Khari Kujbuj Political Satire  Dainik Gomantak
गोवा

Goa politics: खरी कुजबुज; भाजप श्रेष्ठींपुढे फोंड्याचा पेच

Khari Kujbuj Political Satire: दयानंद मांद्रेकर हे भाजपचे खंदे कार्यकर्ते व शिवोलीचे माजी आमदार. २०२२ सालची निवडणूक हरल्यानंतर मांद्रेकर यांचा पक्षाकडे तसा जिव्हाळा कमीच झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

भाजप श्रेष्ठींपुढे फोंड्याचा पेच

फोंड्यातील पोटनिवडणुकीसाठी अर्धा डझन उमेदवार सध्या गुढघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. भाजपचा निर्णय काय आहे, याची प्रतीक्षा करताना पुढील व्युहरचनाही आतापासूनच ठरू लागली आहे. फोंड्यातील एक गट म्हणतो की, रवींनी फोंड्यासाठी जे चांगले ते सातत्याने देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी रवी पुत्राला निवडून आणणे संयुक्तिक ठरेल. पण भाजपमधीलच एक गट असा म्हणतो की, आता पोटनिवडणुकीत जर रवी पुत्राला संधी दिली तर पुढील २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत रवी पुत्राचे तिकीट ‘कन्फर्म'' होईल, मग इतर इच्छुकांचे काय? आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर भलताच पेच निर्माण झाला आहे. उद्या एखाद्या भाजपच्या इच्छुकाला तिकीट नाकारले आणि त्याने बंड केले तर? ही भीती सध्या भाजपला सतावत आहे. ∙∙∙

दयानंद मांद्रेकर ‘खूश हुआ’!

दयानंद मांद्रेकर हे भाजपचे खंदे कार्यकर्ते व शिवोलीचे माजी आमदार. २०२२ सालची निवडणूक हरल्यानंतर मांद्रेकर यांचा पक्षाकडे तसा जिव्हाळा कमीच झाला होता. काही दिवसांपूर्वी मांद्रेकर साहेब गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या वाढदिनीही खास उपस्थित होते. २०२७ च्या निवडणुकीत कदाचित मांद्रेकर गोवा फॉरवर्डच्या उमेदवारीवर निवडणूक लढतील, अशी वदंता पसरली होती. आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना गोवा राज्य एसटी व मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करून एक मोठी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीत मांद्रेकर यांना भाजपची उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. एकमात्र खरे. सध्यातरी मांद्रेकर साहेबांची दुधावरची तहान ताकावर तरी भागवली आहे, असेही बोलले जात आहे. ∙∙∙

रवींचा पुतळा उभारण्याचा ठराव

फोंडा मतदारसंघाचा कायापालट करणाऱ्या दिवंगत रवी नाईक यांचे नाव पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला देण्याचा ठराव एकमुखाने संमत झाला. या ठरावाबरोबरच रवींचा पुतळा उभारणे आणि नव्या तसेच जुन्या पालिका इमारतीत रवींचे पोर्ट्रेट लावण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही संमत झाला. फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदी सध्या रवींचे कट्टर समर्थक आनंद नाईक आहेत, आनंद नाईक यांना राजकारणात आणण्यात पात्रावचा मोठा सहभाग आहे, त्यामुळे एकप्रकारे आनंद नाईक यांनी पात्रावना आदरांजली व्यक्त करताना त्यांचे कायम रहावे यासाठी घेतलेला हा ठराव स्तुत्यच असल्याच्या प्रतिक्रिया फोंडाभर व्यक्त होताना दिसल्या. ∙∙∙

‘माझे घर’ला ‘सोसेदाद’चा नकार !

कोणत्याही योजनेची अंमलबजावणी करताना त्याचा कायदेशीर अभ्यास करणे गरजेचे असते. हे सत्तेवर असलेल्या जाणकारांना व सरकारी अधिकाऱ्यांना माहीत असावे लागते, अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता असते. सरकारने ‘माझे घर’ योजनेच्या शुभारंभ केला आहे. या योजनेचे अर्ज वाटण्याचा कार्यक्रम काल कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात झाला. कुंकळ्ळीत सरकारी जमीन व कोमुनिदाद मालकीची जमीन नाही. येथील बहुतांश जमीन ही.‘सोसेदाद आग्रिकोला दी गांवकारी कुंकोलिम ई वेरोडा’ या खासगी संस्थेची म्हणजे स्थानिक महाजनांची आहे. या जमिनीवर असलेल्या घरांनाही ‘माझे घर’ योजना लागू होणार असल्याचे भाष्य मुख्यमंत्र्यांनी करून उपस्थितांकडून टाळ्या घेतल्या. मात्र, संस्था चालक व संस्थेचे महाजन गावकार मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर सहमत नाहीत. सरकारी नियम व कायदा सोसेदाद संस्थेला लागू होत नसल्याचे संस्थेच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. सरकारच्या महसूल खात्याचे अधिकारीही मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर कायदेशीर अडथळे असल्याचे मान्य करतात. आता ज्यांनी सोसेदाद मालकीच्या जागेवर घरे उभारली आहेत. त्यांना ‘माझे घर’ योजना लागू होणार की नाही, या बाबत साशंकता निर्माण झाल्यामुळे लाभार्थी अर्ज भरण्यात पुढे मागे होणार हे निश्चित. ∙∙∙

बाबूंना कला अकादमीची लॉटरी

बाबू कवळेकर यांना २०२२ च्‍या निवडणुकीत केपेतून पराभव स्‍वीकारावा लागल्‍यानंतर ते काहीसे बाजूला पडले होते. भाजप सरकारात बाबू हे उपमुख्‍यमंत्री असतानाही केपेतील मूळ भाजप कार्यकर्त्‍यांनी त्‍यांना कधी आपले मानलेच नाही, त्‍याचाच फटका त्‍यांना २०२२ च्‍या निवडणुकीत बसला. पण बाबू हे चिकाटी बाळगून थांबणारे राजकारणी. आपला पराभव झाला तरी त्‍यांनी भाजपच्‍या कार्यातून स्‍वत:ला बाजूला कधी ठेवले नाही. याचाच फायदा त्‍यांना आता झाला. विधानसभेची निवडणूक दीड वर्षांनी होणार असताना बाबू कवळेकर यांना कला अकादमीचे अध्‍यक्षपद देत मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी अजुनही आपण त्‍यांच्‍याबाजूने खंबीरपणे उभे असल्‍याचे दाखवून दिले. आता या अध्‍यक्षपदाचा फायदा बाबू २०२७ च्‍या निवडणुकीत कसा काय उठवू शकतात, हे मात्र पहावे लागणार आहे. ∙∙∙

नाटकावर लक्ष केंद्रीत करा!

फोंड्याच्या राजीव कला मंदिरात कला अकादमीची कोकणी नाट्यस्पर्धा सुरू झाली आहे. बुधवारी रात्री ‘देश राग'' हे बाळा राया मापारी यांच्यावरील नाटक सादर झाले. बाळा राया मापारी हे पात्र माजी मंत्री तथा नाट्यकलाकार गोविंद गावडे यांनी सादर केले. त्यांच्या कलेची बरीच वाहव्वा झाली. त्यामुळे एसटी समाजातील लोक सध्या त्यांना सल्लेही देऊ लागले आहेत. त्यांनी आता राजकीय भूमिका बाजूला ठेवून नाटकावर लक्ष केंद्रीत करावे, असेही काहींनी सूचविले आहे. नाटकावर लक्ष केंद्रीत केल्यास प्रियोळमधील एसटी समाजातील एखाद्या ‘डायनॅमिक'' नेतृत्वास मार्ग खुला करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी असे बरेच सल्ले त्यांना येऊनही गेले असतील, पण त्यावेळी त्यांच्याकडे मंत्रिपद होते. आता ते नसल्याने या सल्ल्याचा ते किती विचार करतील, हे सध्यातरी सांगता येणार नाही. ∙∙∙

पाटकर पुन्हा आक्रमक!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलाचे वादळ पेल्यातील वलयापुरतेच राहिले. केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा पाटकरांवर विश्वास ठेवल्याने त्यांनी सध्या आक्रमक राहण्यास सुरुवात केली आहे. वीज खात्यातील आंदोलनाच्यावेळी त्यांनी वीज मंत्र्यांना खुले आव्हान दिले, परंतु वीज मंत्र्यांनी त्यांच्या आव्हानाला अजूनतरी काही उत्तर दिले नाही. त्याशिवाय सध्या ते विविध विषय घेऊन ठिकठिकाणी पक्षाची भूमिका मांडत आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी येणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत दिसणार आहे. एका बाजूला काँग्रेस-आरजी-गोवा फॉरवर्ड अशी युती होणार असल्याचे चिन्हे स्पष्ट आहेत. त्यामुळे काही अंशी येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला त्याचा निश्चित फायदा होणार आहे. परखड आणि रोखठोक बोलणाऱ्या खासदार विरियातो फर्नांडिस यांना घेऊन पाटकर यांनी राज्य पिंजून काढले तर काँग्रेसला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो, हे नक्की असे काँग्रेसचेच नेते आता म्हणत आहेत. ∙∙∙

‘ताजमहाल’ बाबूंकडे !

जगातील सातवे आश्चर्य मानले जाणारा आग्र्यातील ताज महाल शहाजहान यांनी मुमताज यांच्या प्रेमापोटी बांधला होता, की त्या मागे आणखी कोणती ‘स्टोरी’ आहे. यावर परेश रावल यांचा अभिनय असलेला एक चित्रपट येत आहे. मात्र, गोव्यातील कलाकारांचे माहेर घर असलेल्या कला अकादमीला ‘ताजमहाल’ची उपमा का दिली. कला अकादमीची काय अवस्था व स्थिती झाली.कला अकादमी मुळे माजी कला व संस्कृती मंत्री कसे ‘ट्रोल’ झाले याचा इतिहास आपणास माहीत आहेच. आता सरकारने कला अकादमीची धुरा बाबू कवळेकर यांच्याकडे सोपवली आहे. बाबू जरी कलाकार नसले तरी चांगले कलाप्रेमी आहेत. बाबू कला अकादमीची स्थिती सुधारणार की नाही हे कळेलच. मात्र, भाजप सरकारने बाबू यांच्याकडे कला अकादमीचे अध्यक्षपद देऊन बाबूला राजकारणात आणखी सक्रिय केले हे मात्र खरे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raigad Fort: मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी; 'किल्ले रायगड'

Kuldeep Yadav Record: परदेशी मैदानांवर कुलदीपची 'जादू'! चहलला पछाडून बनला 'नंबर 1' भारतीय गोलंदाज; ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधली किमया VIDEO

अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

Operation Sindoor: 'कोण काय करतं, कधी येतं, सगळं माहीतीये,' ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय नौदल सज्ज; व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांचं वक्तव्य VIDEO

SCROLL FOR NEXT