, तरीही विधानसभा उमेदवारी मिळविण्यात यश संपादन करणारे मिलिंद नाईक यांनी गोवा मुक्तिदिनी गर्दी जमवून आमोणकरांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याचमुळे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आमोणकरांनी सडा येथे कार्यालयासमोर गर्दी जमवली आणि ‘हम कुछ कम नही!’ असा संदेश नाईक यांना दिला आहे. या दोन्ही आजी-माजी आमदारांनी लोकांना जमवून शक्ती जोखून घेतली असावी. आता नाईक वारंवार लोक जमवणार अन् आमोणकरही बाह्या सरसावणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे पैसे घेऊन उपस्थिती लावणाऱ्यांना ‘अच्छे दिन’ नक्कीच येणार आहेत. ∙∙∙

अ‍ॅक्शनची रिअ‍ॅक्शन का?

म्हापसा पालिकेची तीनदा तहकूब केलेली बैठक सोमवारी अखेर पार पडली. मात्र, वीस नगरसेवकांपैकी नगराध्यक्षांना धरून केवळ सहा नगरसेवक या बैठकीस हजर राहिले. उर्वरित नगरसेविकांनी या बैठकीवर अप्रत्यक्ष बहिष्कारच टाकला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही! उलट विरोधी गटातील तीन नगरसेवक पालिकेत हजर राहिले, मात्र त्यांनी बैठकीला हजेरी लावली नाही. त्यांनी सभागृहाबाहेर राहून दर्शकाप्रमाणे बैठक पाहिली, हे विशेष. या बैठकीनंतर विरोधी गटातील चौघे नगरसेवक नगराध्यक्षांकडे भेटण्यास गेले, मात्र नगराध्यक्षा मॅडम हे नगरसेवक आल्याचे पाहून खुर्चीवरून उठल्या अन् फाईल्स घेऊन निघून गेल्या. त्यामुळे या नगरसेवकांनी कैफियत माध्यमांकडे बोलून दाखविली. आता नगराध्यक्षांचे असे वागणे या नगरसेवकांच्या ‘अ‍ॅक्शनची ही रिअ‍ॅक्शन म्हणावे’, की नगराध्यक्षांना खरोखर महत्त्वाचे काम आले? नक्की काय समजायचे? ∙∙∙

मांद्रेत डोंगराचे सेटलमेंट अन् खलपांचे मौन

मांद्रे मतदारसंघात सध्या डोंगराच्या सेटलमेंट प्रक्रियेवरून मोठी चर्चा रंगत आहे. विशेषतः नगर नियोजन खात्याच्या या निर्णयावर माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे यावर कार्यकर्त्यांच्या गटात आणि व्हॉट्सअप समुहांमध्ये चर्चांचा ऊत आला आहे. खलप यांना मागील लोकसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून १० हजारांहून अधिक मते मिळाली होती. लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. त्यांच्या कॉलेजच्या मागील डोंगराचाही या प्रक्रियेत समावेश असल्यामुळे या चर्चांना आणखी खतपाणी मिळत आहे. ही चर्चा सध्या मांद्रेतील राजकीय वातावरण ढवळून टाकत आहे. यावर खलप कधी मौन सोडतात, याचीच प्रतीक्षा कार्यकर्ते करताहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT