पणजी: स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात आलेल्या कामांपैकी रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून ते रस्ते वाहतुकीस खुले झाले आहेत. सुशोभीकरणाची कामे दिलेल्या मुदतीनुसार ३० जूनपर्यंत पूर्ण केली जातील, असे सरकारच्यावतीने न्यायालयात सांगितले गेले आहे. त्यानुसार इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडला (आयपीएससीडीएल) पावसातही सुशोभीकरणाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत, परंतु टोंक येथील मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पासमोरील स्मार्ट रस्त्यावर खड्डे पडल्याने ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
पणजीत स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये रस्त्यांची कामे महत्त्वाची होती. त्यापैकी आयपीएससीडीएलने हाती घेतलेल्या कामांपैकी सर्व रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत, परंतु महत्त्वाचे १८ जून रस्ता, आत्माराम बोरकर मार्ग, महानगरपालिकेसमोरील रस्ता त्या कामातून वगळण्यात आला. त्यामुळे पणजी नक्की कोणत्या बाजूने स्मार्ट झाली तेच आता शोधावे लागणार आहे.
सांतिनेज परिसरात रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे शहराला स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न झाला, तोच प्रयत्न मध्य पणजीत झालेला नाही. त्यामुळे मागील महिन्यात करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामावर अगोदरच प्रश्न उपस्थित झालेले आहेत.
स्मार्ट सिटीअंतर्गत रायबंदर येथील मार्केट संकुलाचे व मच्छीमार जेटीचे काम अपुरे आहे. विशेष बाब म्हणजे रायबंदर परिसर शहरापासून दूर असल्याने या कामांबाबत फारशी गंभीरता वाटत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे मार्केट संकुलाचे काम कधी पूर्ण होणार याकडे रायबंदरच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. या परिसरासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे.
एसटीपीसमोरील पुलाजवळ असलेल्या थॉमस गॅरेजसमोर गटाराचे काम अपूर्ण आहे. याशिवाय पदपथाचे काम पावसातही केले जात आहे. त्याशिवाय रस्त्याच्या एका बाजूने जलवाहिनीचे काम अद्याप सुरू आहे. याच गॅरेजसमोर विरुद्ध बाजूला भूमिगत वाहिन्यांचे काम बाकी आहे. तेही काम पावसातच कंत्राटदाराला करावे लागणार आहे.
टोंक येथील एसटीपी या मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. या रस्त्याचे पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीअंतर्गत काम करण्यात आले आहे, परंतु सांतिनेज खाडीवरील पुलाचा आणि रस्ता जोडणीचे जे काम राहिले आहे, ते व्यवस्थितरीत्या झालेले नाही. या ठिकाणी दररोज सिवरेज वाहतूक करणाऱ्या असंख्य टँकरच्या वजनामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याशिवाय बाजूला इमारतींचे साहित्य वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांमुळे या रस्त्याची पुरती वाट लागली आहे.
अबकारी खात्याच्या जुन्या इमारतीजवळ स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे काम झाले, पण पदपथाचे काम झालेले नाही. पर्यटकांची या परिसरात गर्दी असते. त्यामुळे स्मार्ट पणजीची अपूर्ण असलेली कामे प्रकर्षाने दिसून येतात. हे काम कशामुळे अपूर्ण ठेवले आहे, हे काही समजत नाही, परंतु आता सुशोभीकरणाचे कारण दिले गेले असले, तरी ते पूर्ण केल्याशिवाय या पोर्तुगीजकालीन इमारतीला झळाळी येणार नाही, हे स्पष्ट आहे.
काकुलो मॉल येथील चौकात पूर्वीचा वीज खात्याचा ट्रान्स्फॉर्मर बदलून त्या ठिकाणी अद्ययावत संयंत्राची उभारणी करण्यात आली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या सयंत्राभोवती अद्याप पेव्हर्स घालून त्या पदपथाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हे काम सुरू होते आणि आता न्यायालयात सांगितलेल्या तारखेपूर्वी ते काम पूर्ण होईल, असे दिसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.