Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; चकाचक उत्तर गोवा

c: सध्या राज्यात दोन गोष्टी जोरात सुरू आहेत म्हणे, एक म्हणजे मुलींच्या सुरक्षेवर चर्चा अन् दुसरं म्हणजे पोटनिवडणुकीचा प्रचार!

गोमन्तक डिजिटल टीम

चकाचक उत्तर गोवा

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक ‘पोस्टर स्वच्छता अभियान’ जाहीर केल्यावर राजकीय बॅनरवाल्यांची चांगलीच धांदल उडाली दिसतेय. कालपर्यंत रस्त्याच्या कडेला, वीज खांबावर आणि भिंतींवर ‘जनतेची सेवा’ ओरडणारे पोस्टर आज ट्रकमध्ये शांतपणे गुंडाळून बसलेत! परवानगीशिवाय लावलेले फलक काढा म्हणताच काहींची सेवा इतकी वेगाने गायब झाली की जणू निवडणूकच संपली. आता सात दिवसांत अहवाल द्या म्हणल्यावर अधिकारीही धावतायत, आणि पोस्टरवाल्यांची ‘क्रिएटिव्हिटी’ थेट कचरापेटीत! नियम आधीही होतेच, पण अंमलबजावणीची आठवण झाली कीच शहराला अचानक स्वच्छतेची सवय लागते—बाकी वेळ ‘विकास’ फक्त बॅनरवरच दिसतो! ∙∙∙

विरोधक कुठे हरवले?

सध्या राज्यात दोन गोष्टी जोरात सुरू आहेत म्हणे, एक म्हणजे मुलींच्या सुरक्षेवर चर्चा अन् दुसरं म्हणजे पोटनिवडणुकीचा प्रचार! पण गंमत अशी की, पहिल्या विषयावर फक्त चर्चा… आणि दुसऱ्यावर मात्र पूर्ण ॲक्शन! जनतेला वाटलं होतं, एवढं गंभीर प्रकरण घडलंय, तर विरोधक रस्त्यावर उतरतील, आंदोलन करतील, सरकारला जाब विचारतील... पण इथे तर सगळेच ‘प्रचार मोड’मध्ये इतके बिझी की, आंदोलनासाठी वेळच मिळाला नाही बहुतेक! काही लोक तर म्हणायला लागलेत, ‘मुलींच्या सुरक्षेचं प्रकरण’ ‘ब्रेकिंग न्यूज’मध्ये आहे अन् नेतेमंडळी ‘कॅम्पेन न्यूज’मध्ये!’ सरकारवर नाराजी असतेच… पण आता विरोधकांवरही प्रश्नचिन्ह उभं राहायला लागलंय ‘हे सरकारला विरोध करतात की, फक्त निवडणुकीतच?’ आता कोण बरोबर, कोण चूक हे ठरवणं कठीणच. पण एक मात्र नक्की, जनतेच्या मनातली ही ‘चर्चा’ आता हळूहळू मोठ्याने ऐकू येऊ लागली आहे! ∙∙∙

स्वच्छ पाण्यासाठी टाहो!

‘स्वच्छ पाणी हवं’ ही मागणी काही विलासी नाही, पण सांकवाळच्या प्रभू व्वियोलेटा कॉम्प्लेक्समधील रहिवाशांसाठी ती जणू एखादी स्वप्नवत गोष्टच ठरली आहे. नळ उघडला की पाणी येतंय की प्रयोगशाळेतील नमुना, याचा अंदाज लावणं कठीण झालं आहे. दररोज बिल भरूनही मिळतं ते संशयास्पद पाणी आणि त्यावर “सगळं नियंत्रणात आहे” अशी अधिकाऱ्यांची नेहमीची टेप! प्रश्न इतकाच की, लोकांनी पाणी प्यावं की प्रशासनाच्या आश्वासनांवरच तहान भागवावी? रहिवाशांचा संताप वाढत असताना संबंधित यंत्रणा मात्र अजूनही ‘स्वच्छ’ उत्तर देण्याच्या प्रतीक्षेतच दिसते! ∙∙∙

मडगावच्या बाबांच्या दिल्लीवाऱ्या

मडगावचे बाबा ज्यांना देवाचो मनीस म्हणून ओळखले जाते ते दिगंबर कामत हल्लीच दिल्लीवारी करून गेले असून त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. कारण कॉंग्रेस राजवटीत, असे मंत्री परत परत दिल्लीला जायचे. पण भाजप काळात तसे होत नव्हते. त्यामुळे कामत यांची सहकुटुंब दिल्लीवारी नेमकी कशासाठी होती, अशी चर्चा मडगावात सुरू आहे. बरे ते गेले व थेट गृहमंत्री अमित शहांना भेटले व चर्चा केली. शहांकडे जी खाती आहेत त्या खात्यांशी कामत यांचा कसलाच संबंध नाही, मग ते त्यांना नेमके का भेटले, अशी चर्चा सुरू आहे. मागे असेच ते कुटुंबकबिल्यासह खुद्द पंतप्रधानांना भेटले होते.त्यामुळे कामत यांच्या दिल्लीवारीची मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीभेटीपेक्षाही अधिक साग्रसंगीत चर्चा होतेय, असे मडगावांतील कामत यांचे विरोधकही म्हणू लागलेत. ∙∙∙

अन् अशोक नाईक लागले कामाला!

पोट निवडणूक जाहीर झाल्यानंतर ‘गोमंतक भंडारी समाजा’चे माजी अध्यक्ष अशोक नाईक यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष होते. रवी नाईक यांच्या समवेत ते काही काळ होते, नंतरच्या काळात त्यांचे व रवी नाईक यांचे काही कारणास्तव पटेनासे झाले. पुढे जाऊन त्यांनी विश्वनाथ दळवी यांना आमदार करण्याचा जणू विडाच उचलला अन् ते कामाला लागले. ज्या दळवींना त्यांनी पाठिंबा दिला होता त्यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली होती. परंतु नाउमेद ना होता, झाले गेले विसरून अशोक नाईक हे चक्क रितेश नाईक यांच्या प्रचारात दिसू लागलेत. रितेश नाईक यांच्या अवतीभवती असणाऱ्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अशोक नाईक यांची ही उपस्थिती वहुतेक खटकणार अशोकराव परत येणारच नाहीत, असे त्यांना वाटत होते. आता ते अशोक बरोबर किती दिवस प्रचार करतील हे पाहण्याची लोकांना उत्सुकता आहे. ∙∙∙

लांडगा आला रे आला

लांडगा आला रे आला...अशी हाक आली की मग पळापळ सुरू व्हायची, अशी एक गोष्ट आहे. नेमका त्याचाच प्रत्यय आता वाहनचालकांकडून येत आहे. युद्धामुळे इंधनाचा तुटवडा होण्याची भीती आहे, त्यातच कुणी तरी अफवा पसरवली की, इंधनाचे दर वाढणार आहेत, तुटवडा होईल. झाले. पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांच्या रांगा पेट्रोलपंपांवर लागल्या. काहीजणांनी तर इंधनाची साठवणूक करण्यासाठी कॅन आणि बॅरल्सही सोबत आणल्या. एकीकडे सरकार म्हणते इंधनाचा तुटवडा नाही, दुसरीकडे पेट्रोलपंपांवर ही...रांग! लांडगा आला रे आला म्हणतात ते हेच काय...!! ∙∙∙

अविश्वासाचा डाव फिस्कटला?

म्हापसा नगरपालिकेची बुधवारची बैठक विकासकामांपेक्षा नगरसेवकांच्या वैयक्तिक संघर्षानेच जास्त गाजली. सभेचे गांभीर्य बाजूला सारून लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक केली. विशेष म्हणजे, विरोधकांपेक्षा सत्ताधारी नगरसेवकच एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सत्ताधाऱ्यांमधील ही यादवी पाहून एका चलाख विरोधी नगरसेवकाने ‘मासेमारी’ करण्याची संधी शोधली! नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी त्यांनी तातडीने अविश्वास ठरावाचा मसुदा तयार केला. सभा सुरू असतानाच छुपेपणाने काही नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याची मोहीमही राबवली. काही नगरसेवकांनी सुरुवातीला या ठरावाला पाठिंबा देत स्वाक्षऱ्या केल्या, ज्यामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले होते. विरोधकांच्या या हालचालींची कुणकूण एका चतुर सत्ताधारी नगरसेवकाला लागली. त्याने वेळ न दवडता आपल्या ‘वरिष्ठांना’ याची खबर दिली. त्यानंतर सूत्रे वेगाने फिरली. वरिष्ठांचा दबाव आणि ‘समजावणी’ सुरू होताच, बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या नगरसेवकांनी नमते घेतले. आम्ही माघार घेत आहोत, असे सांगत स्वाक्षरी करणाऱ्यांनी हात झटकले. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: भरदिवसा गोळ्या घालून केला निर्घृण खून! लपण्यासाठी आले गोव्यात; पंजाबमधील हत्या प्रकरणात 5 जणांच्या मुसक्या आवळल्या

Mirabag: ‘बंधारा रद्द’चे पत्र द्या, अन्यथा ‘चलो आझाद मैदान’! मीराबाग आंदोलकांचा इशारा; सरकारला 2 दिवसांची मुदत

VIDEO: भक्तिरसात तल्लीन! कुशावती तिरी घुमले ‘आरती’चे स्वर; पहा अर्चकांचा लयबद्ध आविष्कार

Ponda: 'फोंड्यात लढाई बहुजनांच्या अस्तित्वाची', निवडणुकीसंदर्भात मान्‍यवरांचा सूर; रवींचा वारसा टिकणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन

'सोहम नाईक' प्रकरणाची व्याप्ती वाढली! प्रौढ व्यक्तींचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती; कुडचडेतील घरावर गुन्हे शाखेचा छापा

SCROLL FOR NEXT