Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज, टॅक्सीचालकांचा रोष; माजी सरपंच अडचणीत?

Khari Kujbuj Political Satire: गेल्या पाच वर्षा पासून राज्य सरकार गोव्यात आयआयटी कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी जागेच्या शोधात फिरत आहे.

Sameer Panditrao

टॅक्सीचालकांचा रोष; माजी सरपंच अडचणीत?

पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांनी सहा महिन्यांपूर्वी आपल्यासाठी सहा महत्त्वाच्या मागण्या मांडत आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट लाभली आणि त्या मागण्यांतील पाच मागण्या मान्य झाल्या. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने टॅक्सीचालकांमध्ये नाराजी पसरली आहे. ही नाराजी आता मागण्यांपुरती राहिलेली नसून आंदोलनाचा फायदा घेऊन स्वतःचे राजकीय समीकरण साधणाऱ्या एका नेत्यावर टॅक्सीचालकांनी रोष व्यक्त करायला सुरुवात केली आहे. म्हणे, हा नेता पेडणे तालुक्यातील माजी सरपंच असून, त्याने आंदोलनाच्या वेळी आपली वेगळीच समीकरणे साधली. त्यामुळे टॅक्सीचालक आता त्याला लवकरच धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. मोपा विमानतळ ते किनारी भागातील टॅक्सीचालकांत हा विषय चर्चेचा बनला आहे. टॅक्सीचालकांचा रोष लक्षात घेता, संबंधित माजी सरपंचाला आता राजकीय भविष्यासाठी नवा डाव खेळावा लागणार का, हाच प्रश्न आहे! ∙∙∙

म्हणे आयआयटीची पायाभरणी !

अजून नवरीच पाहिली नाही आणि लग्नासाठी मुहूर्त ठरवला तर त्याला काय म्हणणार? गेल्या पाच वर्षा पासून राज्य सरकार गोव्यात आयआयटी कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी जागेच्या शोधात फिरत आहे. काणकोणपासून सांगे व सांगेपासून सत्तरीत भ्रमण केल्यावर सरकारला योग्य अशी जागा सापडलेली नाही. असे असले तरी मुख्यमंत्री विश्वासाने सांगतात की, येणाऱ्या दिवसांत सरकार आयआयटी कॉम्प्लेक्स चे भूमी पूजन नक्कीच करणार. याचा अर्थ सरकारला आयआयटी जागा सापडलेली आहे. ही जागा सरकारच्या ताब्यात आहे. आता ही जागा बेतुल पठारावर आहे की, तालीगांव पठारावर हे मात्र आयआयटी गोवा व मुख्यमंत्रीच जाणोत. ∙∙∙

रेती उपशावर नजर कुणाची?

रेती उपशासाठी आता परवानगी दिली खरी, पण या उपशावर कुणाची नजर राहील, ते मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण मागच्या काळात रेती उपशावर निर्बंध असले तरी चोरट्या मार्गाने रेतीचा उपसा आणि रेतीची वाहतूक बिनधास्तपणे सुरू होती. खुद्द पोलिस आणि बंदर कप्तान खात्यासह इतर संबंधितांकडून पूर्णपणे डोळेझाक चालल्यामुळे रेती माफियांचे फावले होते. रेतीला अव्वाच्या सव्वा दर वाढवून गरजवंतांना मेटाकुटीला आणणारे हे रेती माफिया गब्बर झाले होते. त्यामुळे आता सरकारची कायदेशीर परवानगी मिळाल्यामुळे रेती माफिया काय करतील, हे सांगता येणार नाही, त्यामुळे अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा राबवायला हवी, अन्यथा आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो, असा प्रकार गोव्याच्या रेती व्यवसायाबद्दल होईल, हे निश्‍चित.∙∙∙

पार्सेकरांचे स्पष्ट बोल

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. काहीजणांना ते बोलणे फटकळपणाचे वाटते. मंगळवारी त्यांना मांद्रेतील बेकायदेशीरपणाबद्दल पत्रकारांनी विचारले. मांद्रेचे आमदार कसे काम करतात, यावर त्यांची टिप्पणी ऐकण्याचा काहींनी प्रयत्न केला. त्यावर चटकन पार्सेकर यांनी त्यांना कोणी निवडून दिले ते विचार करतील, असे म्हणाले. तेही मांद्रेतील मतदार असल्याकडे लक्ष वेधले असता आपण जीत आरोलकर यांना मत दिले नाही, असे सांगून पार्सेकर निघाले. ∙∙∙

म्हापसा अन् राजकीय चर्चा...

अलीकडेच कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी म्हापसा शहरातील कचरा व्यवस्थापन व इतर विषयांवरून स्थानिक लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले होते. श्री देव बोडगेश्वराने येथील लोकप्रतिनिधींसह पालिकेला सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना लोबोंनी केली होती. जेणेकरून शहरातील प्रश्न सोडविले जातील. दुसरीकडे, आगामी पालिका निवडणुकीत लोबो हे आपले पॅनेल उभे करणार, अशा बातम्या समोर येताहेत. लोबोंचे म्हापशावर विशेष प्रेम किंबहुना त्यांना मतदारसंघात रस आहे. हे कुणापासून आता लपून राहिलेले नाही. नुकताच, स्थानिक आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा हे विदेश दौऱ्यावरून गोव्यात परतले आहेत. त्यांची सोमवारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जोशुआंच्या घरी जाऊन भेट घेतली. मंत्र्यांनी जोशुआ यांना वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोबोंचा म्हापशातील वाढता हस्तक्षेप तसेच मंत्री राणेंनी जोशुआंची घेतलेली गाठभेट हा निव्वळ योगायोग म्हणायचा की, नव्या राजकीय समीकरणांची नांदी? ∙∙∙

‘टाईम विल डिसाईड’

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज मंत्रालयात उपस्‍थिती लावून आपल्या मनात असलेल्या काही गोष्टी दिलखुलासपणे उघड केल्या. प्रत्यक्षात जरी मी राजकारणात नसलो तरी वेळ आली की पुन्हा येईन. नवा भाजप प्रदेशाध्यक्ष हा माझा जवळचा मित्र व एकत्र काम केले आहे. भाजपमध्ये नसलो तरी मनाने आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भाजपपासून दूर झालो तरी इतर पक्षात गेलो नाही. सध्या शिक्षण क्षेत्रात कार्यात खुश आहे व दुसऱ्या बाजूने मांद्रेवासीयांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मांद्रेमध्ये जी कामे होत आहेत की नाही यासंदर्भात आमदाराला निवडून आणले त्या मतदारांनी ठरवायला हवे. त्यावर मी कशाला मत व्यक्त करू, असे मिश्‍किल हास्य करत उत्तर दिले. ‘पार्सेकर सर’ हे धूर्त राजकारणी असल्याने त्यांच्याकडून काही गोष्टी वदवून घेताना ते विचार करतात. भाजपमध्ये एक ना एक दिवस पुन्हा संधी मिळेल, अशी त्यांना आशा आहे. त्यांना भाजपमध्ये घेतले तर जाणार का, याचे उत्तर देताना काही सेकंद विचार करत त्यावर कोणताही अभिप्राय न करता ‘टाईम विल डिसाईड’ म्हणत हसत हसत प्रश्‍न टाळतात. ∙∙∙

दामूंचा आवाज

भाजपच्या विधिमंडळ गट बैठकीत मंगळवारी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा आवाज अनेकांच्या लक्षात राहिला. माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे किंचित नरम आवाजात बोलायचे. समोरच्या व्यक्तीला समजवण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्या तुलनेत दामू यांचे थेट बोलणे अनेकांना धक्का देणारे ठरल्याची चर्चा आहे. दिल्लीतील वरिष्ठांना अहवाल देणे आपल्या हाती असल्याकडे त्यांनी केलेला अंगुलीनिर्देश अनेकांना इशारा वाटला आहे. त्याची चर्चा आता सत्ताधारी वर्तुळात सुरू झाली आहे. ∙∙∙

पार्सेकर दरवाजातच!

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर भाजपमध्ये कधी परतणार हा उत्सुकतेचा विषय आहे. मंगळवारी ते मंत्रालयात कामानिमित्त आले असता हा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. तेव्हा ते मी घराबाहेर कुठे आहे, मी दुसऱ्या घरात गेलेलो नाही, असे म्हणाले. शिंगाला शिंगे लागली म्हणून दरवाजाबाहेर पडलो, असा शब्दप्रयोग त्यांनी केला. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष दामू हे जीवलग मित्र असल्याचे सांगून त्यांनी जाता जाता काही संकेतही देण्याचा प्रयत्न केला. बदलत्या राजकारणात त्यांचे काय होणार हे आताच सांगणे कठीण असले तरी पार्सेकर यांनी भाजपात घरवापसीची आशा सोडलेली नाही, हे स्पष्ट मात्र झाले आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

SCROLL FOR NEXT