Bailpar Water Project: बैलपार-कासारवर्णे येथे साडे पंचवीस कोटी खर्च करुन उभारण्यात आलेल्या जल प्रकल्पाचे सोमवारी (ता. ४) संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
यावेळी जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
या जल प्रकल्पाद्वारे पेडणे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे, असा दावा सरकारतर्फे करण्यात येत आहे.
पेडणे तालुक्यात सद्या ३० एल. एम. डी. पाण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते. हा जल प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत झाल्यावर बैलपार नदीतून ११० एल. एम. डी. पाणी उपसा करण्यात येईल.
या प्रकल्पात कच्चे पाणी खेचण्यासाठी येथे चार ते पाच पंप कार्यरत असणार आहेत. तसेच एक पंप राखीव असेल. गरजेनुसार त्याचा उपयोग करण्यात येईल. तसेच या प्रकल्पात अतिरिक्त पंप बसण्याची सोय आहे. पुढिल पंधरा वीस वर्षांचा विचार करून हा प्रकल्प राबवला आहे.
उद्योग प्रकल्पांना कच्चे पाणी
या प्रकल्पातून मोपा विमानतळासाठी ५ एल. एम. डी कच्चे पाणी तर आयुष इस्पितळाला २ एल. एम. डी. कच्चे पाणी पुरवण्यात येणार आहे. तसेच इतरही काही प्रकल्पांना कच्चे पाणी पुरवण्यात येणार आहे.
"बैलपार जल प्रकल्प कार्यान्वित होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. चांदेल व तुये येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाला हे पाणी पुरवण्यात येईल. त्यावर प्रतिक्रिया करून हे पाणी लोकांना पुरवण्यात येईल. तुये जल प्रकल्प पूर्ण होईपर्यंत जरा वाट पहावी लागेल. मांद्रे मतदारसंघातील सगळ्या गावांना सुरळीत पाणी पुरवठा होईल."
- जीत आरोलकर, आमदार, मांद्रे
"बैलपार नदीतील कच्चे पाणी खेचून ते चांदेल जलशुद्धीकरण प्रकल्पाला पुरवण्यात येणार आहे. यामुळे पेडणे तालुक्यातील पाणी समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच या प्रकल्पातून पाच एल.एम.डी. कच्चे पाणी मोपा विमानतळाला तर दोन एल.एम.डी.कच्चे पाणी आयुष इस्पितळाला पुरवण्यात येणार आहे. आमचे पाणी इतर कुणी पळवले अशी भीती कोणी बाळगू नये."
- प्रवीण आर्लेकर, आमदार पेडणे
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.