Ponda Municipality Election 2023: सांताक्रुझ हा फोंडा शहरातील एक महत्त्वाचा भाग. शांतीनगर संपल्यावर सांताक्रुझ भाग सुरू होतो.
या प्रभाग 3 मधील भागात ख्रिश्चन समाजाचे वर्चस्व असले तरी हिंदू मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. फोंडा बाजारातून मडगावला जाण्यासाठी येथील रस्त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो.
दोन्ही बाजूला घरे असल्यामुळे या भागाला सुबक स्वरूप प्राप्त झाले आहे. घरांबरोबरच नव्याने उभारलेल्या सदनिकांचे जाळेही या भागाचे आकर्षण ठरत आहे. शांतीनगर संपले की सांताक्रुझची हद्द सुरू होते आणि ती तिस्क-फोंडापर्यंत पोहोचते.
सांताक्रुझशिवाय सदर येथील काही भाग, खास करून स्टेट बँकेमागे असलेला परिसर आणि गोवा बागायतदाराच्या शाखेजवळील परिसराचाही प्रभाग क्रमांक ३ मध्ये समावेश केला गेला आहे.
यतीश सावकर हे या भागाचे नगरसेवक. गेल्या खेपेला माजी उपनगराध्यक्ष आर्विन सुवारीस यांचा ९ मतांनी पराभव केल्यामुळे ते ‘किंगमेकर’ ठरले होते. त्यावेळी ते मगोप्रणीत ‘रायझिंग फोंडा’ या पॅनलचे उमेदवार होते.
मगो व भाजपमध्ये तेव्हा तीव्र टक्कर होऊन मगोने बाजी मारली होती. पण नंतर त्यांनी मगोला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला.
सध्या ते भाजपचे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. पण यावेळी हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे ते रिंगणात नसतील.
परिणामी समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रभाग ३ मध्ये मगोला सर्वांत जास्त मते मिळाली होती.
विकासाबाबत संमिश्र प्रतिक्रिया
स्थानिक नगरसेवकाकडे आम्ही संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केली होती. पण ती पूर्ण झालेली नाही. काही ठिकाणी मातीचा जो भराव आहे, तोही दूर करण्यात आलेला नाही, अशी माहिती या प्रभागातील एक मतदार व फोंडा विकास समितीचे अध्यक्ष राम कुंकळकर यांनी दिली.
तर, या प्रभागातील मतदार तथा मागच्या पालिका निवडणुकीतील उमेदवार मिंगेल फर्नांडिस म्हणाले की, आमच्या नगरसेवकाच्या पाच वर्षांतील कामाबद्दल मी समाधानी आहे. त्यांनी विकास साधलाय.
प्रभाग ३ हा महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झालेला आहे. तरीसुद्धा जिद्द न सोडता काहीजण आपल्या बायको वा मुलीला रिंगणात उतरविणार असल्याचे समजते. त्यातील किती जणांना समाजकार्याची किनार आहे हे मात्र तो देवच जाणे.
उमेदवारी अर्ज भरण्याचा दुसराच दिवस असल्यामुळे चित्र स्पष्ट होऊ शकले नसले तरी येथे भाजप पॅनल, मगोप्रणीत रायझिंग फोंडा व काँग्रेस पक्षाचे पॅनल यांच्यात तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.