पणजी : आतिशी किंवा अंजली यांनी काहीही म्हटले तरी विरोधक एकवटलेले आहेत. विधानसभेच्या कामकाजात ते दिसून आले आहे आणि यापुढेही दिसून येईल, असे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काँग्रेसच्या सचिव प्रभारी अंजली निंबाळकर यांनी बाणावलीत कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यांनी बाणावलीत कॉंग्रेसचा उमेदवार असू शकतो, असे म्हटले होते. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर व्हिएगस यांना विचारले असता त्यांनी, विधानसभेत विरोधी आमदार एकत्र असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान व्हिएगस म्हणाले, की दर खेपेला विरोधक एकत्र आहेत का, हा प्रश्न येतो. तो चुकीचा आहे. ते विचारण्याची गरज नाही. आम्ही विरोधक एकत्रितपणे प्रश्नही विचारतो. आम्ही सारे एकत्रच आहोत.
विधानसभेत एकाच मुद्यावर सगळे बोलले तर वेळ वाया जातो. त्यामुळे कोणी कोणता मुद्दा उपस्थित करावा, याची चर्चा होते. विरोधी पक्षनेत्यांशी आताही मी तीन दिवसांच्या विधानसभा अधिवेशनात वेळेच्या योग्य वापराबाबत बोललो आहे.
राजकीय वर्तुळातून माहिती घेतली असता समजले, की भाजपविरोधात एकत्रितपणे लढल्यासच यश मिळू शकते, याची जाणीव स्थानिक विरोधी नेत्यांना झाली आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिवेशनात सरकारला उघडे पाडणार!
निवडणुकीचे राजकारण वेगळे असते. प्रत्येकाची कामाची पद्धत आणि विषयांचे प्राधान्य वेगळे असते. निवडणूक लढायची असल्याने वक्तव्ये केली जातात. शिक्षण, आरोग्य आणि महिलांची सुरक्षितता या विषयांवर काम करण्यासाठी आमच्यासारखे लोक राजकारणात आले.
लोकांना जेव्हा वाटेल, की या गोष्टींची गरज नाही, तेव्हा आम्ही राजकारणात नसू. त्यामुळे राजकारण वेगळे आणि सरकारविरोधात एकत्र येणे वेगळे. सरकारला उघडे पाडण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, असे व्हिएगस म्हणाले.
माध्यमांवर येणार संकट
प्रसिद्धी माध्यमांचा संकोच करणारे एक विधेयक विधानसभेत चर्चेला येणार आहे, असा गौप्यस्फोट व्हिएगस यांनी केला. ते म्हणाले, माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. त्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आम्ही जाणून घेणार आहोत. आम्ही विधेयकाची प्रत मागितली आहे. ती मिळाल्यावरही चर्चा केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.