Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; बिबट्यालाही राहायला फ्लॅट हवा!

Khari Kujbuj Political Satire: १९९३ साली प्रकाश वेळीप यांनी गोवा विधानसभेत गौड मराठा समाजाला ‘एसटी’ म्‍हणून दर्जा न देता अतिमागास जाती म्‍हणून दर्जा द्यावा, अशी मागणी करणारा ठराव मांडला होता.

Sameer Panditrao

बिबट्यालाही राहायला फ्लॅट हवा!

पेडणे तालुक्यातील अमेरे वस्तीमध्ये नुकताच एक ‘नवीन’ रहिवासी अवतरला. तोही कोणाचा पाळीव प्राणी नाही, तर थेट बिबट्या! रामकांत ज्ञानदेव अमेरकर यांच्या पाळीव कुत्र्यावर रात्रीच्या वेळेस झालेला हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आणि गावकऱ्यांना एकाच वेळी भीतीचा अन् विश्‍वासाला धक्का बसला – कारण इथं आता प्राण्यांनाही घरं महाग झाली आहेत बहुतेक! गावात पूर्वी कुत्रे भुंकायचे, आता बिबटे गुरगुरतात. वनविभाग मात्र अजूनही त्यांच्या ‘गतीने’ जागा होतो आहे. गावकऱ्यांना वाटते, पुढच्या वेळेस बिबट्या चहा प्यायला येईल, फक्त सोबत पार्सल घेऊन निघू नये म्हणजे झालं! ‘बिबट्याची जागा जंगलात, पण आता जंगलच शहरात आलंय’, अशी चर्चा सुरू आहे. सध्यातरी पाळीव प्राण्यांना बाहेर सोडताना ‘सीसीटीव्ही’ बघा आणि मगच पायरी पार करा, असा नवीन शहाणपणाचा नियम गावात लागू झाला आहे. . ∙∙∙

प्रकाश खरेच ‘एसटी’साठी लढले का?

‘उटा’ संघटनेच्‍या कामकाजावर जिल्‍हा निबंधकांकडून अंकुश आल्‍यावर मागच्‍या आठवड्यात ‘एसटी’ समाजाच्‍या अन्‍य नेत्‍यांबरोबर घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत प्रकाश वेळीप यांनी एसटी समाजाला त्‍याचे अधिकार मिळावेत यासाठी सगळे प्रयत्‍न आम्‍ही केले होते, असे सांगून भाजप सरकारला कमी दाखवायचा प्रयत्‍न केला होता. त्‍यानंतर भाजपनेही आपल्‍या ‘एसटी’ मोर्चाचा वापर करीत प्रकाशरावांचे वाभाढे काढले. १९९३ साली प्रकाश वेळीप यांनी गोवा विधानसभेत गौड मराठा समाजाला ‘एसटी’ म्‍हणून दर्जा न देता अतिमागास जाती म्‍हणून दर्जा द्यावा, अशी मागणी करणारा ठराव मांडला होता. सध्‍या प्रकाशरावांचा हा ठराव समाज माध्‍यमांवर फिरू लागला आहे. प्रकाश वेळीप यांना ‘एसटी’चे एवढे पडून गेले होते तर त्‍यांनी या समाजाला ‘एसटी’ दर्जा देऊ नये म्‍हणून का ठराव मांडला, असा सवाल आता विचारू लागलेत. ∙∙∙

राजेशाही थाटाचे काय?

मावळते राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई ही दानशूरतेसाठी प्रसिद्ध असले तरी करदात्यांच्या पैशातून दर आठवड्याला केरळचा दौरा करायचे. त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचा लवाजमा असायचा. ते तेथील कार्यक्रमांत रमायचे. राजभवनावर कधीही कोणी राज्यपालांविषयी विचारणा केली ते केरळच्या दौऱ्यावर असल्याची माहिती दिली जायची. त्यांनी केरळवरूनच आपले सारे कर्मचारी आणले होते. माध्यम संवादासाठी स्थानिक अधिकारी नेमण्याची प्रथाही त्यांनी खंडित केली होती. तेथेही केरळमधीलच व्यक्तीची नियुक्ती केली होती. ते राज्यपाल झाल्यानंतर केरळीयनांची राजभवनावरील उठबस नजरेत भरेल इतकी वाढली होती.आता त्यांना केरळमधील कार्यक्रमांसाठी सर्वच वेळ देता येईल, अशी चर्चा आहे. ∙∙∙

नेपाळींवरच चालतो कारभार

मध्यंतरी उत्पल पर्रीकर यांनी पणजीत नेपाळींना मतदार म्हणून नोंदवून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप केला व त्या नंतर केवळ पणजीतच नव्हे तर गोव्यात सर्वत्रच वाढत चाललेल्या नेपाळींचा मुद्दा चर्चेत आला. कारण, पूर्वी म्हणजे पंधरा वीस वर्षांपूर्वी बॅंका वा मोठ्या आस्थापनांत नेपाळी गुरखा म्हणून कामाला होते. त्या लोकांची विशिष्ट ठेवण असते व त्यामुळे लगेच ते ओळखता येत. पण हल्ली या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलीय. एवढेच नव्हे, तर गोव्यातून दिवसाआड नेपाळला बसेस सुध्दा सुटत आहेत. नेपाळींची असंख्य कुटुंबे रोजगारासाठी येथे आहेत. घरांतील मोलकरिणींत नेपाळी महिलांचे प्राबल्य आहे. त्या कुटुंबांतील मुले येथील बालवाड्यांत व शाळांत जात आहेत. कोणीही सहा महिने वास्तव्य केले की, त्याचे नाव मतदारयादींत येते तसेच त्याला आधारकार्डही दिले जाते. मग त्यासाठी हरकत घेणे योग्य आहे का, अशी विचारणा गोव्यात रमलेले नेपाळी करत आहेत.∙∙∙

‘अपघातानंतर जागी झालेली यंत्रणा!’

दोन तरुणांचे प्राण गेल्यानंतर अखेर बेतोड्याच्या बायपासजवळ ट्रॅफिक सिग्नल कार्यान्वित करण्यात आलेत. म्हणजे जणू काही अपघातच झाले नाहीत, तर यंत्रणांना ''सिग्नल'' मिळतच नाहीत! गावकऱ्यांनी कितीदा मागणी केली, पण तेव्हा बहिरेपणाच अधिक दिसला. आता मात्र अपघात झाल्यावर सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं – आणि सिग्नलही जागे झाले! पण एवढ्यावर समाधान मानायचं का? सिग्नल बसवले, पण रस्त्यांची अवस्था तशीच आहे – खड्ड्यांनी भरलेली, अपूर्ण दुरुस्त्या, आणि बेजबाबदार वाहतूक. आता स्थानिक लोक पुढच्या टप्प्यावर म्हणजे चांगल्या रस्त्यांसाठी आवाज उठवत आहेत. हा प्रकार म्हणजे, घर जळाल्यावर विहीर खणण्याचा आदर्श नमुना. यंत्रणांनी वेळीच जागं व्हायला हवं होतं, तर दोन निष्पाप जीवांचा बळी टाळता आला असता. पण काय करणार, प्रशासनाचं यंत्र फक्त ‘दु:खद बातमी’ आल्यानंतरच कार्यरत होतं हे पुन्हा एकदा दिसून आलं.. ∙∙∙

विजय-अमित यांच्यात ‘कलगीतुरा’

जेव्‍हा कोंबड्यांची झुंज लावली जाते ती झुंज लागण्‍यापूर्वी दाेन्‍ही कोंबडे एकमेकांचा अंदाज घेण्‍यासाठी गोलाकार फिरत असतात. या गोलाकार फिरण्‍यास ‘कलगीतुरा’ असे म्‍हटले जाते. सध्‍या गोव्‍याच्‍या राजकारणातही तेच घडत आहे, असे वाटते. एकाबाजूने गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस हे दोन्‍ही पक्ष आमची युती अजूनही कायम आहे, असे म्‍हणत असले तरी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर हे एकमेकांवर आराेप करण्‍याची एकही संधी सोडत नाहीत. आपल्‍या संविधान बचाव कार्यक्रमात अमित पाटकर १६ ब कलमाचा न चुकता उल्‍लेख करत विजय सरदेसाई यांना कात्रीत पकडण्‍याचा प्रयत्‍न करतात तर दुसऱ्याबाजूने अमितचे नाव न घेता काहीजणांचे भाजप बरोबर असलेले ‘जॉईंट व्‍हेंचर’ अशी मल्‍लिथानी विजयराव करू लागलेत. ∙∙∙

माध्यम मराठी; मात्र बोलबाला इंग्रजीचा!

‘माकडाच्या हाती कोलीत’ अशी कोकणीत एक म्हण आहे. आपल्या राज्यातील सरकारी प्राथमिक मराठी शाळा का बंद पडल्या? याच्यावर सध्या वाद विवाद चालू आहे. याला केवळ पालकच नव्हे तर आपले सरकार व आपल्या राज्यातील शिक्षक व शिक्षणतज्ज्ञही तेवढेच जबाबदार आहेत. आता हेच पाहा ना. गोवा एससीआरटी ने पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी कोणत्या महिन्यात कोणता पाठ शिकवावा, याची दिनदर्शिका पाठवली आहे. आता चौथीच्या मराठी, उर्दू व इतर प्रादेशिक माध्यमातील शाळांना पाठविलेली दिनदर्शिका त्या त्या भाषेत न पाठवता इंग्रजीत पाठविण्यात आली आहे. आता मराठी माध्यमाच्या शाळांवर सरकार इंग्रजीची सक्ती करू पाहत आहे का? की हळू हळू राज्यातील शाळांचे इंग्रजीकरण करण्याचा सरकारचा इरादा आहे? मॅडम जी जरा लक्ष द्या, खात्याकडे आपल्याला आता स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे, असे शिक्षक म्हणू लागलेत! ∙∙∙

रोहितनी पणजीतले रस्तेही सर करावेत !

महापौर रोहित मोन्सेरात यांनी तांजानियामधील किलीमांजारो पर्वत पादाक्रांत केला आणि त्यांच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला. अनेकांनी त्यांना मोबाईलवर अभिनंदनाचे संदेशही पाठविले. परंतु समाजमाध्यमांत मात्र संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. काहींनी ही बाब अभिमानास्पद असल्याचे म्हटले असले तरी काहींनी शालजोडीतून टोमणेही मारले आहेत. काही नेटकऱ्यांनी त्यांना पणजीत अजूनही रस्त्यांची स्थिती चालत फिरत जाणून घ्यावी. तर काहींनी सर्व रस्ते फिरत आल्तिनोवर चालत गेलातरी एव्हरेस्ट चढल्यासारखे वाटेल, असेही सुचविले आहे. त्यामुळे गोव्यात परतल्यानंतर ते वाहनांपेक्षा अधिक काळ रस्त्यावरून चालताना दिसल्यास तीही त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब असणार आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी मारलेले टोमणे रोहित यांनी अधिकच मनावर घेतले तर त्यांच्यातील वागण्यात बदल घडेल हे नक्की. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

Non-Veg Milk: 'नॉन-व्हेज मिल्क' म्हणजे काय? भारत-अमेरिका वादाचं कारण बनलेलं काय आहे हे दूध?

SCROLL FOR NEXT