Subodh Kerkar Dainik Gomantak
गोवा

Subodh Kerkar : बापरे! निर्बुद्ध कला उद्यानासाठी 9 कोटी!!

‘घनकचरा व्‍यवस्‍थापन’ची योजना; प्रसिद्ध चित्रकार सुबोध केरकर यांचा आक्षेप

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : गोवा घनकचरा व्‍यवस्‍थापन महामंडळातर्फे तब्‍बल 9 कोटी रुपये खर्च करून कांपाल-पणजी येथील भगवान महावीर उद्यानात ‘टाकाऊ वस्‍तूंचा वापर करून कला उद्यान’ साकारण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी निविदा काढण्‍यात आली आहे. तथापि, त्‍यात अनेक त्रुटी, कलात्‍मक दृष्‍टिकोनाचा अभाव असल्‍याचा आरोप करत प्रसिद्ध चित्रकार सुबोध केरकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. उपरोक्‍त निर्बुद्ध संकल्‍पनेतील फोलपणाही त्‍यांनी समोर आणला आहे. सरकारला कलेमधील ओ की ठो कळत नसताना या विषयात लुडबूड का करावी, असा केरकर यांचा थेट सवाल आहे.

कल्‍पकतेला वाव नाही!

9 कोटी खर्चून कला उद्यान उभारण्‍याची संकल्‍पना ही मुक्‍त गोव्‍यातील पहिलीच असेल. कलाकारांनी टाकाऊ साहित्‍यातून शिल्‍पे घडवावी व त्‍यातून उद्यान साकारावे, अशी संकल्‍पना आहे; परंतु त्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या निविदेत इतक्‍या त्रुटी आहेत की कलाकारांच्‍या कल्‍पकतेला योग्‍य वाव मिळण्‍याची शक्‍यता कमीच! कलेची संकल्‍पना समजून घेताना एक सर्जनशील नजर लागते. कलेचा इतिहास व कलात्‍मकतेच्‍या विविध पैलूंचा अभ्‍यास केल्‍याशिवाय कोणताही कलाकार आधुनिक पद्धतीने शिल्‍प घडवू शकत नाही. भारतात सार्वजनिक कलादालने वाईट पद्धतीने तयार होण्‍याचे कारणच निर्णयक्षमतेत खोट असणे हे आहे.

कलेचा खेळखंडोबा

केरकर पुढे म्‍हणतात, उद्यान साकारण्‍यासाठी जी निविदा जारी करण्‍यात आली आहे, त्‍यानुसार चित्रकार वा स्‍थापत्‍यकारांनी टाकाऊ वस्‍तूंपासून ‘आयफेल टॉवर’, ‘पिरॅमीड’, ‘झुलता मनोरा’, ‘रोमन कोलोजियम’, ‘ख्रिस्त द रिडीमर’, ‘स्‍टॅच्‍यू ऑफ लिबर्टी’, ‘ताजमहाल’ या प्रतिकृती साकारणे अपेक्षित आहे. या साऱ्या संकल्‍पना कशा साकाराव्‍या याबाबत जर सरकार कलाकारांना सूचना करत असेल तर कलाकारांची कल्‍पकता, सौंदर्यदृष्‍टी काय कामाची? कलाकार हा सांधेमोड करणारा मेकॅनिक असतो का? उपरोक्‍त निविदा म्‍हणजे बेजबाबदार पद्धतीने कलेचा केलेला खेळखंडोबा होय.

केरकर म्‍हणतात...

1 सरकारी प्रतिनिधी जरी गोमंतकीय कलाकारांना सहभागी होण्‍याची विनंती करत असले तरी प्रकल्‍पासाठी निविदा इसारा रक्‍कम ही 17 लाख 85 हजार 816 रुपये आहे. जी कोणाही गोमंतकीयाला परवडणारी नाही.

2 अस्‍तित्‍वात असलेल्‍या स्‍मारकांच्‍या प्रतिकृती जर साकारायच्‍या तर त्‍यातून अभिजाततेला काय वाव राहिला? गोव्यातील कलाकार स्‍वतंत्र कलाकृती तयार करण्यास असमर्थ आहेत, असे सरकारला वाटते का?

3 महामंडळाने कला क्षेत्रातील धुरिणांना बोलावून, त्‍यांची मते जाणून घेऊन मगच कला उद्यान साकारण्‍यासाठी चित्रकार, स्‍थापत्‍यविषयक तज्‍ज्ञांची नेमणूक करावी.

8 रोजी निषेध नोंदवणार

सध्‍याच्‍या निविदेत अनेक त्रुटी असल्‍याने ती त्‍वरेने मागे घ्‍यावी, अशी मागणी करत सरकारच्‍या निर्बुद्धतेचा निषेध करण्‍यासाठी शनिवार, 8 ऑक्‍टोबरला सायंकाळी 5 वाजता पिळर्ण येथील म्‍युझियम ऑफ गोवा येथे कलाप्रेमी एकत्र येणार आहेत. त्‍यासाठी केरकर यांनी पुढाकार घेतला आहे.

दुय्‍यम गोष्‍टीच निपजणार

एखादा मंत्री वा नोकरशहा कलाविषयक संकल्‍पना तयार करू लागला तर त्‍यातून चांगल्‍यापेक्षा दुय्‍यम गोष्‍टी निपजण्‍याची शक्‍यता असते. ज्‍यांच्‍याकडे खूप अभ्‍यास, अनुभव, प्रावीण्‍य असते अशाच लोकांच्‍या हाती हा विषय द्यावा. तुम्‍हाला जर हृदयाची समस्‍या असेल तर तुम्‍ही संबंधित डॉक्‍टरकडे जाता की आरोग्‍य सचिवांकडे, असा सवालही केरकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT