Lavoo Mamledar Death News Dainik Gomantak
गोवा

Lavoo Mamledar: न पटल्यावर ताठ मानेने बैठकीचा निरोप घेणारे 'लवू'! राजकारणात परतण्याचे स्‍वप्‍न राहिले अधुरेच

Lavoo Mamledar Politician: माजी पोलिस अधिकारी असूनही लवू हे मृदू स्वभावाचे होते. गोव्यात बहुजनवादी राजकारण झाले पाहिजे असे त्यांना वाटत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

अवित बगळे

फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्‍याशी गेल्‍या गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांच्याच निवासस्थानी अर्धा तास विविध विषयांवर बोलण्याची संधी मिळाली. ते आज आपल्यात नाहीत हेच न पटणारे आहे. कोणतीही राजकीय घडामोड घडली की त्यावर मत व्यक्त करणारा लवू यांचा फोन आता कधीही येणार नाही, हेसुद्धा पटत नाही.

फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांनी अचानक जगाचा निरोप घेतला आणि राजकारणात परत सक्रिय होण्याची त्यांची इच्छा अपुरी राहिली. राजकारणात येण्यासाठी पोलिस उपअधीक्षकपदावर निष्कलंक कारकीर्द सुरू असताना मित्र सुदिन ढवळीकर यांच्या विनंतीला मान देऊन स्वेच्छा निवृत्ती घेतलेले लवू अलीकडे राजकारणापासून काहीसे दूर होते.

राजकारण्यांकडून लोकांना आर्थिक अपेक्षा असते. कोणी सक्रिय होतो असे दिसल्यावर त्याच्याकडून पैसे कसे मिळतील यासाठी ते विविध क्लृप्‍त्‍या लढवतात. म्हणून मी राजकारणापासून दूर आहे, असे त्यांनी गुरुवारीच (ता. १३ फेब्रुवारी) सांगितले होते.

पेडण्याचे माजी आमदार परशुराम कोटकर यांना गोमेकॉत दाखल केल्यानंतर त्यांनी मोबाईलवर संपर्क साधून कोटकर यांच्याविषयी जाणून घेतले होते. उद्या कदाचित आपण गोमेकॉत जाऊ असे त्यांनी १६ जानेवारीला सांगितले होते. १७ रोजी कोटकर यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पाहवणार नाही असे सांगत त्यांनी पेडण्यात जाण्याचे टाळले.

माजी पोलिस अधिकारी असूनही लवू हे मृदू स्वभावाचे होते. गोव्यात बहुजनवादी राजकारण झाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. गोव्याचा चेहरा बदलत असताना त्याचा मोठा फटका बहुजन समाजाला बसत आहे, मात्र त्याची जाणीव समाजाला होत नाही. ती जाणीव करून दिली पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. मगोच्या सरचिटणीसपदी असताना त्यांचे पक्षनेतृत्वासोबत पटले नाही. ते बैठकीतून तडक निघून गेले. त्यावेळी मगोचेच काही कार्यकर्ते त्यांच्याशी हुज्जत घालत असतानाही ऐटीत छोटी ब्रीफकेस (ॲटची) हाती घेत बैठकीचा ताठ मानेने निरोप घेणारे लवू कायम स्मरणात राहणारे आहेत.

मगोतून बाहेर पडल्‍यावर लवू काँग्रेसमध्ये गेले. मडकईतून विधानसभा निवडणूक लढवली. तेथे त्यांना यश मिळाले नाही. फोंड्यातून ते एकदाच मगोच्या उमेदवारीवर आमदार होऊ शकले. काँग्रेसमध्ये असताना ते मनाने तेथे किती रमले असतील याबाबत शंकाच आहे. कारण त्यांच्यासोबत झालेल्या अनेक भेटींमध्‍ये कोल्हापूरचे माजी आमदार बंटी पाटील यांच्याशिवाय ते अन्य कोणाविषयी भरभरून बोलत नसत.

आता त्यांना पुन्हा राजकारणात सक्रिय व्हायचे होते. फोंडा मतदारसंघात चौरंगी लढत यावेळी होईल. तेथे आपल्याला राजकीय नशीब अजमावता येईल असे त्यांना वाटत होते. राजकारण करण्यासाठी भक्कम आर्थिक शक्ती पाठीमागे हवी असे त्यांचे म्हणणे होते. यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार आपल्या पक्षाचा विस्तार गोव्यात करण्यासाठी इच्छुक आहेत का, याची चाचपणी त्यांनी चालवली होती. गुरुवारी याच विषयावर ते अर्धा तास बोलले. राजकारणात पोलिस अधिकारी, डॉक्टर, अभियंता, व्यावसायिक आदींनी आले पाहिजे. सर्व क्षेत्रांचे प्रतिबिंब राजकारणात पडले तरच राज्याचा समतोल विकास होण्यासाठी विधानसभेत चर्चा करून निश्‍चित दिशा देता येते, या मताचे ते होते.

पर्वरी येथील गृहनिर्माण मंडळाच्या इमारतीत तळमजल्यावर असलेल्या आपल्या सदनिकेत ते असत. सकाळी काही वेळ पाण्याच्या टाकीजवळ खुर्चीवर बसून ते व्यायाम करत. आपल्यावर कोणीतरी गाडी चढवेल, अशा अनामिक भीतीने ते चालायलाही जात नसत. गेलेच तर घराच्या परिसरातच ते पाय मोकळे करत. घरात असताना लोखंडी ग्रीलला ते आतून कुलूप लावत. त्याबाबत विचारले असता, ‘‘मी माजी पोलिस अधिकारी आहे. त्यामुळे सुरक्षितता कशी बाळगायची हे मला चांगले ठाऊक आहे’’ असे हसत हसत ते सांगत.

क्वचित प्रसंगी फोंडा परिसरात ते जाऊन येत, अन्यथा आलेल्यांशी मनमोकळा संवाद साधणे त्यांना आवडायचे. पोलिस अधिकारी असले तरी मृदू स्वभावाचे लवू हे उंचेपुरे असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व हे समोरच्यांचे लक्ष वेधून घेत असे.

डोळ्यावर शेवाळ रंगाचा गॉगल लावल्याशिवाय ते सहसा घराबाहेर पडत नसत. गाडी चालवण्याचा त्यांना शौक होता. अगदी शेजाऱ्यांशीही फारसा संवाद न साधणारे लवू आपल्याच कोषात जीवन जगत होते.

सुदिन ढवळीकर यांच्याशी झालेले मतभेद त्यांच्या मनाला लागले होते. जाहीरपणे त्यांनी सुदिन यांच्यावर अनेकदा आरोप केले. आपल्याबाबत सुदिन असे का वागले, असा प्रश्‍‍न ते विचारत आणि गप्प होत. मगो पक्ष कोणाचा आणि कोणाचा झाला, असे उद्‌गारही ते उद्वेगाने काढत. गेल्या चार वर्षांपासून याच मुद्यावर कोटकर यांच्याशी त्यांचा संवाद नव्हता. तरीही त्यांच्याविषयी असलेले ममत्व कमी झाले नव्हते. विचारल्यावर ‘तो विषय नको’ असे म्हणून ते दुसऱ्याच विषयाकडे वळत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT