फोंडा: विधानसभा निवडणुकीला अद्याप सव्वा वर्ष असले तरी फोंडा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आतापासूनच वेग येऊ लागला आहे. सध्या हा मतदारसंघ भाजपच्या कह्यात असून कृषिमंत्री रवी नाईक हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. खरे तर फोंडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो.
२०१२ साली मात्र मगो - भाजपची युती झाल्याने मगोपच्या लवू मामलेदार यांनी रवींवर विजय प्राप्त केला होता. पण यावेळी फोंडा भाजपमधील अंतर्गत दुफळी डोके वर काढू लागली असून त्याचे पडसाद या मतदारसंघात उमटत आहेत. पालिका- पंचायतींमध्येही याचा प्रत्यय येत आहे. फोंड्याच्या प्रभाग क्र. सातमधून सलग तीनवेळा निवडून आलेले नगरसेवक विश्वनाथ दळवी यांना सध्या महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटू लागले असून त्यांनी ‘प्रोग्रेसिव्ह फोंडा’तर्फे समाजकार्याची राळ उडवली आहे.
भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार, हे स्पष्ट झाले नसले तरी दळवी या उमेदवारीवर दावा सांगत आहेत. ते मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून गणले जात असल्यामुळे त्यांच्या या दाव्याला राजकीय वर्तुळात गंभीरपणे घेतले जात आहे. आता उमेदवारी कोणा एकाला मिळणार असल्यामुळे ‘तो कोण’ यावर सध्या फोंड्यात चर्चा रंगत आहे. गेल्या खेपेला अवघ्या ७७ मतांनी विजय हुकलेले भाटीकर याहीवेळी रिंगणात उतरणार असून त्यांची रणनीती काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
भाजप-मगोपची युती झाल्यास फोंडा भाजपला मिळणार, हे निश्चित असून त्यामुळे मगोपच्या भाटीकरांचे काय, यावरही तर्क-वितर्क सुरू आहेत. भाटीकरांच्या कार्यकर्त्यांकडून युती झाल्यास ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार, असे सांगितले जात असले तरी फोंड्यात अपक्ष उमेदवाराची डाळ शिजणे कठीण असल्याचे मागील निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास दिसते. त्यामुळे भाटीकर ‘आप’ वा काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. पण सध्या भाटीकर ‘रायझिंग फोंडा’तर्फे समाजकार्य करत असून ते कोणती पावले उचलतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे.
रवी जरी तटस्थ वाटत असले तरी मतदारसंघात होणाऱ्या घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष आहे. त्यांचे नगरसेवक पुत्र रितेश यांना ते रिंगणात उभे करू शकतात, असा होरा व्यक्त केला जात आहे. दळवी यांनीही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असल्यामुळे येणारी निवडणूक फोंड्यात बहुरंगी होणार, हे निश्चित आहे.
मंत्री रवी नाईक यांचा वाढदिवस १८ सप्टेंबरला असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यांचा पुढील वाढदिवस ऐन गणेशोत्सवात येत असल्यामुळे या वाढदिवसालाही बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी रवी रणशिंग फुंकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या वाढदिवसाच्या आयोजनाकरता एक समिती स्थापन केली असून कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून समिती झटताना दिसत आहे.
फोंडा मतदारसंघात कुर्टी हा झेडपीचा एकमेव मतदारसंघ असून तीन महिन्यांनी होणाऱ्या झेडपी निवडणुकीत कोण बाजी मारतो, यावरही या मतदारसंघातील समीकरणे अवलंबून आहेत. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मगोपच्या प्रिया च्यारी करत असून त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. आता भाजप कोणती भूमिका घेतो, पडद्यामागून काही वेगळी रणनीती आकाराला येते काय, यावर फोंडा मतदारसंघाची दिशा ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.