मिलिंद म्हाडगुत
फोंडा: माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेली फोंड्याची जागा भरण्याकरता आवश्यक असलेली पोटनिवडणूक पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे.
१४ ऑक्टोबरला रवींचे निधन झाले असल्यामुळे १४ एप्रिल २०२६ पूर्वी फोंड्याची पोटनिवडणूक होणे अनिर्वाय ठरते. असे असले तरी भाजपची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
भाजपची स्वतंत्र निवडणूक प्रक्रिया असते, कोणीही मागणी केली म्हणून उमेदवारी दिली जात नाही. त्याप्रमाणे रितेश नाईक व फोंड्याचे नगरसेवक तथा भाजपचे दक्षिण गोव्याचे सचिव विश्वनाथ दळवी या दोन नावांवर विचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यात नावे वाढूही शकतात. नंतर ही नावे भाजपच्या केंद्रीय समितीकडे पाठवली जातील. त्यानंतरच शिक्कामोर्तब होईल.
फोंड्याची ही पोटनिवडणूक भाजप गांभीर्याने घेईल. त्याच्या निकालाचा २०२७ साली होणाऱ्या निवडणुकीवर परिणाम होणार असल्यामुळे सर्व चाचपण्या करूनच उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल, हे नक्की आहे. बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता सध्या मावळली असल्यामुळे उमेदवारी देताना उमेदवाराची संभाव्य ‘विनेबिलिटी’ जास्त लक्षात घेतली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
२०२७ सालाची निवडणूक होईपर्यंत तरी रवी पुत्रांना संधी द्यावी, अशी मागणी रवी गटाकडून तसेच ‘मगो’कडूनही केली जात आहे. विश्वनाथ दळवी हेही भाजपच्या उमेदवारीवर डोळा ठेवून गेली दीड-दोन वर्षे अनेक सामाजिक उपक्रम राबविताना दिसत आहेत. त्यात परत ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निकटवर्तीय म्हणून गणले जातात. तर सहानुभूती हा फॅक्टर रितेश यांच्या बाजूने असला तरी फेब्रुवारी-मार्चपर्यंत ही सहानुभूती कितपर्यंत टिकते याचाही आढावा घेतला जाईल.
अखिल गोमंतक भंडारी समाजाने जरी रितेशना उमेदवारी देण्याची मागणी केली असली तरी फोंडा मतदारसंघातील भंडारी समाजाने अजून आपले कार्ड खोललेले दिसत नाही. या मतदारसंघात भंडारी समाजाची जवळजवळ साडेपाच हजार मते असून ती निर्णायक ठरू शकतात. तूर्त निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.