पणजी: ६३७ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अरविंद रेमेडीज लिमिटेड आणि त्यांचे प्रवर्तक अरविंद बी. शाह यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आहेत. संचालनालयाकडून चेन्नई, कोलकाता आणि गोव्यात छापे टाकले जात आहेत.
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. पीएनबीने याबाबत सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. अरविंद रेमेडीज लिमिटेड आणि त्यांच्या प्रवर्तकांनी सुमारे ६३७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
हा घोटाळा केवळ पंजाब नॅशनल बँकेपुरता मर्यादित नसून, युनायटेड बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, अलाहाबाद बँक, करूर वैश्य बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि कॉर्पोरेशन बँक यासारख्या इतर बँकांमध्येही फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या सर्व बँकांनी कंपनीला एकूण ७०४ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज दिल्याचे तपासातून समोर आले आहे.
चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, कर्जाची रक्कम व्यवसायात गुंतवण्याऐवजी कंपनीने बनावट कंपन्या (शेल कंपन्या) आणि बेनामी खात्यांद्वारे काढून घेतली. ईडीने कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांशी संबंधित २९४ बँक खात्यांची चौकशी केल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली होती. या फसवणुकीमुळे २०१४ ते २०१५ दरम्यान या सर्व बँकांच्या खात्यांना नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (NPA) घोषित करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.