Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; उत्‍पलमुळे बाबूश गोटात खळबळ

Goa Latest Political News: राज्यात सध्या रेती माफियांचे फावले आहे. सरकारी यंत्रणेला हाताशी धरून रात्रीच्यावेळी सक्शन पंप लावून मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जातो.

गोमन्तक डिजिटल टीम

उत्‍पलमुळे बाबूश गोटात खळबळ!

येत्‍या ११ मार्च रोजी होणाऱ्या पणजी महानगरपालिका (मनपा) निवडणुकीत भाजप आणि मंत्री बाबूश मोन्‍सेरात पुरस्‍कृत पॅनलचा पराभव करण्‍यासाठी माजी मुख्‍यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्‍पल पर्रीकर यांनी जोरदार प्रयत्‍न सुरू केले आहेत. तळागाळातील पणजीवासीयांची प्रत्‍यक्ष भेट घेत त्‍यांनी बाबूश कसे अपयशी ठरत आहेत, त्‍यामुळे पणजीची कशी वाताहत होत आहे, हे सांगण्‍यास त्‍यांनी सुरुवात केलेली आहे. अनेक प्रभागांतील प्रलंबित प्रश्‍‍न अजूनही धसास लागलेले नसल्‍याने जनतेकडून उत्‍पलना प्रतिसादही मिळत चाललेला आहे. त्‍यामुळे बाबूश गोटात खळबळ माजल्‍याची चर्चाही सुरू आहे. ∙∙∙

रेती माफियांचा रात्रीस खेळ चाले!

राज्यात सध्या रेती माफियांचे फावले आहे. सरकारी यंत्रणेला हाताशी धरून रात्रीच्यावेळी सक्शन पंप लावून मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जातो. याप्रकरणी कुणी आवाज केला तर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही त्या गावचे नाहीत, असा पवित्रा हे रेती माफिया घेतात. फोंडा आणि म्हार्दोळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत तर मध्यरात्रीच्या वेळेला हा रात्रीचा खेळ बिनधास्त सुरू असतो, आता त्यांना कुणाचे अभय आहे, हे मात्र माहीत नाही. ∙∙∙

आधी काम देवाचे!

गोवा महिला आयोगातर्फे मडगावात आयोजित कार्यक्रम सुरू व्हायला जवळ जवळ दीड तास उशीर झाला. त्यासाठी आयोगाच्या अध्यक्ष रंजिता पै यांनी उपस्थितांची माफी मागितली. पण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी खरे कारण पुढे कले व उशीर आपल्यामुळे झाला हे स्पष्ट केले व स्वतः माफी मागितली. आपण जांबावली इथे रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामाच्या उद्‍घाटनास गेलो होतो. १० मार्च रोजी गुलालोत्सव असल्याने हा रस्ता हॉटमिक्स व्हावा, अशी लोकांची मागणी होती. त्यानंतर मडगावात पिंपळकट्ट्यावर शिमग्याचा नारळ ठेवण्याची जबाबदारी होती. मला सर्वच जण देवाचा माणूस म्हणून ओळखतात. मी सुद्धा देवाला मानतो व देवाची कामे प्रथम करतो, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांत हशा पिकला खरा. पण त्याच बरोबर त्यांच्या औदार्याचा त्यांना अनुभवही आला. ∙∙∙

प्रश्‍न पाण्याचा

आमदार वीरेश बोरकर आणि तुषार गावस यांनी जीवाचं रान करून सरकारला ‘३९ए’ बाबत नमतं घ्यायला लावलं. आणि सगळे सान्तआंद्रेचे नागरिक न म्हणणारेही ‘उजो उजो’ म्हणत ‘आरजी’च्या फुटबॉलमागे पळायला लागले. पण आता प्रश्न एकच आहे, सान्त आंद्रेत गेले दोन महिने पाणी पुरवठाच नीटसा होत नाही. हा लोकांच्या घरोघरी पाण्याअभावी पेटलेला ‘उजो उजो’ कसा विझवणार? याचे उत्तर आमदार वीरेशबाब देणार आहेत का? ∙∙∙

हे दशावतार थांबवा!

‘खाऊन खाऊन किती खाणार? पोट फुटेल हो!’ असे आता हताश जनता म्हणू लागली आहे. सरकारने विकासाच्या नावाने जो विनाश चालविला आहे, त्याच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. शिक्षित युवा वर्ग सरकारच्या विनाशकारी कृत्याचा समाज माध्यमावर आपला राग व्यक्त करीत आहे. मात्र, सरकारवर याचा परिणाम होत नसल्याची भावना जनतेत झाली आहे. एवढासा गोवा. सपाट जमीन संपली म्हणून आता शेत जमीन, डोंगर, राने, नद्या, समुद्र याच्यावर आक्रमण व्हायला लागले आहे आणि दुर्दैवाने ही आक्रमण सरकारनेच चालविले आहे. आपल्या पूर्वजांनी जे एवढी वर्षे राखून ठेवले त्याचा विनाश करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? याचे उत्तर जनता मागत आहे. पुढच्या पाच वर्षांत राज्यात एकही इंच डोंगर कापला जाणार नाही, राज्यातील एक मीटर शेत जमिनीचे रूपांतरण होणार नाही, नद्यांवर व समुद्रावर आक्रमण होणार नाही आणि जंगलातील एकही झाड तोडले जाणार नाही, एकही जंगली जनावर मारले जाणार याची खबरदारी सरकार घेणार का? असा प्रश्‍न युवावर्गा पडत आहे. ∙∙∙

हेचि फळ काय मम तपाला!

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत, अशी गोव्यातील सामान्य कार्यकर्त्यांची भावना नव्हेतर त्यांना विश्वास वाटतो. राहुल गांधींच्याच आशीर्वादाने गिरीशना एनएसयुआयचे प्रभारी, कॉंग्रेसचे सचिव, काँग्रेसच्या केंद्रिय समितीचे सदस्य, तसेच उत्तर-पूर्वेतील काही राज्यांचे प्रभारी व विद्यमान तामिळनाडू- पुड्डुचेरीचे प्रभारी अशी महत्वाची पदे मिळाली, असे गोव्यातील कार्यकर्ते मानतात. परंतु, काल याच सदरात गिरीश - सिद्धनाथ बुयांवच्या मैत्रीची कुजबूज आली आणि ऐन धुळवडीत काँग्रेसवाल्यांमध्ये एवढी वर्षे गिरीशच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते एम.के. शेख, जनार्दन भंडारी, ॲड. वरद म्हार्दोळकर, प्रदीप नाईक, वीरेंद्र शिरोडकर, शरद चोपडेकर एवढेच नव्हे तर एकेकाळचे संकल्प आमोणकर यांना गिरीशने कधीच पुढे नेले नाही, अशी चर्चा रंगली. कुजबूज वाचून म्हणे यातल्या काहींच्या मनात नक्कीच सहज शब्द आले असावेत ‘हेचि फळ काय मम तपाला!‘∙∙∙

महापौरपदाची पडू लागली स्वप्ने!

पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. सत्ताधारी भाजप प्रणित मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्षाकडून माजी नगरसेवकांना नवे चेहरे म्हणून उमेदवारी दिल्या आहेत. परंतु विद्यमान असलेल्या नगरसेवकांच्या आत्तापासून इच्छेला अंकुर फुटू लागले आहेत. निवडून आल्यानंतर आपण महापौरपदाच्या शर्यतीत असू, असे काहींना वाटू लागले आहे. मनात असले तरी तोंडावर आणू शकत नाहीत, कारण सत्ता आलीच तर मंत्री बाबूश सांगतील तोच महापौर असणार आहे. परंतु विद्यमान नगरेसवकांना मागील पाच वर्षांत जे झेलले आहे, निवडून आल्यानंतर तेच पुन्हा झेलावे लागेल, याचीही भीती वाटू लागली आहे. सत्ताधारी गटातील एकाही नगरसेवकाच्या एवढी धमक नाही की तो ठामपणे आपण महापौरपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे मंत्री बाबूश यांना सांगू शकतो. त्यामुळेच तर त्यांच्या स्वप्नाची दखल निवडून येण्यापूर्वी तरी घ्यावी लागेल. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Police: 21 अत्याधुनिक शस्त्रे, 200 काडतुसे जप्त, 10 जणांना ठोकल्या बेड्या; पाकिस्तान-बांगलादेश मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

VIDEO: 'AI मध्ये भारत पुढे, पण क्रिकेटमध्ये आम्हीच भारी', पंतप्रधान मोदींना सुनक यांचं मिश्किल उत्तर; जगाचं वेधलं लक्ष

Mangal Aditya Rajyoga 2026: 2 एप्रिलला महाधमाका! 'मंगळ-आदित्य' राजयोगामुळे उजळणार 'या' 3 राशींचे भाग्य; धनवर्षावासह होणार प्रगतीचे नवे मार्ग खुले

Goa Cabinet 2026: 'म्हजे घर' योजनेसाठी जमीन महसूल कायद्यात बदल, फोंडा पोटनिवडणुकीनंतर रिक्त मंत्रिपद भरणार; मुख्यमंत्री सावंतांनी स्पष्टच सांगितलं

फर्स्ट क्लासमध्ये ठोकलं ताबडतोब शतक, RR कडून खेळला, आता विकत घेतली अख्खी टीम! कोण आहे RCB चा नवा चेअरमन?

SCROLL FOR NEXT