Parshuram Prabhu Mother Death Delay in Treatment Dainik Gomantak
गोवा

...तर आईचा जीव वाचला असता! ओवळे येथील तरूणाची व्यथा; घरापर्यंत रुग्णवाहिका न पोचल्याने उपचाराला विलंब

Parshuram Prabhu Mother Death Delay in Treatment: देश अवकाशात प्रगती करत असताना ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा अभाव अजूनही जीवघेणा ठरत असल्याची धक्कादायक घटना सत्तरी तालुक्यातील होंडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या ओवळे येथे घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: देश अवकाशात प्रगती करत असताना ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा अभाव अजूनही जीवघेणा ठरत असल्याची धक्कादायक घटना सत्तरी तालुक्यातील होंडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या ओवळे येथे घडली.

वेळेवर उपचार न मिळाल्याने मी आज माझी आई गमावली आहे, अशा शब्दांत परशुराम प्रभु या तरुणाने आपल्या आईच्या मृत्यूची अंगावर काटा आणणारी व्यथा मांडली आहे. या घटनेबाबत परशुरामने केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तो पाहून अनेकांची मने हेलावली आहेत.

ओवळे येथील परशुराम प्रभू यांच्या आई माधुरी प्रभू यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांची शुद्ध हरपली. कुटुंबीयांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेला बोलावले. मात्र, घरापर्यंत पक्का रस्ता नसल्याने रुग्णवाहिका सुमारे दीड किलोमीटर अंतरावर उभी राहिली.

त्यानंतर १०८ कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर घेऊन अवघड डोंगराळ वाटेने महिलेला रस्त्यापर्यंत आणले आणि तेथून तातडीने साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत प्रकृती अधिक चिंताजनक बनली होती. पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत नेण्याची तयारी सुरू असतानाच माधुरी प्रभू यांचा मृत्यू झाला.

सरकार दखल घेईल का?

ओवळे गावात सुमारे २५ घरांची लोकवस्ती असून सुमारे १०० लोक तेथे राहतात. २५ वर्षांपूर्वी जमीन मालकांकडून रस्त्याची सुविधा प्राप्त व्हावी यासाठी गावकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून आणि श्रमदानातून गावाचा कच्चा रस्ता तयार केला होता. त्यानंतर पंचायतीमार्फत त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर या रस्त्याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याने सध्या सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या मार्गाने नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.

सुविधांचा अभाव

डोंगराळ भाग असल्याने गावातील नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त झाला नाही, तर उरलेला रस्ताही पावसाच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून अनेक कुटुंबांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय उरत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कालची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. गावातील रस्त्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करत आहोत. विविध निधीतून प्रस्ताव पाठवले आहेत. आता तरी लवकरात लवकर रस्ता व्हावा यासाठी पंचायत मंडळाचे प्रयत्न सुरू राहतील

- शिवदास माडकर,

सरपंच, ओवळे (सत्तरी)

व्हायरल व्हिडिओने हेलावली मने

या घटनेनंतर परशुराम प्रभू यांनी एक भावनिक व्हिडिओ करत आपली व्यथा मांडली. “जर घरापर्यंत रस्ता असता तर मी माझ्या आईला स्वतःच्या गाडीतून तातडीने रुग्णालयात नेले असते आणि कदाचित ती आज जिवंत असती,” असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी यावर संताप आणि हळहळ व्यक्त केली आहे. परशुराम प्रभू यांनी प्रशासनावर थेट टीका न करता वास्तव परिस्थिती मांडत सरकारने किमान गावापर्यंत रस्ता करून द्यावा, अशी विनंती केली आहे. “माणूस चंद्रावर पोहोचला, पण ओवळेमध्ये अजूनही रस्त्याची सुविधा नाही,” असेही त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT