Land Issues सरकारी जमिनी दिसल्या म्हणून अतिक्रमण करू नका, तर गावचा विचार करून प्रकल्पांसाठी या जमिनी राखून ठेवा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करून अतिक्रमणांविरुद्ध कारवाई करून या जमिनी सरकार ताब्यात घेणार असल्याचा इशारा दिला.
मयेवासीयांना स्थलांतरित मालमत्तेच्या सनदा वितरित केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. आज सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात 324 जणांना सनदा वितरित करण्यात आल्या.
सरकार मयेच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. मयेतील जनतेला त्यांच्या शेतजमिनीही निश्चितच मिळतील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट करून विकासकामांचा धडाका पाहून त्यांनी आमदार प्रेमेंद्र शेट यांचे अभिनंदन केले.
आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कुंभारवाडा-मये येथील श्री सातेरी मंदिर सभागृहात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार राजाराम परब, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, महेश सावंत, सरपंच सुवर्णा चोडणकर, मये भाजप मंडळाचे दयानंद कारबोटकर, प्रेमानंद महांबरे, महिला मोर्चाच्या अध्यक्ष आरती बांदोडकर, मये भू-विमोचन कृती समितीचे अध्यक्ष सखाराम पेडणेकर, मतदारसंघातील विविध पंचायतींचे सरपंच उपस्थित होते.
या कार्यक्रमात मये मतदारसंघातील दिव्यांगांना सायकली तसेच शाळांना सेनेटरी पॅड, वेण्डिंग मशीन आणि इन्सिलेटर वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत लाभार्थीना धनादेशही वितरित करण्यात आले. घोडकेश्वर महिला मंडळाच्या जिमखान्यासाठी साधनेही देण्यात आली.
के. बी. हेडगेवार शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले. शंकर चोडणकर यांनी स्वागत, समृद्धी गणपुले यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेला मिळाला न्याय
श्रीपाद नाईक यांनी यावेळी स्थलांतरित मालमत्तेचा प्रश्न सुटावा यासाठी नागरिकांची एकजूट कौतुकास्पद आहे. भाजप सरकारमुळेच जनतेला न्याय मिळाला, असे सांगितले.
आमदार शेट यांची विकासाबाबतची धडपड आणि तळमळ पाहता, मये मतदारसंघाला उज्वल भवितव्य आहे, असेही श्रीपाद नाईक म्हणाले.
प्रेमेंद्र शेट यांचे अभिनंदन
या कार्यक्रमात आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे खास अभिनंदन केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रेमेंद्र शेट यांचे अभिनंदन करणारी भाषणे झाली. यावेळी सरकारच्या सहकार्यामुळेच मये मतदारसंघात अल्पावधीत अनेक विकासकामे शक्य झाली, असे प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.