Ponda Kadamba Bus Stand: गेली तीस वर्षे रेंगाळत असलेल्या फोंड्यातील कदंब बसस्थानक आता नव्या रूपात फोंडावासीयांना अपेक्षित आहे. त्यासाठी या बसस्थानकाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम सुरू असले तरी ते कूर्मगतीने चालल्याने या कामाला गती मिळण्याची आवश्यकता आहे.
राज्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फोंड्यातील या कदंब बसस्थानकावरून आंतरराज्य बसगाड्यांची वाहतूक होत असल्याने प्रवाशांसाठी किमान सुविधांनीयुक्त बसस्थानक शक्य तेवढ्या लवकर उपलब्ध करण्याची मागणी फोंडावासीय व प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.
फोंड्याचे विद्यमान आमदार व तत्कालीन मुख्यमंत्री रवी नाईक यांनी 1991 मध्ये या कदंब बसस्थानकाची पायाभरणी केली व 1992 मध्ये त्याचे लोकार्पण झाले. त्यानंतर ठरावीक अंतरात या बसस्थानकाची जुजबी दुरुस्ती करण्यात आली. पण अद्ययावत सुविधांनीयुक्त असे बसस्थानक प्रवाशांसाठी उपलब्ध झाले नाही.
2016 व नंतर 2018 मध्ये या बसस्थानकाच्या छताचे सिमेंट काँक्रिटचे तुकडे पडायला लागल्याने हा बसस्थानक प्रवाशांसाठी धोकादायक ठरला होता. त्यामुळे त्याचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. तरीही उशिरा का होईना, सरकार पातळीवर हालचाली सुरू झाल्या आणि त्यानंतर मग सुमारे एक कोटी रुपयांची निविदा काढून या बसस्थानकाच्या छताची दुरुस्ती तसेच इतर जुजबी काम हाती घेतले. त्यात प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांची मागणी होत आहे. वास्तविक या बसस्थानकाची दुरुस्ती करण्याऐवजी संपूर्ण बसस्थानकच नव्या स्वरूपात उभे करणे आवश्यक आहे. सरकारी यंत्रणेने अर्थातच कदंब महामंडळाने पुढाकार घेतल्याने शेवटी आता दुरुस्ती करण्यात येत आहे.
गाड्यांची नोंदणी आवश्यक
जागा मिळेल तेथे रस्त्याच्या कडेला प्लास्टिक आवरणे व लाकडी फळ्या लावून टपरीवजा गाडे उभारल्यामुळे बसस्थानक बकाल दिसत आहे. या गाड्यांची योग्य नोंदणी करून त्यांना योग्य जागा दिल्यास या बसस्थानकावरील ओंगळवाणी स्थिती दूर होईल, असे फोंडावासीय म्हणतात.
स्वच्छतागृहाची स्थिती बिकट
बसस्थानकावरील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून या ठिकाणी अस्वच्छता असल्याने प्रवासी उघड्यावरच मूत्रविसर्जन करतात, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. नैसर्गिक विधी उघड्यावर केले जात असल्याने हा परिसर ओंगळवाणा ठरत आहे. याशिवाय पहाटे येणाऱ्या बसगाड्यांतील प्रवाशांना पाण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.
आवश्यक दुरुस्तीसाठी सुदिन ढवळीकरांकडून प्रयत्न
हे बसस्थानक मडकई मतदारसंघात येते. त्यामुळे या बसस्थानकाची दुरुस्ती करण्यासाठी मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी प्रयत्न केले. मध्यंतरीच्या काळात सरकारकडे निधीच नसल्याने या बसस्थानकाचे काम रखडले. मात्र, कदंब महामंडळाच्या सहकार्याने ढवळीकर यांनी या कामाला चालना दिली, त्यामुळे नजीकच्या काळात एक चांगला सर्व सोयीसुविधांनीयुक्त असा बसस्थानक येथे पाहायला मिळेल. लोकांना ढवळीकरांकडून खूप अपेक्षा आहेत.
प्रकाश नाईक, आरटीआय कार्यकर्ता, कुर्टी-फोंडा-
प्रवाशांना हव्यात चांगल्या सुविधा वास्तविक फोंड्यातील कदंब बसस्थानक हा आंतरराज्य दर्जाचा होणे आवश्यक आहे. हा बसस्थानक खरे म्हणजे पूर्णपणे नव्याने बांधायला हवा होता; पण सरकारने या बसस्थानकाची दुरुस्ती व इतर काम हाती घेतले आहे. तरीही प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याची आवश्यकता आहे.
विलास गावकर, ढवळी-फोंडा-
फोंड्यातील या कदंब बसस्थानकाचे काम लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी योग्य निधी देण्याची गरज आहे. या बसस्थानकाचे काम फार पूर्वीच हाती घ्यायला हवे होते; पण आता ते उशिरा हाती घेतले असले तरी पुढील काळात पूर्ण होणे आवश्यक आहे. येथील प्रवाशांची त्यामुळे उत्तम सोय होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.