omkar elephant tilari forest: सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील तिळारी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींच्या हालचालींनी जोर धरला होता. विशेषतः गोव्याच्या परिसरातून स्वगृही परतलेला 'ओंकार' हा तरुण हत्ती आता अनेक दिवसांच्या विरहानंतर आपल्या मूळ कळपात पुन्हा सामील झाला असल्याने सध्या या परिसरात सहा हत्तींचा मोठा कळप एकत्र वावरत असून, त्यांच्या हालचालींवर वनविभागाचे विशेष लक्ष आहे.
गोव्यातून परतलेला ओंकार हत्ती काही काळ कळपापासून वेगळा झाला होता. मात्र, शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तेरवण मेढे धरणाजवळ (उन्नेयी बंधारा) त्याची भेट आपल्या आईसह गणेश आणि दोन पिल्लांशी झाली.
या पुनर्मिलनानंतर सहाही हत्तींनी रात्री उशिरापर्यंत धरणाच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद लुटला. हेवाळे, बांबर्डे आणि पाळ्ये हा भाग ओंकारसाठी ओळखीचा आहे, कारण त्याचा जन्म याच परिसरात झाला होता. सध्या हा संपूर्ण कळप बांबर्डे कुळवाच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.
ओंकार कळपात परतल्यानंतर एक रंजक पण तितकीच थरारक घटना समोर आली आहे. वनविभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यात ओंकार आणि गणेश या दोन हत्तींमध्ये झालेली लढाई चित्रित झाली.
रात्रीच्या अंधारात झालेल्या या संघर्षाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण होते. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या लढाईनंतरही दोन्ही हत्ती दुसऱ्या दिवशी शांतपणे एकाच कळपात वावरताना दिसले. त्यामुळे ही लढाई वर्चस्वासाठी झालेली खरी झुंज होती की केवळ लुटुपुटूची मस्ती, असा प्रश्न हत्ती अभ्यासक उपस्थित करत आहेत.
गेल्या २३ वर्षांपासून हत्तींनी तिळारी खोऱ्याला आपला कायमस्वरूपी अधिवास बनवले आहे. मुबलक पाणी, वनस्पती आणि प्रजोत्पादनासाठी अनुकूल वातावरण यामुळे हत्ती येथे स्थिरावले आहेत. ओंकारसह अन्य दोन पिल्लांचा जन्मही याच मातीत झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
या संपूर्ण हत्तींच्या वावरादरम्यान एक अत्यंत चिंताजनक बाब समोर आली. तिळारी खोऱ्यातील जंगल भागात परप्रांतीयांनी अनेक फार्म हाऊस उभारले आहेत. हत्तींनी आपल्या मालमत्तेत शिरू नये म्हणून या फार्म हाऊस मालकांनी तारांचे कुंपण उभारून त्यात चक्क वीजप्रवाह (करंट) सोडल्याची माहिती समोर आली. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी वन विभाग, पोलीस आणि वीज वितरण विभागाने तात्काळ या फार्म हाऊसची पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.