पणजी: पणजीतील मतदारयादीत नेपाळी नावे घुसडविली असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी गुरुवारी सर्वांसमोर आणले. त्यांनी प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पाहणी केल्यानंतर बोगस मतदारांचा हा प्रकार उघडकीस आला.
पणजीतील टोंक-मिरामार येथील एका इमारतीतील घरक्रमांकावर मतदारयादीत नोंद असलेले नेपाळी नावांचे मतदार त्याच ठिकाणी राहतात काय, याची पडताळणी काँग्रेसने सायंकाळी केली. त्यावेळी मतदारयादीतील मतदार त्या घरात राहत नसल्याचे उघड झाले. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ‘ही नेपाळी नावे मतदारयादीत आलीच कशी?’ असा सवाल निवडणूक आयोगाला केला आहे.
मतदारयादीतील या घोळामुळे बोगस मतदारांचा प्रकार आता सर्वांसमोर आला आहे. नेपाळचे नागरिक भारतीय मतदार ओळखपत्र बाळगू शकतात काय?, भारतीय नागरिकत्व न घेता आमच्या निवडणुकीत मतदान करू शकतात काय?, जर हो, तर कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार? जर नसेल, तर ही नावे मतदारयादीत आलीच कशी? असे प्रश्न पाटकर यांनी उपस्थित केले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मिरामार परिसरातील इमारतीत प्रत्यक्ष जाऊन पडताळणी केली. नेपाळी नागरिकांची नावे ज्या पत्त्यावर दिली आहेत, त्या ठिकाणी गोम्स नावाचे कुटुंब राहत असल्याचे आढळून आले. मात्र मतदारयादीत या पत्त्यावर अर्जुन नेपाळी, दल बहादूर, मिनभदर कोटकेनी आणि खडक जयगडी यांची नावे नोंद आहेत, असे पाटकर यांनी सांगितले.
मतदारयादीत बोगस नावे आढळणे हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे सर्वच मतदारयाद्यांविषयी आता शंका आणि संशय निर्माण झाला आहे. निवडणुकांमध्ये फेरफार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका आपल्या लोकशाहीचा पाया आहे. अशा बोगस नोंदीमुळे लोक निवडणुकांवर विश्वास तरी कसा ठेवणार?, ही नावे मतदारयादीत आलीच कशी? असे सवाल अमित पाटकर यांनी उपस्थित केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.