पणजी: कॉंग्रेसचे (Congress) वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम (P. Chidambaram) दिल्लीत (Delhi) पोहचले न पोहचले तोच राज्यात (Goa) काँग्रेसमध्ये उलथापालथ व्हायला सुरुवात झाली आहे. सर्व गटसमित्या आणि जिल्हा समित्या बरखास्त करण्याचा आदेश राज्य प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी दिला आहे. या समित्या प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी नेमल्या होत्या. त्यामुळे चोडणकरांना हा जबर धक्का आहे. त्यांच्यापुढे आता नव्या समित्या नेमण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. याशिवाय, इतरही काही कठोर निर्णय अपेक्षित आहेत.
या समित्यांची महिनाभरात फेररचना करण्यात यावी असा आदेश दिनेश गुंडूराव यांनी चोडणकर यांना दिला आहे. बरखास्तीतून जिल्हा समित्यांच्या अध्यक्षांना मात्र वगळण्यात आले आहे. आपण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन समित्यांची फेररचना करू, असे चोडणकर यांनी सांगितले. राव हे गेले चार दिवस गोव्यात होते. त्यांनी दक्षिण गोव्यात अनेक बैठका घेतल्या होत्या. चिदंबरम गोव्यात आल्यानंतर या बैठकांचा दोनापावल केंद्रबिंदू ठरला होता. संघटनात्मक तयारीचा आढावा घेऊन चिदंबरम परतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी केंद्रीयमंत्री ॲड रमाकांत खलप आणि आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स सहअध्यक्ष असलेली समिती या फेररचनेसाठी आधी कॉंग्रेसने निवडून 25 एप्रिलपर्यंत प्रदेश समितीसह सर्व समित्यांची फेररचना करण्याचे ठरवले होते. ती समिती एक दोन गट समित्या बदलण्यापलीकडे काही करू शकली नव्हती आणि आता सर्वच समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. या बदलात जिल्हा समितीचे अध्यक्ष व प्रदेशाध्यक्षही बदलले जाणार का, याबाबत मात्र कळू शकले नाही.
दीड दिवसात राज्य दौऱ्यावर असलेल्या चिदंबरम यांनी दोनापावल येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. अनेकांनी पक्ष संघटनेविषयी नाराजी व्यक्त केली. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी तर सध्याची प्रदेश कार्यकारिणी कायम ठेवली तर पक्षाला भवितव्य कसे नाही याचे विवेचन केले. ज्येष्ठ आमदारांच्या पक्षनिष्ठेविषयी जाहीरपणे शंका घेतली जाते आणि त्या नेत्यांवर पक्ष काहीच कारवाई करत नाही यातून योग्य संदेश जात नसल्याचे चिदंबरम यांना सांगितले.
कॉंग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असलेल्यांनीही चिदंबरम यांची भेट घेतली. माजी महापौर उदय मडकईकर, टोनी रॉड्रिग्ज यांचा त्यात समावेश असला तरी त्यांना पुढे पाठवून एखादा मोठा नेता कॉंग्रेसमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॉंग्रेस अशा नेत्यांसाठी दारे सताड उघडणार का अशी विचारणाही या बैठकांदरम्यान चिदंबरम यांना करण्यात आली होती. त्यावेळी भाजपविरोधी मतांची विभागणी होऊ नये यासाठी पक्षाचे धोरण थोडे लवचिक असेल, असे चिदंबरम यांनी प्रश्नकर्त्यांना सांगितले आहे.
आता पुढे? : नव्या समिती निवडीचे आव्हान
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना बदलले जाणार का याकडे खुद्द कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष होते. मात्र समित्या बरखास्त करून नव्या समित्या निवडण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडेच देत कॉंग्रेस श्रेष्ठींनी चोडणकर यांना तूर्त अभय दिले का, असा प्रश्न चर्चेत आला आहे. चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा दोन वेळा राजीनामा दिला असून त्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. केवळ तेच प्रदेशाध्यक्षपदी कायम असतील,असे एकदा राव यांनी स्पष्ट केले होते.
रणनीतिकारांनी शांतपणे घेतले ऐकून; आता अहवालाकडे लक्ष
1 चिदंबरम यांनी बहुतांश नेत्यांशी एकास एक पद्धतीने चर्चा केली. त्यांनी पक्ष संघटनेतील बदल, कोणत्या मतदारसंघात कॉंग्रेस बळकट आहे, आघाडीबाबत नेमके काय केले तर कॉंग्रेसला फायदा होऊ शकतो याबाबत त्यानी चर्चा केली.
• चिदंबरम यांनी अनेकांचे शांतपणे ऐकून त्यांचे म्हणने नोंदवून घेतले.
2 चिदंबरम हे आपला अहवाल कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहेत. गोव्यातील बहुतांश नेत्यांंशी खासदार राहुल गांधी यांनी एकास एक पद्धतीने चर्चा केली होती.
• राज्य प्रभारीपदी दिनेश गुंडूराव असतानाही वरिष्ठ निवडणूक निरीक्षक व निवडणूक रणनीतिकार म्हणून पी. चिदंबरम यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
3 राहुल गांधी यांच्याच सूचनेवरून चिदंबरम यांची नियुक्ती झालेली असल्याने राज्यातील कॉंग्रेसबाबत एकदम स्वच्छ चित्र चिदंबरम यांनी मांडावे अशी अपेक्षा त्यांनी ठेवलेली असणारच.
• आता चिदंबरम हे काय अहवाल देतील याकडे कॉंग्रेस नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मी पुन्हा येईन...
महिनाभरात आपण परत येऊ. त्यावेळी निवडणूक रणनीतीविषयी स्पष्टपणे बोलू असे सांगत कॉंग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम दीड दिवसाचा राज्य दौरा आटोपता घेत सकाळी दिल्लीला रवाना झाले. विमानतळावर सकाळी 8 वाजता विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी त्यांना निरोप दिला. दिल्लीला जाण्यापूर्वी त्यांनी काल रात्री उशिरा कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक घेत संघटनात्मक पातळीवर मतभेद टाळा, असा सल्ला दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.