मिलिंद म्हाडगुत
Ponda Muncipal Council Election 2023: फोंड्याहून बेतोड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रभाग क्रमांक १२ची हद्द सुरू होते. सिल्वानगर व जोफिलनगर हे या प्रभागातील महत्त्वाचे भाग. या प्रभागातील नव्याने विकसित झालेला भाग म्हणजे जोफिलनगर. येथे सदनिका व बंगल्यांचे जाळेच पाहायला मिळते.
शहराचा भाग असूनसुद्धा तेथे शांतता दिसून येते. सेंट अॅनी चर्च, नगरपालिकेचे सिल्वानगर उद्यान या प्रभागात येते. सेंट मेरी स्कूलही याच प्रभागात येत असे. पण आता पुनर्रचित प्रभागात या विद्यालयाचा समावेश नाही. यावेळी या प्रभागात काँग्रेस, भाजप व रायझिंग फोंडा यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
विशेष गजबज नसूनही दाटीवाटीने वस्ती असल्यामुळे या प्रभागात मतदारांची संख्या सर्वांत जास्त आहे. यावेळी 1260 मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. जया शिवानंद सावंत या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका.
गेल्या खेपेला ‘रायझिंग फोंडा’तर्फे लढलेल्या जयांनी काँग्रेसप्रणित पॅनलच्या मेलिंदा कुलासो यांच्यावर 132 मतांनी विजय प्राप्त केला होता. तत्पूर्वी या प्रभागातून त्यांचे पती शिवानंद सावंत यांनी सलग दोन वेळा विजय प्राप्त केला आहे.
यावेळी ते पुन्हा डॉ. केतन भाटीकरांच्या ‘रायझिंग फोंडा’तर्फे रिंगणात उतरले आहेत. या प्रभागात हिंदूंबरोबरच ख्रिश्चन मतदारांची संख्याही मोठी आहे.
जया सावंत यांना गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासाबद्दल विचारल्यावर त्यांनी विकासकामांचा पाढाच वाचला. या प्रभागाचा फेरफटका मारल्यास एका बाजूला बेतोडा रस्ता तर दुसऱ्या बाजूला उसगाव येथे जाणारा मुख्य रस्ता असे दृश्य नजरेत भरते.
पती दोनदा व पत्नी एकदा असे सलग तीन वेळा सावंत कुटुंबीय जिंकून आल्यामुळे त्यांचे वर्चस्व अधोरेखित होते. शहराचा अंतर्गत भाग असल्यामुळे काही ठिकाणी अरुंद रस्ते बघायला मिळतात.
तिरंगी लढतीचे संकेत
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जात असलेला या प्रभागाने गेल्या दोन पालिका निवडणुकांमध्ये मगोप्रणीत पॅनलला साथ दिली आहे.
यावेळी या प्रभागात ‘रायझिंग फोंडा’चे शिवानंद सावंत यांच्याविरोधात काँग्रेस पॅनलचे विराज सप्रे व भाजप पॅनलचे अर्शित वेरेकर उभे ठाकले आहेत. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या सांताना कार्दोझ ह्या या लढतीचा चौथा कोन ठरू शकतात.
"सिल्वानगर येथील उद्यानात खुली व्यायामशाळा सुरू करून आपण एक नवा उपक्रम सुरू केला. शिवाय सेंट मेरी स्कूलजवळ लायन्स क्लबच्या साहाय्याने दोन बस शेड बांधणे, उद्यानांचा विकास करणे, ठिकठिकाणी पेव्हर्स घालणे, रस्ते हॉटमिक्स करणे इत्यादी विकासकामे केली. प्रभागातील घराघरांत सरकारी योजना पोहोचविल्या."
जया सावंत, नगरसेविका
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.