Ratris Khel Chale viral video: सध्या गोव्यातील पिर्णा येथील रस्त्यांवरील स्ट्रीट लाईटच्या दुरवस्थेवर आधारित एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका नागरिकाने रात्रीच्यावेळी अपुऱ्या प्रकाशामुळे निर्माण झालेल्या धोक्याची गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पिर्णा परिसरातील रस्त्यांवर रात्रीच्यावेळी पुरेशी प्रकाशयोजना नसल्यामुळे हा परिसर अक्षरशः अंधारात बुडालेला असतो.
समीर शेट्ये नावाच्या इन्स्टाग्राम चॅनलवरून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने दाखवले आहे की, रस्त्यावरील लाईट केवळ खांबाखाली उभ्या असलेल्या व्यक्तीलाच स्पष्टपणे दिसू देतात आणि बाकी कशाचाही थांगपत्ता लागत नाही.
शेट्ये यांनी प्रशासनाच्या या कामावर बोट ठेवताना एका प्रसिद्ध मराठी गाण्याचा मिश्किल वापर केला आहे. ते म्हणतात, "रात्रीस खेळ चाले, हा खेळ लाईटीचा, संपेल ना कधीही हा खेळ सरकारचा." या गाण्यातून त्यांनी केवळ रस्त्यावरील लाईटच्या समस्येकडेच नव्हे, तर प्रशासनाच्या कामकाजातील विसंगतीकडेही लक्ष वेधले आहे.
व्हिडिओमध्ये त्यांनी थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मुख्यमंत्री नेहमीच गोमंतकीयांना "भिवपाची गरज ना" (घाबरण्याची गरज नाही) असा धीर देत असतात. मात्र, रात्रीच्यावेळी रस्त्यांवर असलेले हे धोकादायक वातावरण पाहता, सामान्य नागरिकांनी नेमके काय करावे? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रात्रीच्यावेळी या स्ट्रीट लाईट्स वारंवार चालू-बंद होत असतात. यामुळे अंधारात वावरण्याची भीती वाढते आणि अपघात होण्याची शक्यताही बळावते. शेट्ये यांच्या या मिश्किल पण अत्यंत गंभीर व्हिडिओमुळे पिर्णा येथील लाईटची समस्या केवळ स्थानिक मुद्दा राहिली नसून, ती प्रशासकीय कारभारावर बोट ठेवणारी एक राष्ट्रीय चर्चा बनली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.