पेडणे मतदारसंघामध्ये भाजपचे प्रवीण आर्लेकर आमदार असले तरी पक्षाचे मूळ कार्यकर्ते त्यांच्यासोबत किती आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या मुशीतील कार्यकर्ताच आमदार झालेला हवा आहे. तालुक्याचा सुपुत्र आमदारपदी पोचावा, असे अनेकांना वाटते. गेल्या काही वर्षांत स्थानिक व्यक्ती आमदारपदी न पोचल्याने राजकारणात नसलेल्या व्यक्तींनाही पेडण्यातील व्यक्ती आमदार व्हावी असे वाटू लागले आहे. असा विचार करणाऱ्या व्यक्ती आणि भाजपचे मूळ कार्यकर्ते एकत्र आले तर वेगळेच चित्र पेडणे मतदारसंघात दिसू शकते, अशी चर्चा स्थानिक पातळीवर ऐकू येत आहे. ∙∙∙
बायणा येथील दरोडा पडल्यानंतर सांताक्रूझमध्ये चोरीची घटना घडली. दोन्ही घटना लागोपाठ घडल्याने विरोधकांना पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर दरोडा, खून, चोऱ्या अशा प्रकरणांनी मागील काही दिवसांत प्रसारमाध्यमांना मोठा खुराक मिळाला. दोनापावला, म्हापसा येथील दरोड्यांत अजूनही पोलिस हवेत बाण चालवीत आहेत, असेच दिसते. आता बायणा व सांताक्रूझमधील घटनांनी पोलिसांच्या रात्रपाळीच्या गस्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याशिवाय पोलिसांनी मध्यंतरी भाडेकरूंची तपासणी सुरू केली, त्यातून गुन्हे कमी होतील असे वाटत होते. परंतु गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले असल्याने विरोधकांनी सकाळपासून सरकारवर आसूड ओढण्याचे काम सुरू ठेवले असल्याचे दिसून येते. ∙∙∙
‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्य संशयित पूजा नाईकने सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांचे नाव घेतले, त्यामुळे ‘साबांखा’तील त्यांच्या विरोधातील गटात कमालीचे आनंदाचे वातावरण आहे. हा गट उघडपणे आनंद व्यक्त करी नाही; पण मत व्यक्त करतो. काहींना वाटते पार्सेकरांचीच नार्को टेस्ट केल्यास काय, काय बाहेर येईल. तसे पाहिले तर पार्सेकरांबद्दल बाहेर बरेच काही बोलले जाते. याशिवाय अनेक खात्यातील अधिकाऱ्यांना त्यांची कुंडलीच माहीत आहे. विशेष बाब म्हणजे नॅशनल थिएटरजवळील एका हॉटेलमध्येही ते येऊन गेल्यावर उलट-सुलट चर्चा सुरू असते, यावरून त्यांच्या कार्याचा (करामतीचा) अंदाज येतो. ∙∙∙
उत्पल पर्रीकरांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत वाढदिवस साजरा केला. महालक्ष्मी मंदिरात सायंकाळी काही समर्थकांसमवेत जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी महालक्ष्मी ट्रस्टमध्ये शुभेच्छांचा स्वीकार केला. काही महिन्यांवर महानगरपालिका निवडणूक आली आहे आणि त्यांनी या निवडणुकीत पॅनल उभे करणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या पॅनलकडून इच्छुक उमेदवार समर्थकांसमवेत त्यांच्यासमवेत मंदिरात येतील, याकडे विशेष करून भाजपच्या नेत्यांचे लक्ष लागून होते. यूट्यूबवरील खासगी चॅनलवरून उत्पल मंदिरात आल्याचे दाखविल्याने भाजप नेत्यांना जरा हायसे वाटले असेलही; परंतु ट्रस्टच्या कार्यालयात जे कोणी शुभेच्छा देऊन गेले, ते कोण होते, याचा आता काहीजण शोध घेऊ लागले आहेत. परंतु त्यांच्यापासून अंतर ठेवून असणारे; पण त्यांना मानणारा एक गट भाजपमध्ये आहे आणि त्यांनी त्यांना मोबाईलवरूनच शुभेच्छा दिल्या, हेही काही कमी नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.∙∙∙
दरोडे, खून, मारामाऱ्या अशा घटनांनी गोवा पुन्हा एकदा जगभरात गाजत आहे. मंगळवारी बायणात पडलेल्या दरोड्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे स्थानिकांसह पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण पसरत चालले आहे. तरीही सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा पोलिसांवरील विश्वास तसूभरही कमी झालेला नाही. हल्ली हल्ली तर ते ‘पक्षाचे काही असेल तर मला विचारा आणि सरकारचे काही असल्यास मुख्यमंत्र्यांना विचारा’ असे थेटपणे सांगत आहेत. कायदा-सुव्यवस्थेबाबत भाष्य करणे तर त्यांनी जवळपास सोडून दिले आहे. त्यामुळे सरकारचे कायदा-सुव्यवस्थेसंदर्भातील अपयश झाकण्यासाठी दामू अशी भूमिका घेत आहेत की याला अन्य कारण आहे? असा प्रश्न जनतेला पडला आहे. ∙∙∙
‘ओला, उबेर’ राज्यात येणार, अशी चर्चा काहीशी शमल्यानंतर टॅक्सी संघटनांनी आपल्या मागण्या पुन्हा पुढे केल्या आहेत. पर्यटकांच्या जाचामुळे आम्हीही त्रासलोत. आमचे नाव बदनाम केले जात आहे. आमच्या समस्या अजून सुटलेल्या नाहीत, अशा शब्दांत काणकोणच्या टॅक्सीवाल्यानी मंगळवारी फातोर्डा पोलिस स्थानकासमोर एकत्र येत संताप व्यक्त केला. पर्यटन हंगामात टॅक्सीवाल्यांना आपल्या प्रश्नांची आठवण कशी काय झाली, याबाबत काहींनी प्रश्नही उपस्थित केले. मंगळवारी आधी व्यावसायिक ट्रक मालक संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर काही तास उलटले नाहीत तोच टॅक्सीवाले आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांसोबत आमचीही बैठक घ्या, अशी मागणी त्यांनी केली. टॅक्सीवाल्यांचा विषय आता सरकारलाही नवा नाही, मात्र तो आजच का? पडद्यामागे कोणी आहे का? अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙
गणेशपुरी-म्हापसा येथे डॉ. घाणेकरांच्या घरात दरोडा पडला. त्यांनतर शहरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा मुद्दा ऐरणीवर आला. या दरोड्याला ४० दिवस उलटले तरीही शहरात सीसीटीव्हीचा थांगपत्ता नाही. म्हापसा पालिकेने खासदार निधीअंतर्गत शहरात सीसीटीव्हीचे जाळे विणण्याचे योजिले आहे. तसा प्रस्ताव संबंधित खासदारांना पाठवून दिला आहे. मात्र, अद्याप तरी हालचाल दिसत नाही. जर प्रशासनाने ठरविले तर एका दिवसांत कामे मार्गी लागू शकतात. तर मग सीसीटीव्ही काय चीज आहे! त्यामुळे खासदार भाऊंनी हा विषय जरा मनावर घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ही प्रतीक्षा आणखीन लांबते की शहरातील रवींद्र भवनसारखी एक दिवास्वप्न बनून राहते, ही चिंता म्हापसेकरांना पडली आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.