Goa Loud Music Issue Canva
गोवा

Sound Pollution: गोव्यातील किनारी भागात ध्वनिप्रदूषणावरून सावळागोंधळ! वेगवेगळ्या मतप्रवाहांमुळे 'मूळ विषय' पडला मागे

Loud Music Goa: उत्तर गोव्यातील किनारी भागामधील ध्वनिप्रदूषणाच्या समस्येवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्यानंतर त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र, या भागातील नागरिक आणि व्यावसायिकांचे मतप्रवाह वेगवेगळे बनले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

North Goa Coastal Area Sound Pollution

म्हापसा: उत्तर गोव्यातील किनारी भागामधील ध्वनिप्रदूषणाच्या समस्येवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्यानंतर त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र, या भागातील नागरिक आणि व्यावसायिकांचे मतप्रवाह वेगवेगळे बनले आहेत. संगीत नसल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही झाल्याचा दावा केला जातो. ज्या हेतूने नागरिकांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवलेला तो हेतू मात्र कुठेतरी बदलताना दिसतोय!

किनारी भागांतील नाईट-लाईफ ही गोव्याची ओळख असली तरी येथील संगीत रंजनी पार्ट्या स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरतात. वेळोवेळी या कर्णकर्कश संगीताबाबत स्थानिक तसेच पर्यावरणप्रेमींकडून आंदोलने व आवाज उठविला जातो. मात्र, ध्वनिप्रदूषणावरून गावात पुकारलेला ‘लोकलढा’ काहीजण पद्धतशीरपणे ‘हायजॅक’ करत असून मूळ विषय सोडून मुख्य मुद्दा इतरत्र भरकटत नेला जातोय, असे काही स्थानिकांचे मत बनले आहे.

दरम्यान, न्यायालयाने प्रशासनाची कानउघाडणी केल्यापासून किनारी परिसरात विशेषतः हणजूण, वागातोर यास्थळी रात्री दहानंतर मोठ्याने वाजणारे संगीत काही प्रमाणात नियंत्रणात आले आहे. असे असले तरी ध्वनिप्रदूषणावरून सामाजिक कार्यकर्त्यांनी पुकारलेला लोकलढा अद्याप संपलेला नाही, असे किनारी भागातील नागरिक सांगतात.

किनारी भागांतील अनेक आस्थापनांमध्ये सध्या साऊंड मॉनिटरिंग सिस्टीम बसवल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांचे फिरते पथक व रॉबर्ट वाहनांकडून गस्त असते. ज्याठिकाणी उल्लंघन होत असल्याचे आढळते तेथे पोलिसांकडून संबंधित आस्थापनांवर कारवाई होते व त्यांची साऊंड सिस्टीम जप्त केली जाते; परंतु सर्वच ठिकाणी स्थिती सुधारली आहे असेदेखील म्हणता येणार नाही. काही मोठी नावाजलेली आस्थापने अजून कायद्याचे उल्लंघन करतात, असा दावा काही स्थानिकांचा आहे.

शिवोली मतदारसंघातील हणजूण किनारी पट्ट्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा तापलेला आहे. याठिकाणी लोकवस्ती मोठी आहे. सध्या हणजूण, वागातोर या भागांत रात्री सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण होते, असा दावा करून काही ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींकडून वेळोवेळी आंदोलने उभारली जात आहेत. गेल्या रविवारच्या ग्रामसभेत हाच ध्वनिप्रदूषणाचा विषय गाजला. तिथे इनासियो नामक व्यक्तीला काहींनी लक्ष्य केले. इनासियो यांना मारहाण करणाऱ्यांवर नंतर हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.

दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्यांच्या दाव्याप्रमाणे, जरी रात्री १०पर्यंत संगीत वाजविण्याची परवानगी असली तरी कायद्याच्या कक्षेत व अटींचे पालन होणे तितकेच गरजेचे असते. मात्र, तसे होत नसते. आम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी आंदोलने किंवा रस्त्यावर उतरत नाही. लोकांना होणारा त्रास अन् विषय प्रलंबित आहे, म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरतो.

आम्ही कुणाच्या रोजगाराआड नाही...

स्थानिक एना फर्नांडिस म्हणाल्या की, गेल्या रविवारी शिवोली ग्रामसभेत इनासियो फर्नांडिस यांना पोलिसांच्या समक्ष मारहाण झाली. या घटनेचे साक्षीदार व व्हिडिओ पुरावे असताना पोलिसांनी अद्याप याप्रकरणात संशयितांना अटक केलेली नाही. सामान्यांना एक व इतरांना दुसरा न्याय, अशी स्थिती आहे. मुळात आम्ही कुणाच्या रोजगार आड नाही, किंवा गावातील पर्यटन संपवायचे नाही. गावातील शांती व लोकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण व्हावे, एवढीच माफक अपेक्षा आहे. पूर्वीपासून सामाजिक क्षेत्रात मी वावरते. मध्यंतरी मला आलेली ५५ लाख रुपयांची ऑफर मी झिडकारली; कारण हे गाव भावी पिढ्यांसाठी राखायचे आहे. हे पैसे आज-उद्या संपतील.

काहींनी लोकलढा केला ‘हायजॅक’!

स्थानिक रमेश भोवी म्हणाले की, हणजूणमधील काही भागांत ध्वनिप्रदूषणाचा खरोखर मुद्दा आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु सद्यस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा झाल्या आहेत व गोष्टी नियंत्रणात आल्या आहेत. मात्र, ज्या कारणांसाठी हा लोकलढा उभारला गेला, तो कुठेतरी भरकटत आहे असे दिसते. काहींनी हा लढा ‘हायजॅक’ केल्याचे दिसते.

काही भागात खरोखर प्रश्न आहे, तेथील लोकांना आंदोलनकर्ते विश्वासात न घेताच विषय भलतीकडेच नेताना दिसत आहेत. प्रत्येक गोष्टींवर उपाय असतो, तो चर्चेअंती सोडविता येतो; परंतु आंदोलनाची दिशा कुठेतरी भरकटत आहे. कारण, सध्या ध्वनिप्रदूषणाचा विषय राहिला बाजूला व इतर गोष्टींना लक्ष्य केले जात आहे, असे दिसते.

पर्यटकांची संख्या रोडावली

सुरुवातीला हणजूण, वागातोरमध्ये विदेशींचा भरणा अधिक असायचा. कालांतराने विदेशी पर्यटकांची संख्या वाढू लागली. कारण रेंट-अ-वाहनांमुळे या पर्यटकांची रेलचेल वाढली. परंतु हणजूणमध्ये म्युझिकवर आलेल्या निर्बंधांमुळे येथील पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे काहींचे मत बनले आहे. पूर्वीप्रमाणे पर्यटकांची रस्त्यांवर वर्दळ नसते. परिणामी, लहान व्यवसाय किंवा टॅक्सीचा व्यवसाय करणाऱ्यांना याचा फटका बसल्याचे काहींचे प्रामाणिक मत आहे. तसेच आमचा ध्वनिप्रदूषणाला पाठिंबा आहे, असे नाही; परंतु संगीतच नसल्यास पर्यटक येणार तरी कसे, असेही काहींचे मत आहे.

हेतुपुरस्सर लक्ष्य

दरम्यान, ज्यांनी या सामाजिक कार्यकर्त्यावर हात उगारला, त्यांच्या दाव्याप्रमाणे ही व्यक्ती उगाच सायंकाळच्या वेळी काही रेस्टॉरंट व आस्थापनांना हेतुपुरस्सर लक्ष्य करते. सायंकाळी ७ वाजताच रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या गेस्ट लोकांचे व्हिडिओ चित्रित करून आस्थापनस्थळी ध्वनिप्रदूषण होत असल्याचा काहीजण बनाव करतात. मुळात सायंकाळीच तिथे जाऊन मुद्दा उपस्थित करणे हे चुकीचे आहे. कायद्याद्वारे रात्री १० पर्यंत संगीत वाजविण्यास मुभा आहे. असे असताना, काहीजण सामाजिक बांधिलकीच्या नावाने आततायीपणा करीत, गावातील शांतता व पर्यटन संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा या संबंधित हॉटेल मालकांनी केला आहे.

निराधार आरोप नकोत...

जे लोकप्रतिनिधी किंवा इतर आमच्यावर खंडणी उकळत असल्याचे खोटे आरोप करीत आहेत, त्यांनी पुरावे सादर करावेत. उगाच निराधार किंवा तथ्यहीन आरोप करू नयेत. पर्यावरणसंबंधी आवाज उठविणाऱ्यांची पार्श्वभूमी कुणी तपासली आहे का? उगाच चुकीचे आरोप करून इतर लोकांची दिशाभूल करू नये, असे स्थानिक एना फर्नांडिस तसेच जिनेट मोरेस यांनी सांगितले. जे सामाजिक कार्याकर्त्यांवर खंडणीचे आरोप करत आहेत, त्यांची व सामाजिक कार्यकर्त्यांची मालमत्ता तपासून बघावी. मग खरे काय व खोटे काय, हे स्पष्ट होईल, असे आव्हान ध्वनिप्रदूषणाबाबत लढा देणाऱ्यांनी आरोप करणाऱ्यांना यावेळी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT