Goa Latest Political News Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; ...म्‍हणून भाजपकडून रितेशसह दळवींचे नाव

Goa Latest Political News: काँग्रेस पक्ष २०२७ची निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहे. २०२७ मध्ये २७ असा नारा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

...म्‍हणून भाजपकडून रितेशसह दळवींचे नाव!

येत्‍या ९ एप्रिल रोजी फोंड्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी रितेश नाईक आणि माजी नगराध्‍यक्ष विश्‍‍वनाथ दळवी या दोघांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवली होती. त्‍यातील रितेश नाईक यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब झाल्‍याचे निश्‍चित असून गुरुवारी त्‍यांचे नावही जाहीर होईल. माजीमंत्री रवी नाईक यांच्‍या सहानुभूतीपोटी भाजपला फोंड्याची उमेदवारी रितेश नाईक यांनाच द्यावी लागली असती. तेथे दुसऱ्याला उमेदवारी दिल्‍यास लोकांच्‍या नाराजीचा सामना करावा लागेल, हेसुद्धा भाजपला माहीत होते. परंतु, पक्षश्रेष्‍ठींकडून एकच नाव पाठवल्‍याबद्दल विचारणा होऊ नये, म्‍हणूनच भाजपने रितेश यांच्‍यासह दळवींचेही नाव जोडण्‍याचे नाटक केल्‍याच्‍या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. एकंदरीत फोंडा पोटनिवडणूक भाजप आणि काँग्रेसच्‍या उमेदवारांमध्‍येच रंगणार आहे. आप आणि आरजीपी हे दोन्‍ही पक्ष आपापले उमेदवार मैदानात उतरवत असले, तरी आप काही मते मिळवण्‍याचा प्रयत्‍न करेल. आरजीपीचा मात्र फोंड्यात अजिबात प्रभाव नसल्‍याने त्‍यांच्‍या उमेदवाराची भाजप, काँग्रेसला चिंता नसल्‍याचेही दोन्‍ही पक्षांचे कार्यकर्ते बोलत आहेत.

कितीजण काँग्रेसवासी होणार?

काँग्रेस पक्ष २०२७ची निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहे. २०२७ मध्ये २७ असा नारा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी दिला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्यापूर्वी काँग्रेसने मांद्रे, कुंभारजुवे, वास्को, नावेली, मडगाव येथे अनेकांना पक्षात घेतले. त्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपद भूषवलेल्या भाजपच्या संजना वेळीप व त्यांचे पती यांना निवडणूक अर्ज भरण्याच्या फक्त दोन दिवस अगोदर पक्षात घेवून गिरदोलीची उमेदवारी देण्यात आली. हल्लीच फोंडा मतदारसंघात मगोचे सक्रीय कार्यकर्ते असलेले डॉ. केतन भाटीकरांना पक्षात घेण्यात आले व आता त्यांना काँग्रेसची उमेदवारी दिली गेली. यामुळे, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या तिकिटावर डोळा ठेवून आणखी कितीजण कॉंग्रेसवासी होणार, याकडे मूळ कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या म्हणे नावेलीत ॲड. प्रतिमा कुतिन्हो, सांगेत मेशू, कुंकळ्ळीत सॅमी तावारीस, थिवीत किरण कांदोळकर अशा अनेक नावांची चर्चा सध्या कॉँग्रेस भवनात सुरू आहे.∙∙∙

विरोधकांची संधी

आचारसंहिता लागू झाली, की काही जणांना जणू राजकीय सणच लागतो. विरोधकांच्या मुलाखती पाहिल्यावर असे वाटते, की जणू आचारसंहितेचा सर्वात मोठा ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ तेच झाले आहेत. पण या सगळ्या गदारोळामागे खरा मुद्दा कोणता? तर अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपलेली फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक! त्यामुळे आता आचारसंहिता हा मुद्दा राजकीय भाषणांमध्ये ‘मसाला’ म्हणून वापरला जातोय, असे राजकीय जाणकार म्हणतात. विरोधकांना वाटते, की या अपप्रचारातून त्यांना राजकीय ऑक्सिजन मिळेल, तर सत्ताधारी भाजपला वाटते, की जनता इतकीही भोळी नाही. खरे तर प्रत्येक राजकीय संधीचा फायदा करून घेण्याची कला विरोधकांकडे असायला हवी. पण आजवरची त्यांची रणनीती पाहिली, तर अनेकदा संधी समोर उभी असते आणि विरोधक मात्र अजून बैठक घेत असतात! त्यामुळे आचारसंहितेच्या या गजरातून खरोखर राजकीय फायदा कोणाला होणार हा प्रश्न अजूनही हवेतच आहे. आता सर्वांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागले आहे. विरोधक यावेळी खरंच काही वेगळे डाव आखणार की पुन्हा एकदा ‘संधी आली आणि निसटली’ असे होणार? ∙∙∙

फोंड्यात काँग्रेसचा डाव!

फोंड्यात काँग्रेसने एक प्रकारे जुगार खेळला असल्याची चर्चा आता पक्षाच्याच गोटात सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या तोंडावर मगोप सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या केतन भाटीकर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाटीकर यांना उमेदवारी देण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात पक्षाच्या निष्ठावंतांना न दुखावण्याचा हा प्रयत्न आहे. भाटीकर यांचे फोंड्यात वजन आहे, ते जिंकून आले तर पक्षासाठी चांगलेच. पण येथे दगा-फटका झाला तर काही महिन्यांनी होणाऱ्या २०२७ च्या निवडणुकीत निष्ठावान कार्यकर्त्याचा विचार पक्षाकडून केला जाईल, असे म्हणण्यास त्यांना वाव आहे. त्याशिवाय आगामी निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी असल्याने भाटीकर निवडून आलेच तर ते काही कालावधीसाठी आमदार असतील, पण त्याचा परिणाम फोंड्यातील इतर मतदारसंघांवर पडेल, हा विचार करूनच कदाचित पक्षश्रेष्ठींकडून फोंड्यात पाऊल उचलले असावे, असे पक्षातील निष्ठावंताना वाटू लागले आहे. ∙∙∙

काँग्रेस लागली कामाला!

विधानसभेच्या फोंडा पोटनिवडणुकीत केवळ उमेदवार जाहीर करून काँग्रेस थांबलेली नाही. काँग्रेसचे राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे राज्यात डेरेदाखल झाले आहेत. त्यांनी फोंडा गट समितीची बैठक घेत पुढील निवडणुकीबाबत मार्गदर्शनही केले आहे. उमेदवार डॉ. केतन भाटीकर व उमेदवारीचे दावेदार होते असे राजेश वेरेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेत आम्ही सारे एकचा संदेश देण्यात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी यश मिळवले आहे. तरीही कॉंग्रेसला फोंड्यात आयात उमेदवाराचा सहारा घ्यावा का लागला, हा विषय चर्चेला येण्यापासून राहिलेला नाही. ∙∙∙

तिघांची गहन चर्चा

विधानसभेच्या फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसने डॉ. केतन भाटीकर यांना उमेदवारी जाहीर करून तूर्त आघाडी घेतली आहे. तेथे राजेश वेरेकर हे काँग्रेसचे नेते उमेदवारीसाठी इच्छुक होते. भाटीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वेरेकर काय करतील याकडे अनेकांचे लक्ष होते. त्या पार्श्वभूमीवर एका ठिकाणी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, भाटीकर व वेरेकर हातवारे करत चर्चा करत असल्याचे दिसून आले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्यावर आपापली मते व्यक्त करणे सुरू केले आहे. गहन चर्चेचा लोकांनी लावलेला अर्थ त्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. ∙∙∙

बाबूशचा आगळा प्रस्ताव

पणजी-ताळगावचे अनभिषिक्त सम्राट गणले जाणारे बाबूश मोन्सेरात यांनी महापालिका निवडणूक एकहाती जिंकल्यानंतर केलेली निवेदने अनेकांना चमत्कारिक वाटली. त्यांनी पुत्र रोहित याला आता विधानसभा निवडणुकीत उतरविण्याचा दिलेला संकेत अनेकांना अपेक्षितच होता. पण उत्पल पर्रीकर यांनी भाजपात प्रवेश करण्यास आपली हरकत नसल्याचे व त्यांनी अवश्य भाजपात यावे म्हणून केलेले निवेदन मात्र अनेकांना खटकले. कारण आजवरचा बाबूश यांचा स्वभाव पाहिला, तर ते अजब वाटते. कारण ते उत्पलना सहजासहजी माफ करतील का? याबाबत पणजीतील नागरिकांत चर्चा सुरू आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीतही विरोधकांच्‍या एकीत बेकी! आप, आरजीपीही देणार उमेदवार; 'मगोप' समर्थकांचा भाटीकरांना पाठिंबा

'आधी मुलाचा गळा घोटला, कीटकनाशक पिऊन संपवले जीवन'; बाप-लेक मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती उघड, चिठ्ठीमुळे उलगडले रहस्य

Rabies Vaccine Shortage: राज्यात रेबीजच्या लसींचा तुटवडा! सर्वसामान्य रुग्णांचे प्राण टांगणीला; धोका उंबरठ्यावर

Rashi Bhavishya: शुभ योगांचा संयोग! लवकरच मिळणार आनंदवार्ता; 'या' 3 राशींच्या लोकांसाठी महत्वाचा काळ

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT