Goa Mine Dainik Gomantak
गोवा

Goa Mines: 'खाणींकडे आता तरी लक्ष द्या'

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यातील खनिज खाणींचा व्यवसाय गेली दहा वर्षे बंद आहे. मध्यंतरी फक्त दीड वर्ष हा उद्योग सुरू झाला, पण नंतर केवळ लिलावाच्या खनिज मालाची तेवढी वाहतूक झाली, पण नव्याने व्यवसाय काही सुरू झाला नाही. गंमत म्हणजे भाजप सरकारनेच खाणी बंद पाडल्या हे सर्वश्रृत आहे. राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार असतानाही या लोकांना खाणी पुन्हा सुरू करता आल्या नाहीत.

तरीपण खाण भागात काठावरचे बहुमत घेऊन भाजपचे आमदार निवडून आले. निवडणुकीपूर्वी सहा महिन्यांत खाणी पूर्ववत सुरू करू अशी राणा भीमदेवी थाटात भाजपच्या जाहीरनाम्यात घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे कदाचित बहुतांश खाण अवलंबितांनी भाजपच्या झोळीत मते टाकली. त्यामुळे आता निदान या घोषणेला तरी जागा आणि खाणपट्ट्यातील लोकांच्या रोजीरोटीकडे पाहा, असे खाण अवलंबित म्हणू लागले आहेत. पाहुया...भाजप सरकार काय करते ते..!

फोडाफोडीच्या चर्चेला ऊत

विधानसभा निवडणुका होऊन दहा दिवस उलटले, तरी अद्याप सरकार बनलेले नाही. दरम्यानच्या काळात फोडाफोडीची चर्चा तेजीत असून याला वॉट्‍सॲप युनिव्हर्सिटीही वारा घालत आहे. सुरवातीलाच काँग्रेसचे आमदार फुटणार अशी अफवा आली आणि आता दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसचे पाच आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा उर्फान मुल्ला यांचा दावा सध्या तेजीत असला, तरी दिगंबर कामत यांनीही तो खोटा ठरवत कोण हा मुल्ला? असा प्रती प्रश्न केला आहे.

आता भाजपचे पाच आमदार राजीनामे देणार अशा अफवांनीही वेग घेतला आहे. हे आमदार राजीनामा देऊन भाजपचे संख्याबळ कमी करणार आणि काँग्रेसला मदत करणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. यातून सिद्ध काहीच होणार नसले, तरी सध्या राज्यात सुरू असलेल्या शिमग्यात मात्र यासंदर्भात बोंब मारणे सुरू झाले आहे हे नक्की. यामुळे नेते कोमात आणि कार्यकर्ते जोमात असल्याचे काही वातावरण आहे.

कायद्यांतील पळवाटा

गोव्यात निवडणूक जाहीर होऊन दहा दिवस उलटून गेले आहेत व भाजपवाले तारखा देतात ते पाहिले, तर नवे सरकार स्थापन होईपर्यंत पंधरवडा उलटून जाणार आहे असे वाटते. त्यामुळे लोकांमध्ये वा भाजपावाल्यांमध्ये नव्हे, तर काँग्रेसवाल्यांत चलबिचल वाढली आहे. ती नेमकी कशासाठी ते कळायला मार्ग नाही.

गतवेळी निकालानंतर काही तासही न गमावता सरकार घडविणारी भाजपची ही मंडळी इतकी संथ का त्याचे गणित सोपे आहे. काहीही करून सरकार घडविण्याची हिंमत व धमक काँग्रेसकडे नाही हे भाजपला पुरते कळून चुकले आहे व कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन ते त्यांना डिवचत आहेत. बिचाऱ्यांवर वेळ आली आहे ती तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची. ∙∙∙

घनःश्याम पुन्हा बोहल्यावर?

आपल्याला मडगावचे नगराध्यक्ष केले नाही म्हणून दिगंबर कामत यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढविणारच अशी सिंहगर्जना करणारे मात्र, निवडणुकीवेळी कोशात जाऊन राहिलेले नगरसेवक घनःश्याम शिरोडकर यांना पुन्हा मडगावचे नगराध्यक्ष बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने त्यांच्या स्वप्नाने उचल खाल्ली आहे असे समजते. त्यांनी कामत यांच्याकडेच आपल्याला नगराध्यक्ष करा असा लकडा लावला आहे. कामत यांच्याकडे हे शक्य न झाल्यास त्यांनी भाजपच्या नगरसेवकांना हाताशी धरून आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ठरविले आहे, पण यावेळी विजय काय करणार ते मात्र पाहावे लागेल.

सरडे रंग बदलू लागले...

निवडणुका झाल्या, निकाल लागला, पण डाव जिंकला ते शहाणे ठरले. पण डाव हरले ते पाच वर्षांसाठी मुकले. कारण आता पूर्वीसारखे राजकारण राहिले नाही. जिंकून आल्यानंतर सर्व प्रजा आपली म्हणणारे राजकारणी आता राहिले नाहीत. कारण आता राजकारण हा शुद्ध व्यवसाय झाला आहे, पण जिंकण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना आपल्या विरोधात जो उभा ठाकला, तो आपला कसा होणार. त्याला जेरीस आणले जाते किंवा कार्यकर्ते पुढील पाच वर्षे सतावणूक करू लागतात. याचा बोध घेऊन आता राजकीय सरडे आपला रंग बदलताना मागचा पुढचा विचार न करता ‘जो जिता वही सिकंदर’ म्हणून सरळ आपला रंग बदलत मिरवणुकीत मिसळून आम्ही नाही त्यातले अशा पद्धतीने सरमिसळ होऊ लागले आहेत.

रुमडामळमधील कारवाई

पंचायत निवडणूक एक-दोन महिन्यावर आलेली असताना नावेली मतदारसंघातील रुमडामळ पंचायतीने अतिक्रमण विरोधी मोहिम राबवून आपला हिसका दाखवला आहे. या कारवाईमुळे कायदाप्रेमींना अवश्य दिलासा मिळाला असून, त्यांनी पंचायतीचे अभिनंदन केले आहे. तर काहींना नावेलीत जे राजकीय परिवर्तन झाले आहे त्याचा हा परिपाक असल्याचे वाटते. एक खरे की या कारवाईमुळे कोणीच आपले वाकडे करू शकत नाही या तोऱ्यात वावरणाऱ्यांची मिजास उतरली आहे. अनेकांची पंचायत निवडणुकीच्या तोंडावर अशी कारवाई होईल अशी अपेक्षा नव्हती. तेही चकीत झाले.

संधी मिळणार तरी कशी

निवडणूक निकाल जाहीर होऊन आठवडा उलटून गेलेला असला तरी गोव्यातील काँग्रेस नेत्यांना अजून परिस्थितीचे भान आलेले नाही असे आम्ही नव्हे, तर त्यांची एकेक निवेदने ऐकून त्यांचे कार्यकर्तेच आता बोलू लागले आहेत. सरकार स्थापन करायला विलंब का होतो ते स्पष्ट झालेले असताना संधी मिळाली तर सरकार स्थापन करू हे निवेदन पोरकटपणा दर्शविणारे आहे. यापूर्वी मिळालेली संधी घालवली मग आता संधी मिळणार तरी कशी असेही ते खालच्या स्वरात विचारतात.

कुणाच्या लॉबिंगमध्ये ‘दम’

आज, उद्या म्हणत.. म्हणत अखेर भाजप सरकारने नवे सरकार स्थापन करण्यासाठीचा मुहूर्त शोधला. 24 किंवा 25 मार्च रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. आता भाजपमधील काही आमदारांना मंत्रिपदाची दिवास्वप्नेही दिसू लागली आहेत. सावंतबाबचा नेमका आशीर्वाद कुणाला, कुणाच्या लॉबिंगमध्ये अधिक ताकद आहे, हे लवकरच दिसून येईल. सरकारच्या नव्या चमूत नवे चेहरे असतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे हे चेहरे नेमके कुणाच्या बाजूचे असतील, हेही कळेलच. निवडणूक जिंकणे जितके कठीण, तितकेच मंत्रिपदासाठी ‘लॉबिंग’ करणेही कठीण असते असा अनुभव काही आमदारांना येत असणारच. अर्थात, हाही एक राजकारणाचाच भाग आहे. बघूया ‘किसमे कितना है दम’

रेजिनाल्डच्या विजयाचे इंगीत

यावेळी कुडतरीत अपक्ष म्हणून निवडून येऊन आलेक्स रेजिनाल्ड यांनी खरे तर नवा इतिहास घडविला आहे. कारण आजवर तेथून कोणीच अपक्ष निर्वाचित झालेला नाही. रेजिनाल्डसुध्दा सर्वप्रथम 2007 मध्ये सेव्ह गोवाच्या व नंतर दोनदा काँग्रेस उमेदवारीवर निवडले गेले. यावेळी काँग्रेसला अनुकूलता होती, पण तिने उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष राहिले व त्यांना मतदारांची सहानुभूती लाभली. दुसरीकडे भाजपने आपला उमेदवार असतानाही त्यांना छुपा पाठिंबा दिला अन् सर्व राजकीय पंडितांची भाकिते तेथील निकालाने खोटी पाडली.

राहुलजींची मात्राही चालली नाही

गोव्यात यावेळी काही मतदारसंघ निवडणुकीच्या घोषणेपासून ते मतदान व थेट मतमोजणीपर्यंत सतत चर्चेत राहिले. अशा मतदारसंघात सासष्टीतील कुडतरीचा अंतर्भाव होता. तेथील रेजिनाल्ड यांना काँग्रेसचा त्याग करून आप, तृणमूल असा केलेला प्रवास व नंतर माघार घेऊन अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करूनही त्यांना लोकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून भांबावलेल्या काँग्रेसने आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी तेथे दस्तुरखुद्द राहुल गांधी यांची प्रचारसभा घेतली. पण, तेथे ते प्रभाव पाडू शकले नाहीत व रेजिनाल्ड दीड हजार आघाडीने जिंकले.

पुलांना प्रतीक्षा उद्‍घाटनाची!

करमल घाट ते बाळ्ळी दरम्यानच्या तीन पुलांचे काम अखेर हो ना करत पूर्ण झाले आहे. केवळ बार्शे येथील पुलाचा जोडरस्ता तेवढा बाकी आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढती रहदारी व त्यामुळे होणारी कोंडी यावर तोडगा म्हणून हे काम हाती घेतले गेले होते, पण ते लांबले. आता दोन पूल पूर्ण झालेले असतानाही ते वाहतुकीस खुले का केले जात नाहीत. उद्‍घाटनासाठी नव्या सरकारची प्रतीक्षा केली जाते अशी पृच्छा या मार्गावरील प्रवासी आता करू लागले आहेत.∙∙∙

फोंडा शिमगोत्सवातील कवित्व...

वारे वाहेल तसे सूप धरावे असे म्हटले जाते. राजकारणातही तसेच आहे. जेथे राजकारणी नेत्यांची चलती तेथे त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी. विषय आहे, फोंड्यातील सार्वजनिक शिमगोत्सवाचा. सरकार पातळीवरील मागच्या शिमगोत्सवात मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर सत्तेत असल्याने मगो समर्थक कार्यकर्त्यांचीच रेलचेल दिसायची. रवी नाईक समर्थक घरीच बसायचे, पण आता रवी नाईक सत्तेत असल्याने मगोचे समर्थक या शिमगोत्सव मिरवणुकीत कुठे दिसले नाहीत.

रवी नाईक समर्थकच सर्वांत जास्त मिरवणुकीत दिसले आणि तिकडे मगो समर्थक घरी. सार्वजनिक शिमगोत्सव सर्वांच्या सहभागासाठी एकजुटीसाठी साजरा केला जातो, पण येथे तर ज्याची सत्ता त्याची मत्ता असा प्रकार आहे. सरकार पातळीवरील सार्वजनिक कार्यक्रमांची हीच तर खरी शोकांतिका आहे.

भिकेंना आततायीपणा नडला

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डने युती करत निवडणुका लढविल्या. आता दोघांनाही सपाटून मार खाल्यावर एकमेकांची उणीदुणी काढणे सुरू झाले आहे. उत्तर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके यांनी काँग्रेसला गोवा फॉरवर्डबरोबरची युती महागात पडली, असे सांगत गोवा फॉरवर्डवर तोफ डागली आहे.

यावर आता विजय सरदेसाई यांचे दीपक कळंगुटर आणि संतोषकुमार सावंत या कार्यकर्त्यांनी भिकेंना शिंगावर घेत युती दिल्लीत झाली होती, किमान याचे भान तरी ठेवावे असे सांगत युतीधर्म पाळण्याचे आवाहन केले. कोणी किती काम केले याचे पाढे वाचणे सुरूच आहे. मात्र, काँग्रेसने भिकेंना कारणे दाखवा नोटीस देऊन जाब विचारला आहे. काही झाले तरी भिकेंना आपला आतताईपणा नडला हे मात्र नक्की.∙∙∙

मगोप्रेमी संभ्रमात

मगोचे नेते आणि मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांना सरकारमध्ये स्थान मिळेल की नाही, याबाबत बराच संभ्रम निर्माण झाला आहे. आता सरकार पातळीवर हा संभ्रम होणे क्रमप्राप्त आहे. मात्र या विषयावरून मगोप्रेमीत मोठा संभ्रम निर्माण आहे. कारण मागची तीन वर्षे मगो सत्तेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे मगोप्रेमींनी काय काय भोगले ते सांगायचे आणखी गरज नाही. सत्तेशिवाय राहणे म्हणजे ‘गळाविना मासा’ हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळेच तर तीन वर्षांनंतर निदान यावेळेला तरी मगोला सत्तेत सहभागी करून घेणे आवश्‍यक असल्याचे मगो प्रेमी खाजगीत बोलतात. आता पाहुया सुदिनरावांचे स्टार कितपत चमकदार आहेत ते..! ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT