पणजी : राज्यात बनावट दस्तावेजचा वापर करून जमीन हडपप्रकरणी खळबळ माजवलेल्या प्रकरणाच्या चौकशीतून अटक केलेल्या संशयितांकडून आज शुक्रवारी काही राजकारण्यांची नावे समोर आली आहेत. त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे हाती आल्यावर त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील. त्यामुळे राज्यातील जमीन खरेदी प्रकरणात गुंतलेल्या अनेक राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणातील तीन मास्टरमाईंड्स रॉयसन रॉड्रिग्स याला मुंबईत विमानतळावर तर राजकुमार संतोष मैथी व सँड्रिक डॉम्निक फर्नांडिस यांना गोव्यातून अटक करून 5 दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. या त्रिकुटाने गोव्यातील सुमारे 2 लाख चौ. मी. जमीन हडप करून सुमारे 95 भूखंड मालमत्तेपैकी काहींची विक्री केली तर काही आपल्या नातेवाईकांच्या नावावर केल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत काही राजकारणी एसआयटीच्या जाळ्यात अडकणार आहेत.
(Goa Land Grabbing Case)
एसआयटीच्या तपासकामावर देखरेख करत असलेले पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले, गेले काही दिवस या प्रकरणातील शिवोली येथील मास्टरमाईंड रॉयसन रॉड्रिग्ज हा पोलिसांना चकवत होता. जमीन हडपप्रकरणी चौकशी सुरू झाल्याने तो दुबईमध्ये (यूएई) गेला होता.
तो भारतात येणार असल्याची माहिती मिळाल्यावर एसआयटी पथकाचे पोलिस मुंबई विमानतळावर तैनात करण्यात आले होते. तो विमानतळाबाहेर पडताच त्याच्या मुसक्या आवळल्या. हणजूण येथील सर्वे क्रमांक ४९३/२ मध्ये असलेल्या जमिनीचे बनावट दस्तावेज करून म्युटेशनसाठी ते बार्देश मामलेदार कार्यालयात सादर केले गेल्यावर रॉयसन रॉड्रिग्ज याच्या तिघा साथींना एसआयटीने अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रॉयसन याला गजाआड करण्यात आले, अशी माहिती महानिरीक्षक बिष्णोई यांनी दिली.
ठोस पुरावे जमा करणे सुरू
जमीन हडप प्रकरणी ज्या संशयितांना जामीन मिळाला आहेत, त्यातील काहीजण इतर गुन्ह्यांमध्येही सामील आहेत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या प्रकरणांमध्ये अटक होणार आहे. संशयितांना जामीन मिळू नये यासाठी ठोस पुरावे जमा करण्यात येत आहेत. रॉयसन, विक्रांत, राजकुमार, सँड्रिक, महम्मद सुहेल हे पाच जणांनी राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस दस्तावेज तयार करून जमिनींची विक्री केली आहे. ते सर्वजण या घोटाळ्यातील मास्टरमाईंड आहेत.
रॉयसन रॉड्रिग्सचा प्रताप
रॉयसन याने सुमारे 1 लाख 30 हजार चौ. मी. बनावट दस्तावेज तयार करून जमीन हडप केली होती व त्यामध्ये 61 भूखंड तयार केले होते. या मालमत्तेसंदर्भात एसआयटीकडे 12 तक्रारी आहेत. त्यामध्ये हणजूण-3, आसगाव-9 भूखंड प्रकरणांचा समावेश आहे.त्याने आतापर्यंत बनवेगिरी करून 8 मालमत्तांचे म्युटेशन स्वतःच्या नावावर करण्यास यश मिळवले आहे. त्याची पुरातत्व खात्यातील रेकॉर्ड्सचे बनावट दस्तावेज तयार करत अधिकृत असल्याचे भासवून त्याचे म्युटेशन करून घेण्याची मोडस ऑपरेंडी (कार्यपद्धत) होती.
सँड्रिक फर्नांडिसची बनवेगिरी
दुसरा मास्टरमाईंड सँड्रिक फर्नांडिस याने अंतोनिता फर्नांडिस, मारिया फर्नांडिस, कविता लंकेप्पानावर व श्रीधरा कट्टीमणी यांच्याशी संगनमत करून नेरूल येथील सर्वे क्रमांक 63/6 मधील सुमारे जमिनीचे बनावट दस्तावेजाद्वारे विक्री केली. त्याने सुमारे 64,782 चौ. मी. जमिनीमधील 26 भूखंड मालमत्तेपैकी काही विकले तर काही साथीदारांच्या नावे केले. त्याने कळंगुट, हणजूण, पर्रा, नेरूल भागातील अनेक जमिनींचे बनावट दस्तावेज तयार केलेल्याचे आरोप त्याच्यावर आहेत.
मतभेदामुळे दोन गट निर्माण
राजकुमार मैथी व महम्मद सुहेल तसेच रॉयसन रॉड्रिग्स व सँड्रिक फर्नांडिस यांचे दोन ग्रुप होते. हे सगळे जमिनींचे गैरव्यवहार करत असत. काही दिवसांनी राजकुमार मैथी हा विक्रांत शेट्टी याचाही साथीदार होता. या दोन गटातील मतभेदामुळे ते वेगळे झाले व त्यानंतर सँड्रिक व राजकुमार यांनी आपापले स्वतःचे वेगळे गट केले. त्यासाठी त्यांनी पूर्वीची बँक खाती बंद करून नव्याने प्रत्येकी 9-10 बँकेत खाती उघडली.
नेत्यांचे धाबे दणाणले
जमीन हडप प्रकरणात काही राजकारण्यांची नावे समोर असल्याचा बॉम्बस्फोट एसआयटीने केल्याने अनेक नेते बिथरले आहेत. माहितीनुसार, या एसआयटीच्या चौकशीत एका विद्यमान आमदाराचे तसेच विधानसभा निवडणुकीतील एका पडेल उमेदवाराचे नाव पुढे आले आहे. त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यांचा या प्रकरणाशी लागेबांधे असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.
2 लाख चौ. मी. जमिनीत 95५ मालमत्तांचा व्यवहार
..तर एसआयटीशी संपर्क साधा
या प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटीला मोकळीक दिली आहे. गैरव्यहारातील आरोपींना गजाआड करण्यासाठी कसून चौकशी सुरू आहे. मालकांनी आपापल्या जमिनींची महसूल व उपनिबंधक कार्यालयात जाऊन मालकी हक्क आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी. संशय असल्यास एसआयटीशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस महानिरीक्षक ओमविर सिंग बिष्णोई यांनी केले.
मुख्य सूत्रधार राजकुमार मैथी : मिरामार येथे राहत असलेल्या मास्टरमाईंड राजकुमार संतोष मैथी याने आसगाव येथील सर्वे क्रमांक 223/7 मधील जमिनीचे बनावट दस्तावेज करून दामोदर काकोडकर, गुलाब काकोडकर, अमृत गोवेकर या तिघांनी उपनिबंधकासमोर ते अधिकृत म्हणून सादर केले. चौकशीवेळी मुख्य सूत्रधार राजकुमार मैथी असल्याचे उघड झाले.
150 तक्रारी
विविध पोलिस स्थानकातील जमीन हडप प्रकरणाच्या 28 तक्रारी तसेच एसआयटीने नव्याने नोंद केलेल्या 10 तक्रारी मिळून 38 तक्रारींचा तपास सुरू आहे.
आतापर्यंत या एसयआटीकडे राज्यभरातून सुमारे 150 हून अधिक तक्रारी आल्या असून त्याची प्राथमिक चौकशी सुरू आहे.
महसूल व उपनिबंधक तसेच पुरातत्व खात्याकडून त्याची पडताळणी करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये एसआयटीने 15 जणांना अटक केली आहेत.
त्यातील काहीजण जामिनावर तर काहीजण न्यायालयीन कोठडीत आहेत अशी माहिती पोलिस अधीक्षक व एसआयटी प्रमुख निधीन वॉल्सन यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.