Nilesh Cabral
Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: काब्राल यांचे भाजपला आव्हान; राजीनाम्याचेही गुपित उघड!

दैनिक गोमन्तक

Nilesh Cabral: भाजपच्या आदेशावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या आमदार नीलेश काब्राल यांनी आता पक्षालाच आव्हान देणे सुरू केले आहे. आपण भाजपचा प्रामाणिक आणि शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या काब्राल यांनी यापुढे पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली तरी ती स्वीकारण्यापूर्वी कुडचड्यातील जनतेला विश्वासात घेऊ, असे म्हटले आहे.

भाजपमध्ये पक्षाचा आदेश अंतिम असतो. तेथे जनतेला वा कार्यकर्त्यांना वाईट वाटेल या गोष्टींना थारा नसतो याचा बहुधा काब्राल यांना विसर पडला असावा.

भाजपची आपली स्वतःची संघटनात्मक रचना आहे. संघटन सचिवांच्या पातळीवर दिलेले आदेश सर्वांनाच पाळावे लागतात. त्याला सरसकटपणे पक्ष नेतृत्वाचा आदेश असे संबोधले जाते.

काब्राल यांनी ही शिस्तीची चौकट मोडत आपल्याला राजीनामा देण्याचा आदेश पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी दिल्याचे शनिवारी कुडचडे येथे कार्यकर्ता मेळाव्यात जाहीरपणे उघड केले. याआधीही त्यांनी म्हादईप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

राजीनाम्यानंतर तापले राजकारण: नोकरभरती प्रक्रियेतील गौडबंगाल प्रकरणी मंत्री निलेश काब्राल यांच्यावर अंकुश ठेवून केंद्रातील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना मंत्रिपदावरून पायउतार होण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी काब्राल यांनी राजीनामा दिला होता.

मंत्री वगळण्याचा निर्णय पक्षाच्या उच्च पातळीवर झाल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सावध भूमिका घेत हे पक्षाच्या आदेशानुसार झाल्याचे स्पष्ट केले होते. मात्र काब्राल यांच्या राजीनाम्यानंतर गोव्यातील राजकारण तापले.

‘मी तरुणच, म्हातारा झालो नाही’

मंत्रिमंडळातून राजीनामा दिलेले काब्राल गेले आठवडाभर मुख्यमंत्र्यांना भेटलेले नाहीत. आपण आमदारपदी खूश आहे. अद्याप तरुण आहे, म्हातारा झालेलो नाही. लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी कोणी चर्चा केलेली नाही. चर्चा केली तरी जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

मंत्र्यांतच होती स्पर्धा

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष मानला जातो. वेगळेपण जपणारा पक्ष असे त्या पक्षाचेच म्हणणे आहे. असे असूनही सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी भाजपच्या मंत्र्यांत स्पर्धा होती हेही काब्राल यांनी उघड केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम

खाते सोपवले जाणार याची मला कल्पना नव्हती. तुलनेने मोठा व्याप असणारे ते खाते होते. ते खाते आपल्याला मिळावे यासाठी अनेकांचे प्रयत्न होते. खोटे वाटत असल्यास मुख्यमंत्र्यांना विचारा,

असे सांगून काब्राल यांनी या स्पर्धेमुळेच मुख्यमंत्र्यांना ते खाते आपल्याकडे ठेवावे लागले, असे सूचित केले आहे. तसेच काब्राल यांनी शिस्तभंगाचा पुढील धडा गिरवताना आपण जनतेला विश्वासात न घेता राजीनामा देऊन चूक केली असेही जाहीरपणे सांगितले आहे.

मुख्यमंत्री केवळ अंमलबजावणीपुरते

आपल्याला मंत्रिमंडळातून वगळणार याची मुख्यमंत्र्यांना कल्पना नव्हती, आपल्याला मुख्यमंत्र्यांनी तुझे नाव राजीनामा घेण्यासाठी मी सुचवलेले नाही असे सांगितले होते, असे सांगून काब्राल यांनी राज्य मंत्रिमंडळाची निवड हा मुख्यमंत्र्याचा अधिकार असला तरी प्रत्यक्षात दिल्लीतूनच सारे ठरवून मुख्यमंत्री केवळ अंमलबजावणीपुरते आहेत हेही उघड केले आहे.

प्रत्यक्षात प्रत्येक पक्षात पक्षश्रेष्ठीच निर्णय घेत असतात, पण त्याची वाच्यता केली जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराची आब राखली जाते. काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांना आपला (काब्राल यांचा) राजीनामा घेणार याची कल्पनाच नव्हती असे म्हणून मुख्यमंत्र्यांचीही कोंडी केली आहे.

कुडचड्यातून उमेदवारी मिळेलच

कुडचड्यातून भाजप आपल्याला उमेदवारी नाकारणार नाही असे काब्राल यांना वाटते. मागील विधानसभा निवडणुकीत काही आमदारांना भाजपने उमेदवारी नाकारली होती, तेथे भाजपचे उमेदवार निवडून आले.

ती वेळ आपल्यावर येणार नाही असे काब्राल यांचे म्हणणे असून त्यापुढे जात आपल्याला जनतेची उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे कुडचड्यात तरी तसे (भाजपने उमेदवारी नाकारून दुसऱ्याला उमेदवारी दिली तर ती व्यक्ती जिंकेल) होणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. उमेदवारी कोणाला द्यावी हे जनताच ठरवते असे सांगून त्यांनी पक्षाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT