

Rishabh Pant Live TV Controversy: ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला आयपीएलमध्ये पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा पराभव कर्णधार ऋषभ पंतच्या चांगलाच वर्मी लागला. पराभवाचा राग आणि मानसिक ताण एवढा जास्त होता की, सामन्यानंतर थेट लाईव्ह टीव्हीवर बोलताना पंतची जीभ घसरली आणि त्याने अशा काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला, जे कोणत्याही खेळाडूला शोभणारे नाही. पंतच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून त्यावर तीव्र टीका होत आहे.
या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पहिल्यांदा फलंदाजी करत 220 धावांचा अवाढव्य डोंगर उभारला होता. मात्र, एवढी मोठी धावसंख्या उभारुनही लखनऊच्या गोलंदाजांना त्याचा बचाव करता आला नाही आणि राजस्थान रॉयल्सने हा सामना सहज जिंकला. सामन्यानंतर जेव्हा प्रेझेंटेशन दरम्यान पंतशी संवाद साधण्यात आला, तेव्हा त्याने मधल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये जोफ्रा आर्चरने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीचे कौतुक केले. खेळपट्टीची परिस्थिती पाहता संघ आणखी 10 ते 15 धावा करु शकला असता, असे पंतने मान्य केले. संघाला मिळालेल्या धडाकेबाज सुरुवातीचा फायदा शेवटच्या षटकांमध्ये उठवता आला नाही, अशी खंतही त्याने यावेळी बोलून दाखवली.
संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या सामन्यात खेळत नव्हता. शमीच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता पंत म्हणाला की, अनुभवाची कमतरता नेहमीच जाणवते. अनुभव एका रात्रीत मिळत नाही, त्यासाठी खेळाडूंना अनेक वर्षे कठोर परिश्रम करावे लागतात. आपला संघ उत्कृष्ट असून पुनरागमन करेल असा विश्वास त्याने व्यक्त केला. परंतु, हीच चर्चा पुढे सुरु असताना अचानक पंतने संयम गमावला आणि लाईव्ह टीव्हीवर थेट अपशब्दांचा वापर केला. पंत बोलत असताना बाजूला उभा असलेला समालोचक इयान बिशप यालाही धक्का बसला. पंतच्या या चुकीबद्दल इयान बिशपने तात्काळ प्रेक्षकांची माफी मागितली आणि तिथून मुलाखत संपवली. मात्र, पंतने या वर्तनाबद्दल अद्याप कोणतीही जाहीर माफी मागितलेली नाही.
आता क्रिकेट वर्तुळात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, पंतने हे वक्तव्य जाणूनबुजून केले की रागाच्या भरात त्याच्या तोंडातून हे शब्द निघून गेले. केवळ आयपीएलमधील (IPL) पराभवामुळे पंत एवढा मर्यादेबाहेर गेला का, यावरही चर्चा रंगली. कारण याच दिवशी भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरुन ऋषभ पंतला हटवण्यात आले. कदाचित भारतीय संघ निवडीतील या मोठ्या धक्यामुळे आणि आयपीएलमधील पराभवामुळे तो प्रचंड मानसिक दबावाखाली असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण काहीही असले तरी, क्रिकेटसारख्या भद्र जनाच्या खेळात लाईव्ह टीव्हीवर अशा भाषेचे समर्थन कोणालाही करता येणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.