

पणजी: पूर्वाश्रमीची आय-लीग, पण आता नव्याने नामकरण करण्यात आलेल्या इंडियन फुटबॉल लीगला (आयएफएल) फुटबॉल स्पर्धेला शुक्रवारपासून (ता. २७) सुरवात होत आहे. यंदा गोव्याच्या साऱ्या आशा माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबवर असतील.
स्पर्धेत नामधारी एफसी, ऐजॉल एफसी, चानमारी एफसी, गोकुळम केरळा, डायमंड हार्बर, श्रीनिदी डेक्कन, शिलाँग लाजाँग, राजस्थान युनायटेड, धेंपो स्पोर्टस क्लब व रियल काश्मीर या दहा संघांत विजेतेपदासाठी चुरस असेल. पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर व मिझोराममधील चानमारी एफसीने गतमोसमात आय-लीग २ स्पर्धेत अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळवून यावेळच्या आयएफएल स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.
गतवेळी आय-लीग विजेत्या इंटर काशी एफसीला यंदा आयएसएल स्पर्धेत बढती मिळालेली आहे, तर गतउपविजेत्या गोव्यातील चर्चिल ब्रदर्सने स्पर्धेत भाग घेतलेला नाही. त्यामुळे धेंपो क्लब हा गोव्यातील एकमेव संघ ठरला आहे. यावेळचा आयएफएल विजेता संघ २०२६-२७ मधील आयएसएल स्पर्धेत जागा मिळवेल.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) दिलेल्या माहितीनुसार, आयएफएल स्पर्धेसाठी ‘दूरदर्शन’सोबत प्रक्षेपण करार करण्यात आला आहे. त्यानुसार सामने डीडी स्पोर्टस, तसेच वेव्हस ॲपवर दिसणार आहेत. स्पर्धेत २७ रोजी दोन सामने होतील. लुधियाना येथे नामधारी एफसी व ऐजॉल एफसी यांच्यात, तर ऐजॉल येथे चानमारी एफसी व गोकुळम केरळा यांच्यात सामना होईल.
गतमोसमात सहावा क्रमांक
धेंपो स्पोर्टस क्लबचा स्पर्धेतील पहिला सामना घरच्या मैदानावर एक मार्च रोजी रियल काश्मीर संघाविरुद्ध होईल. २०२४-२५ मोसमात धेंपो क्लबने समीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आय-लीग स्पर्धेत २९ गुणांसह सहावा क्रमांक मिळविला होता. त्यांनी तीन वेळा (२००७-०८, २००९-१०, २०११-१२) आय-लीग स्पर्धा जिंकली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.