पणजी : कामराभाट येथील सुमित मेगेरी याच्यावरील अडीच महिन्यापूर्वी झालेल्या मारहाणीप्रकरणी मृत्यू झाल्याने पणजी पोलिसांनी मायरॉन फर्नांडिस व इतरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीमुळे तेव्हा त्याच्या मेंदूला जबर मारहाण झाल्याने त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली व त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी कामराभाटवासीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय अहवालाच्या आधारे हा गुन्हा नोंद करून चौकशी सुरू केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी दिली.
सुमित मेगेरी हा कामराभाट - टोंक करंझाळे येथील पालिका इमारतीमध्ये राहत होता. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याला काही अज्ञातांनी अडवून बेदम मारहाण केली होती. त्याला जमिनीवर पाडून त्याच्यावर संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.
या मारहाणीत त्याच्या डोक्याच्या मेंदूला जबर दुखापत झाली होती. त्याने तेव्हा पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तेव्हा डॉक्टरांनी किरकोळ जखम असा अहवाल दिला होता. त्यामुळे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद करून घेतला होता. त्यानंतर मयत मेगेरी हा नेहमीप्रमाणे कामावर जात असे. मात्र अधुनमधून त्याचे डोके दुखत होते.
वैद्यकीय तपास अहवालात त्याचा मृत्यू मेंदूज्वरामुळे झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मारहाणीच्या दुखापतीतून त्याचा मृत्यू झाल्याचा दावा कामराभाट रहिवाशांनी पोलिस स्थानकावर मोर्चा नेऊन केला होता. याप्रकरणी न्याय देण्याची मागणी कामराभाटवासीयांच्यावतीने टोनी बार्रेटो यांनी पोलिस निरीक्षकांशी चर्चा केली.
निरीक्षक पालेकर यांनी वैद्यकीय तपासणी अहवालातील नोंदी तपासून त्याची पडताळणी केली जाईल व योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे गेल्या सोमवारी सुमित याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
मेंदूतील मांसपेशी कुजल्याचे उघड
गेल्या आठवड्यात सुमित मेगेरी याला ताप आला तसेच त्याचे डोकेही फारच दुखू लागले होते. त्यामुळे त्याने इस्पितळात उपचार सुरू केले होते. त्याच्या डोक्याच्या मेंदूचे स्कॅनिंग केले गेले त्यामध्ये धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला. डोक्यातील मेंदूच्या काही मासपेशी कुजल्या होत्या.
या मासपेशींना त्याच्यावर झालेल्या हल्ल्यावेळी मार लागल्याने त्या खराब होऊन कुजल्या होत्या. त्यामुळे त्याला डेंग्यूज्वरही झाला होता. सुरवातीला त्याच्यावर हल्ला झाला होता, तेव्हा मारहाण किरकोळ असल्याने त्याच्या डोक्याचे स्कॅनिंग करण्यात आले नव्हते. त्याने मारहाणीच्यावेळी डोके दुखत असल्याची तक्रारही इस्पितळात किंवा तपास अधिकाऱ्यांसमोर केली नव्हती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.