सत्तरी तालुक्यात रानटी जनावरांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रानडुक्कर, गवे, शेकरू, माकड, खेती, मोर आणि अन्य प्राण्यांकडून शेती, बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. काबाडकष्ट करून शेती, बागायती वाढवायच्या आणि पीक घेण्याच्या वेळी रानटी जनावरांनी नासाडी करायची, हे आता नित्याचेच झाले आहे.
सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती. बागायती, पोफळीची झाडे आहेत. कित्येकजण त्यावरच आपली गुजराण करतात. मात्र रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून या प्राण्यांना उपद्रवी घोषित करा अशा प्रकारचे निवेदन संबंधित खात्याला वारंवार देण्यात येत आहे. तसेच गेल्या वर्षी सत्तरीत आंदोलनही करण्यात आले. मात्र सरकारने याकडे साफ दुलर्क्ष केले आहे.
सत्तरी तालुक्यात प्रचंड प्रमाणात नारळाचे उत्पादन होते. आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. कारण रानटी जनावरांचा वाढता उपद्रव नारळांच्या उत्पादनाच्या मुळावर आलेला आहे. यामुळे उत्पादनाची क्षमता घसरली आहे.
पूर्वीच्या तुलनेत सध्या तरी ५० टक्के उत्पादन कमी झालेले आहे. यामुळे नारळ उत्पादकांसमोर मोठी समस्या निर्माण झालेली आहे. माडावर तयार झालेले नारळांचे नुकसान करण्याचे काम खेती, माकड करू लागले आहेत.
त्यामुळे तयार होण्याआधीच नारळ बाद होऊ लागले आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. पडलेले नारळ, लहान झाडे, अळू, भाजीचे मळ्यांमध्ये रानडुकरांचा वावर वाढलाय. झाडावरीलच नव्हे तर पडलेल्या नारळांवरही रानडुक्कर ताव मारतात. त्यामुळे नारळ उत्पादक चिंतेत सापडले आहेत.
एकीकडे सरकारकडून शेती, बागायतीला प्रोत्साहन दिले जाते, मात्र दुसरीकडे अशा उपद्रवी प्राण्यांचा बिमोड करण्यास अपयशी ठरले आहे. शेती, बागायतींची नासाडी होऊनही कृषी खात्याच्या योजना व अनुदान मिळणे कठीण बनले आहे.
पूर्वी सत्तरी ही कृषीप्रधान तालुका होता. मात्र रानटी जनावारांच्या उपद्रवामुळे आता अनेकांनी शेती करणे सोडून दिले आहे.
अगोदरच महागाई वाढलेली आहे. त्यात कामगार, मजुरांचा पगार देणे परवडत नाही. तरीसुद्धा आवड म्हणून व आपल्या पारंपरिक शेतीची जपणूक करण्यासाठी काहीजण शेती, बागायती करतात. मात्र रानटी जनावारांमुळे नंतर कपाळावर हात मारण्याची वेळ त्यांच्यावर येते.
सत्तरीतील बहुतांश शेती, बागायती ही म्हादई, रगाडा, वेळूस, वाळवंटी या नद्यांवर अवलंबून आहे. पडीक असलेल्या जमिनीही लागवडीखाली आणल्या जात आहेत.
मात्र रानटी जनावरांमुळे शेतकऱ्यांची मेहनत सध्या तरी वाया जात आहे. त्यामुळे सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
"रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे सत्तरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत अनेक निवेदने सरकारला सादर करण्यात आली, आंदोलनेही झाली. परंतु समस्या सुटलेली नाही."
"रानटी जनावारांचा बंदोबस्त करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांना जंगलात खाण्यासाठी काही मिळत नाही म्हणून ते शेती, बागायतीला लक्ष्य करतात. या जनावारांना मारण्याची परवानगी सरकारने आम्हाला दिली तरच हा प्रश्न सुटू शकतो."
- अशोक जोशी, शेतकरी (हेदोडे)
"आमची वडिलोपार्जित शेती आहे. परंतु रानटी जनावारांकडून पिकाची नासधूस करण्यात येतेय. पीक घेण्याची वेळ येते, तेव्हाच ही जनावरे पिकावर ताव मारतात. त्यामुळे शेती करणेच कठीण होऊन बसले आहे."
"जंगलातील अन्न नष्ट झाल्यामुळे वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. सत्तरीत याआधी शेती, बागायती चांगली चालायची. वर्षाच्या अर्थकारणाची घडी बसलेली असायची. पण आज आर्थिक घडी बदलेली आहे."
- रघुनाथ खोत, बागायतदार (गोळावली)
"नारळाच्या झाडाला पाणी देणे, खते देणे ही कामे करावी लागतात. पण खेती, शेकरा या प्राण्यांनी नारळ पिकाला टार्गेट केले आहे. कोवळ्या नारळांचे जास्त नुकसान करण्यात येत आहे."
"बागायतदारांनी या नुकसानीचा धसका घेतला आहे. वार्षिक उत्पन्न कमी झाल्याने कर्जफेड करणे कठीण होत आहे. या एकूण परिस्थितीमुळे शेती व्यवस्थापनाचे वेळापत्रकच बिघडले आहे. उपद्रवी प्राण्यांमुळे शेतकरी नवीन प्रयोग करण्यास धाडस करीत नाहीत."
- उल्हास सामंत, शेतकरी (कोपार्डे)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.